Friday, 16 September 2022

कल्याण तालुक्यात पावसाची धुमचक्री, काळू नदीवरील पुल पाण्याखाली, दहागाव पुल पाण्यात,पाऊस न थांबल्यास कल्याण मुरबाड रस्ता होणार ठप्प !

कल्याण तालुक्यात पावसाची धुमचक्री, काळू नदीवरील पुल पाण्याखाली, दहागाव पुल पाण्यात,पाऊस न थांबल्यास कल्याण मुरबाड रस्ता होणार ठप्प !


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यात रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे टिटवाळा शहापूर रस्त्यावरील काळू नदीचा पुल सकाळी पाण्याखाली गेला आहे, तर टिटवाळा बदलापूर शहरांना जोडणारा दहागाव येथील बारवी नदीच्या पुलावर पाणी आल्याने हा रस्ता बंद झाला आहे. याचबरोबर कल्याण मुरबाड मार्गावर असलेला रायते येथील उल्हास नदीच्या पुलाला पाणी लागल्याने पाऊस असाच सुरू राहिला तर मात्र हा मार्ग दुसऱ्यांदा ठप्प होऊ शकतो.


कल्याण तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे, सकाळी आठ पर्यंत तालुक्यात ७६ मीमी इतका पाऊस पडला आहे. सध्या देखील सुरू आहे. यामुळे रुंदा येथील काळू नदीवरील पुल आज सकाळी पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे १०/१२ गावांचा संपर्क तुटला आहे, तर भातसा नदीवर खडवली येते पाणी वाढत आहे. दहागाव जवळील बारवी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे हा पुल पाणी पाण्याखाली गेला आहे. यामुळे टिटवाळा बदलापूर, टिटवाळा शहापूर रस्ता बंद झाला आहे. तसेच कल्याण मुरबाड मार्गावरील म्हारळ, वरप, कांबा टाटा पावर हाऊस  येथे रस्त्यावर पाणी भरले आहे.


म्हारळ गावातील बोडके चाळ, राधाकृष्ण नगरी, आणासाहेब पाटील नगर, शिवाणी चाळ, म्हारळ सोसायटी आदी सखल भागात पाणी साचले आहे. यासह अनेक गावांमध्ये  रस्त्याला नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.


गेल्या १२ तासापासून पडत असलेल्या पावसाने धुमचक्री सुरू झाली आहे. कल्याण मुरबाड मार्गावरील उल्हास नदीवर असलेल्या रायते पुलाच्या कमानी बुडल्या आहेत. पाऊस न थांबल्यास पुलावरून पाणी वाहून हा रस्ता ठप्प होऊ शकतो. असे झाल्यास दुसऱ्यांदा हा मार्ग बंद होऊ शकतो. तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अद्याप पर्यंत कुठेही अनुचित प्रकार अथवा घटना घडली नसून सर्व तलाठी व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असे कल्याण तहसीलदार जयराज देशमुख यांनी सांगितले आहे.


दरम्यान या पावसामुळे निसावणीला आलेले भात पिके पाण्याखाली गेल्याने शेतीचे मोठे नुकसान होणार आहे असे मांजर्ली येथील शेतकरी नकलू घारे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...