Wednesday, 15 February 2023

‘पूर्वरंग’ मध्‍ये आज सादर होणार ‘लोकरंग’ वेरूळ-अजिंठा आंतरराष्‍ट्रीय महोत्‍सव 25 फेब्रुवारीपासून !

‘पूर्वरंग’ मध्‍ये आज सादर होणार ‘लोकरंग’ वेरूळ-अजिंठा आंतरराष्‍ट्रीय महोत्‍सव 25 फेब्रुवारीपासून !

औरंगाबा, अखलाख देशमुख, दि १५ : औरंगाबाद जिल्‍हा प्रशासन व वेरुळ-अजिंठा आंतरराष्‍ट्रीय महोत्‍सव समितीच्‍यावतीने यंदा बहुप्रतिक्षित वेरुळ – अजिंठा आंतरराष्‍ट्रीय महोत्‍सव-2023 चे येत्‍या 25 ते 27 फेब्रुवारी 2023 दरम्‍यान आयोजन करण्‍यात आले आहे. या महोत्‍सवाच्‍या 'पूर्वरंग' मध्‍ये आज, 15 फेब्रुवारी पासून भारूड, पोवाडा, गोंधळ आदी लोककलांचे रंग उधळले जाणार आहेत. झाशी राणी पुतळा, क्रांती चौक येथे आज, बुधवारी रात्री 7 ते 9 वाजेदरम्‍यान लोककलावंत विविध लोककला सादर करतील. यात शेखर भाकरे हे भारूड सादर करणार असून अजिंक्य लिंगायत पोवाडा सादर करतील तर गोंधळाचे सादरीकरण सुमित धुमाळ करणार आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्यांची ओळख दृढ करण्यासाठी 1985 पासून वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित केला जातो. मात्र गेल्या काही वर्षापासून दुष्काळ, अतिवृष्टी व कोरोना महामारीमुळे या महोत्सवात खंड पडला होता. तब्‍बल सात वर्षानंतर औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्‍य आयुक्‍त व वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष दिलीप शिंदे व बी. एन. पाटील संचालक, पर्यटन संचालनालय ,महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने हा महोत्सव परत एकदा सुरू करण्‍यात येत असून दोन सत्रात विविध सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहेत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल परिसरात हा वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव येत्या २५ ते २७ दरम्यान होत आहे. यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्‍त्रीय, उपशास्‍त्रीय गायक, वादक आपली कला सादर करणार आहेत. त्‍यात उस्‍ताद राशीद खान, उस्‍ताद सुजात खान, महेश काळे, रवी चारी, शिवमनी, विजय घाटे, संगीता मुजूमदार, शंकर महादेवन या कलाकारांचा समावेश आहे. 

या सांस्‍कृतिक महोत्‍सवाच्‍या वातावरण निर्मितीसाठी व स्थानिक कलाकारांच्या कलेला वाव देण्याच्या दृष्टीने शहरातील विविध भागांमध्‍ये पूर्वरंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात 18 तारखेला पैठण गेट येथे रात्री 8 वाजता राहूल खरे यांचे भावगीत गायन व पं. विश्‍वनाथ दाशरथे यांचे उपशास्त्रीय गायन होईल.  21 तारखेला रात्री 8 वाजता दिल्‍ली गेट येथे झाामा कव्‍वाली ग्रुप कव्‍वाली सादर करेल तर 23 तारखेला लॉन्‍स मपविम, रेल्वे स्‍टेशन रोड येथे सायंकाळी 6.30 वाजता कृषी पर्यटन  विषयावर सौरभ कृष्‍णा यांचे व्‍याख्‍यान, श्रीमंत औरंगाबाद विषयावर अजय कुळकर्णी यांचे व्‍याख्‍यान होईल. 

वेरूळ -अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव - 2023 चा औरंगाबाद शहरवासी तसेच शहरात येणाऱ्या सर्व पर्यटकांनी आनंद घ्यावा, असे जिल्हा प्रशासन तसेच पर्यटन संचालनालयाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.
...........
‘पूर्वरंग’ मध्‍ये 
18 फेब्रुवारी – स्‍थळ : पैठण गेट, वेळ : रात्री 8 वाजता, राहूल खरे यांचे भावगीत गायन व पं. विश्‍वनाथ दाशरथे यांचे उपशास्त्रीय गायन
21 फेब्रुवारी – स्‍थळ : दिल्‍ली गेट, वेळ : रात्री 8 वाजता, झाामा कव्‍वाली ग्रुप कव्‍वाली
23 फेब्रुवारी – स्‍थळ : लॉन्‍स मपविम, रेल्वे स्‍टेशन रोड, वेळ : सायंकाळी 6.30 वाजता, विविध विषयांवर व्‍याख्‍यान

No comments:

Post a Comment

१३० हिऱ्यांमध्ये मानाचा हिरा ; उपनियंञक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे श्री. विजय जाधव यांचा ठाण्यात कौतुक सन्मान !!!

१३० हिऱ्यांमध्ये मानाचा हिरा ;  उपनियंञक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे श्री. विजय जाधव यांचा ठाण्यात कौतुक सन्मान !!! ठाणे...