देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीचा पोपट मेलाय - संजय आवटे
मेला असेलही, पण ज्यावरून ते 'पोपट मेला' असे म्हणाले, ती मूळ गोष्ट सम्राट अकबराच्या दरबारातील आहे. अकबर आणि बिरबल यांच्यातील ती गोष्ट आहे.
"अकबर म्हणजे जलालुद्दीन मुहम्मद अकबर"
जलालुद्दीन मुहम्मद अकबराला एक पोपट फार प्रिय होता.
त्याने त्याला पिंज-यात ठेवले आणि एकजण त्याच्या निगराणीसाठी, सेवेसाठी नियुक्त केला. त्याला ताकीद दिली- "पोपट मरता कामा नये. जो कोणी 'पोपट मेला' म्हणेल, त्याला मी मृत्यूदंड देईन."
बिचारा सेवक पोपटाची खूप काळजी घेत असतो. पण, बिचारा पोपट एके दिवशी मान टाकतो. सेवक घाबरतो. जलालुद्दीन मुहम्मद अकबराला घाबरून कोणीच म्हणत नाही की पोपट मेला आहे. सारे गप्प. प्रकरण बिरबलाकडे येते.
"किती दिवस हे लपवून ठेवायचे?"
यावर काही करावे लागेल.
बिरबल मग जलालुद्दीन मुहम्मद अकबराकडे येतो.
म्हणतो, "सम्राट, तुमचा लाडका पोपट पिंज-यात आहे. तो काही खात नाही. बोलत नाही. बघा कसा पडलाय. एवढा चांगला होता तो आणि आता बोलत नाही"
सम्राट जलालुद्दीन मुहम्मद अकबर येतात तिथे आणि पोपटाची स्थिती पाहून किंचाळतात, "अरे, पोपट मेला! कुठे आहे तो सेवक? त्याला मृत्युदंड द्या."
बिरबल म्हणतो, "तुमचे फर्मान काय होते खाविंद? जो कोणी पोपट मेला आहे, असे म्हणेल त्याला शिक्षा होईल. पोपट मेला, असे कोणीच नाही म्हणाले. तुम्हीच म्हणालात. "
बिरबलाच्या चतुराईवर अकबर हसू लागतो. आणि, सेवकाला माफ करून टाकतो.
आता, 'पोपट मेला' हे रूपक देवेंद्रांनी वापरले.
ते खरे तर आजच्या मीडियाला लागू होते.
पण ते सोडा.
देवेंद्रांनी हे रूपक वापरले.
पण मग ती गोष्ट सांगावी लागेल.
मग जलालुद्दीन मुहम्मद अकबर मान्य करावा लागेल.
मग मुघल मान्य करावे लागतील.
मग ते इतिहासाच्या पुस्तकात असावे लागतील.
अन्यथा, या वाक्प्रचारांचे अर्थ तरी कळणार कसे?
आपली संस्कृती एवढी उदात्त असताना, त्या जलालुद्दीन मुहम्मद अकबराच्या गोष्टी का सांगाव्या लागतात, असा प्रश्न आहे.
तो वेगळाच.
आता 'फडणवीस' हा शब्दही फारसी आहे, ते तर सांगायलाही नको.
बातमी - अकलाख देशमुख
No comments:
Post a Comment