Thursday, 3 November 2022

औरंगाबादच्या लेकींचे अभिमानास्पद पाऊल ! 'ती' ही घरचा दिवाच असल्याचा दिला संदेश

औरंगाबादच्या लेकींचे अभिमानास्पद पाऊल ! 'ती' ही घरचा दिवाच असल्याचा दिला संदेश 
 

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ०३ : रूढी-परंपरांना मूठमाती देत चार मुलींनी जन्मदात्या वडिलांच्या मृतदेहाला खांदा दिला. एवढेच नाहीतर पाचव्या मुलीने मुखाग्नी देत सर्व विधी यथायोग्य पार पाडून आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण केली. मुलाने मुखाग्नी दिला तरच उद्धार होतो असे म्हणणाऱ्या लोकांना या पाच बहिणींनी सणसणीत उत्तर दिले आहे.

शहरातील मोंढा नाका, पंचशीलनगर येथील रहिवासी श्यामराव भालेराव (वय ७१) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी (एक) निधन झाले.. त्यात श्यामराव यांना मुलगा नसल्याने खांदा कोण देणार? मुखाग्नी कोण देणार? अशी चर्चा समाजामध्ये सुरू होती. याचवेळी लहान मुलगी नंदा कीर्तिकर ही मुखाग्नी देण्यासाठी पुढे आली. तर शीला जाधव, शोभा दाणेकर, लीला पंडित व सिंधू इंगळे या चार बहिणींनी खांदा देण्याचे ठरविले. अंत्ययात्रा निघताना पाणी, ताट घेऊन नंदा या अंत्ययात्रेसोबत स्मशानाकडे निघाल्या.

त्याठिकाणी परिसरातील नागरिक, नातेवाईक यांच्या उपस्थितीत श्यामराव यांच्यावर रमानगर येथील स्मशानभूमीत विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात महिलांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. संपत्ती, पैसा, घर, शेती यांचा उत्तराधिकारी पुरुष असा समज मोडीत काढत या बहिणींनी आज आदर्श निर्माण केला आहे. मुलांपेक्षा मुली कमी नाहीत. मुलगा नसेल तर मोक्ष प्राप्त होत नाही, पाणी कोण पाजणार? मुलाने मुखाग्नी दिला तरच उद्धार होतो, असे अनेक गैरसमज समाजात आहेत. याला छेद देत या पाचही मुलींनी वडिलांवर अंत्यसंस्कार केले. परंपरेची बंधने झुगारून धाडस दाखवणाऱ्या या बहिणींचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...