संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान टप्पा दोनची आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सभा सपन्न !
कल्याण, (संजय कांबळे) : स्वच्छतेच्या सवयी अंगीकारुन ग्रामीण ज़नतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्यासाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अधिक परिणामकारकरित्या राबवून ते सर्व ग्रामीण कुंटूबापर्यंत पोहचवणे आवश्यक आहे, त्या अनुषंगाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२२/२३ टप्पा क्रमांक दोन च्या सभेचे आयोजन आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले होते, यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद ठाणे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तालुका स्तरीय सभेचे आयोजन कल्याण पंचायत समितीमध्ये करण्यात आले होते, या सभेत बोलताना आमदार किसन कथोरे यांनी सांगितले की या अभियानात जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, शिवाय सरपंच, ग्रामसेवक यांच्यात समन्वय गरजेचा आहे, नागरिकांनी मानसिकता बदलायला हवी याचे उदाहरण देताना ते म्हणाले, आपण मोबाईल चा रिचार्ज, टिव्ही चा रिचार्ज लगेचच टाकतो, मात्र पाणीपट्टी भरत नाही, हे योग्य नाही, ज्या ग्रामपंचायती या अभियानात सहभागी होणार नाही, याचा मी वेगळा विचार करेन असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
गावाचा स्वच्छतेत जास्तीत जास्त सहभाग असावा म्हणून मी स्वतः व अधिकारी हातात झाडू घेऊन यात उतरणार असे त्यांनी सांगितले. आपल्या मार्गदर्शनात ते पुढे म्हणाले, राज्यात सरकार आले आहे, त्यामुळे मतदारसंघातील शंभर टक्के रस्ते सिंमेट क्राँक्रिटिकरण केले व करणार पण सांडपाणी व कचरा तुम्ही रस्त्यावर टाकणार का?असा प्रश्न उपस्थित केला. तसेच या अभियानात बक्षिसापेक्षा जनतेचा सहभाग वाढावा यासाठी एक दिवस गावासाठी हा कार्यक्रम सुरू करावा अशा सूचना आ कथोरे यांनी गटविकास अधिकारी अशोक भवारी यांना दिल्या
तर याप्रसंगी जिल्हा प्रकल्प अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी सांगितले की, ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री महोदयाचा जिल्हा आहे, म्हणून या जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीनी पुरस्कार घ्यायला हवा, स्वच्छ व शुध्द पाणी घरोघरी मिळाले पाहिजे, राज्यात १७०० शाळांना शौचालये नाहीत ही परिस्थिती बदलायला हवी असे सांगून म्हारळ, वरप, कांबा येथील कच-याची समस्या सोडविण्यासाठी लोकांची मानसिकता बदलायला हवी, तसेच या बाबतीत जनजागृती होणे गरजेचे आहे असे ही ते म्हणाले.
यावेळी कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी देखील सरपंच, ग्रामसेवक यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर कल्याण पंचायत समितीच्या सभापती अस्मिता जाधव, सदस्यां रेश्मा भोईर, रंजाना देशमुख, भारती टेंबे, सदस्य, पांडुरंग म्हात्रे, रमेश बांगर, यशवंत दळवी, जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष, रविंद्र घोंडविदे, चंद्रकांत गायकर, ग्रामपंचायत युनियन चे अध्यक्ष अजय जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी विशाखा परटोळे यांनी केले तर आभार ग्रामसेवक नितीन चव्हाण यांनी मानले.





No comments:
Post a Comment