Sunday, 9 April 2023

कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांचा बीड दौरा !

कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांचा बीड दौरा ! 

बीड, अखलाख देशमुख, दि ९ : कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी आज बीड जिल्ह्यातील कोळवाडी, धनगर वाडी, पिंपरनई, लिंब गणेश येथे गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
      झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करा तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा पासून वंचित राहणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्या असे निर्देश मंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

        राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस लवकरच निर्णय घेतील असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

      कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी  जिल्ह्यात गारपीट, अवकाळी पाऊस व वादळीवारा मुळे नुकसान झालेल्या फळबाग, मिरची, कांदा, भाजीपाला  आदी पिकांची पाहणी केली. सोबतच पिंपरनई येथे वादळीवाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या घरांची पाहणी करून त्यांना धीर दिला.
     
         यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, विभागीय कृषी सहसंचालक दिनकरराव जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, चंद्रकांत नवले, छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, संचालक राजेंद्र ठोंबरे, विशाल जाधव, सतीष ताठे यांच्यासह महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...