---- २५ प्रवाशी जखमी.
*गंभीर जखमींना नाशिक सिव्हिलला हलवले*
जव्हार, जितेंद्र मोरघा :
पालघर जिल्ह्यात महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस अपघाताची मालिका सुरूच असल्याने प्रवाशांची चिंता वाढली आहे. एसटी बसेसच्या अपघाताचे सत्र सुरुच असल्याने सर्व सामान्य चाकरमानी प्रवाशी आता हैराण झालेत.
जव्हार सेल्वास रस्त्यावर सोमवारी पहाटेच्या सुमारास प्रकाश पोल्ट्री जवळ नाशिक सिल्वासा व जळगाव सिल्वासा बसचा समोरासमोर भीषण अपघात झाल्याने २५ प्रवाशी जखमी झाले आहेत. ह्या जखमींवर जव्हारच्या शासकीय पंतगशहा कुटीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींना बस मधुन उपचारासाठी आणण्यात आले. काही अपघातग्रस्तांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नासिकच्या सिव्हिल रूग्णालयात हलविण्यात आले आहे तर एका चालकावर जव्हारच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पालघर जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या अपघाताने प्रवाशी चिंतेत आहेत. सुखी आणि आरामदायी प्रवास म्हणून महाराष्ट्र शासनाच्या एसटी बसकडे पाहिले जाते,परंतु चालकांच्या भरधाव वेगामुळे लालपरीवर अपघाताचे संकट ओढवत असल्याची खंत प्रवाशांनी व्यक्त केली.
पालघर जिल्ह्याचा भाग डोंगर उताराचा असल्याने ह्या भागातील रस्ते वळणाचे आहेत.काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक वळणांचे फलक लावले नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. जव्हार, मोखाडा तालुक्यातील रस्ते चढ उताराचे वळणाचे असल्याने भरधाव वाहन चालकांना वेळीच अंदाज येत नसल्याने वेगावर नियंत्रण राहात नसल्याने वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे चाकरमानी प्रवाशांमध्ये, चिंतेचे वातावरण असून प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.

No comments:
Post a Comment