मुंबई सह ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर ! वहातूक मंदावली ; चाकरमान्यांचे हाल !!
ठाणे, बातमीदार : मुंबई, मुंबई उपनगर सह ठाणे, पालघर जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसाने आज ठिकठिकाणी वहातूक कोंडीसह पश्चिम व मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्याही पंधरा ते वीस मिनिटे विलंबाने धावत आहेत. गेल्या आठवडाभरापासून पावसाची रिपरिप सुरू असताना काल रात्रीपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली आहे.
मुंबई शहर व उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. सतत सुरू असलेल्या जोरदार सरी व पावसामुळे वातावरण धुरकट झाल्यामुळे व रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या वाहनधारकांच्या प्रयत्नांमुळे वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग, लिंक रोड, एलबीएस मार्ग, एस. व्ही. रोड, दक्षिण मुंबई, दादर, परळ, धारावी, बांद्रा, कुर्ला, चेंबूर आदी भागातील अनेक रस्ते वाहतूक कोंडीत सापडले आहेत. पावसामुळे सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे मात्र हाल झाले आहेत.
अशीच परिस्थिती ठाणेसह पालघर जिल्ह्यात असून येथे सुध्दा काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने पालघर, वसई, नालासोपारा, वाडा, मिरा, भाईंदर, घोडबंदर, ठाणे, मुंब्रा, शिळफाटा, काटई, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ बदलापूर रोड, मुरबाड रोड, तसेच काही ठिकाणी पाणी साचल्याने वहातूक बंद करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर निघू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment