कृषि विभाग माणगाव, आत्मा व प्रकल्प अधिकारी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या संयुक्त विद्यमाने माणगाव येथे कृषी प्रक्रिया व विपणन विषयाचे प्रशिक्षण संपन्न !
बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) शुक्रवार दिनाक १३ जानेवारी २०२३ रोजी कृषि विभाग माणगाव कृषि तंत्रज्ञान व्यवस्थपन यंत्रणा (आत्मा) व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांचे संयुक्त विद्यमाने सर्व विकास दिप संस्था, माणगाव येथे आदिम जमाती विकास व संवर्धन या योजने अंतर्गत कृषी प्रक्रिया व विपणन या विषयाचे प्रशिक्षण घेण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका कृषी अधिकारी माणगाव श्री.नागनाथ घरात यांनी केले, प्रस्ताविकामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ याबदलचे महत्त्व विषद केले व आदिवासी शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त नाचणी पिकाची लागवड करून नाचणी पिकावर प्रक्रिया करून विक्री करावे असे सांगितले.
या कार्यक्रमांमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी श्री आनंद कांबळे यांनी नाचणी पिकाचे मूल्यवर्धन व बाजारपेठेतील वाढती मागणी याबाबत मार्गदर्शन केले. सर्व विकास दीप संस्थेचे संचालक श्री.रीची भाऊ यांनी कृषी विभाग व सर्व विकास दिप संस्था यांच्या संयुक्त विविध कार्यक्रमांचे आयोजन कशा प्रकारे केले जाते याबद्दल माहिती दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा. श्रीम. उज्वला बाणखेले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अलिबाग रायगड या उपस्थित होत्या, यावेळी त्यांनी आदिवासी शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन कृषी प्रक्रियेवर आधारित काम करण्याची गरज असल्याचे सांगितले, त्यांनी आदिवासी शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून विविध व्यवसाय करण्याबाबत मार्गदर्शन केले.
श्री.महेश मोरे समन्वयक सर्व विकास दीप संस्था यांनी आदिवासी महिला शेतकरी गट सद्य स्थितीत घेत असलेले विवीध कृषि प्रक्रिया उद्योग याबाबत माहिती दिली. या प्रशिक्षणासाठी प्रमुख मार्गदर्शक डॉ. सुधाकर पाध्ये कृषी विज्ञान केंद्र किल्ला- रोहा यांनी उपस्थित शेतकऱ्यानं नाचणी पिकाचे मूल्यवर्धन व नाचणीपासून तयार करण्यात येणारे लाडू, पापड, बिस्किट यांची सर्विस्थर माहिती पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे दिली व त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
या प्रशिक्षणासाठी तालुक्यांतील महिला /शेतकरी गटाचे ७८ सभासद उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घेतला, यावेळी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण साहित्य, भाजीपाला रोपे, आणि प्रमाणपत्र मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी भालाजाई महिला शेतकरी गट, गावदेवी विकास बचत गट नीलज, श्रवण विकास बचत गट मुठवली, सिद्धिविनायक बचत गट कशेने, एकविरा महिला बचत गट माकटी, रमाई विकास बचत गट माणगाव, व श्री. धोंडू किसन पवार शिरवली या शेतकरी गटांना व शेतकऱ्यानं उत्कृष्ट कृषी प्रक्रियाधरक म्हणून प्रशस्तीपत्रक मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला. या वेळी श्री.रवींद्र पवार मंडळ कृषी अधिकारी, श्री एस. बी. ससाने कृषी पर्यवेक्षक गोरेगाव, तालुक्यातील सर्व कृषी सहायक, श्री. प्रमोद शिंदे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, श्रीम. रक्षा वाघे सि.आर.पी पंचायत समिती माणगाव, सर्व विकास दिप संस्था, माणगाव, यांचे सर्व समन्वयक आणि कृषि विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment