कल्याण तालुक्यात जिल्हा परिषद शाळांची दशा, पहिल्याच दिवशी जागा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना बसवायचे कोठे हा प्रश्न ?
कल्याण, (संजय कांबळे) : सर्वत्र विद्यार्थ्यांच्या पहिल्या प्रवेशाचे धुमधडाक्यात स्वागत होत असताना कल्याण तालुक्यातील शासकीय (जिप) शाळांची भयानक दशा झाल्याने झाल्याने विद्यार्थ्यांना कुठे बसवायचे असा प्रश्न दहिवली आडिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामस्थांना पडला आहे, त्यामुळे वेगवान निर्णय, गतिमान सरकार म्हणवून घेणारे याकडे लक्ष देणार का असा खडा सवाल उपस्थित केला जात आहे.
कल्याण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १२० शाळा आहेत तर ४०० वर शिक्षक आहेत. अनेक शाळा या दुमजली व डिजिटल असल्या तरी बहुतांश वाड्या वसत्या, गावातील शाळा, वर्ग खोल्या, नादुरुस्त झाल्या आहेत. खिडक्या, दरवाजे, पत्रे तुटलेले आहेत, कुठे भिंतीना तडे गेलेले आहेत. कौले फुटलेली आहे. शाळेची शौचालये असून नसल्यासारखी झाली आहेत. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर म्हारळ, निंबवली, आडिवली, मामणोली, वाहोलीपाडा, ही देता येतील. आडिवली मधील २, निंबवली २,आणि मामणोली मध्ये २ अशा ६ खोल्या पडण्याच्या स्थितीत आहेत. इतर गावातील परिस्थिती काही वेगळी नाही.अनेक शाळात लाईट, पाणी, आदी समस्या आहेत. त्यामुळे राज्यात सर्वत्र १५ जून ला शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केले जात आहे. मात्र या धोकादायक शाळेतील विद्यार्थ्यांना कुठे बसवायचे असा प्रश्न दहिवली आडिवली ग्रामपंचायतीचे सरपंच कमलाकर राऊत व ग्रामस्थांना पडला आहे.
तालुक्यातील आडिवली, निबंवली व मामणोली आदी गावातील या धोकादायक वर्ग खोल्या पाडण्यास मंजुरी देऊन तेथे नवीन आर आर सी इमारत बाधांवी व निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आ. किसन कथोरे यांनी २ एप्रिलमध्ये केली होती. मात्र अद्यापही काही झालं नाही, त्यामुळे आता पावसाळा सुरू झाला आहे. मुलांना शाळेत बसवले तर शाळा धोकादायक ? बाहेर बसवले तर पाऊस?अशी अडचण निर्माण झाली आहे. आपण या बाबतीत वारंवार शिक्षण विभाग, पंचायत समिती, राजकारणी यांच्या कडे चकरा मारल्या पण काही उपयोग झाला नाही. सध्या जागा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना कुठे बसवाचे असा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला आहे, त्यामुळे हे वेगवान निर्णय, गतिमान सरकार म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणारे याकडे लक्ष देतील का? असा सवाल सरपंच कमलाकर राऊत यांनी विचारला आहे.
No comments:
Post a Comment