जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांना कोकण आयडॉल पुरस्काराने सन्मानित !!
जव्हार, जितेंद्र मोरघा :
आज रविवार दि.१६ जुलै रोजी दादर पूर्व येथील प्राचार्य बी एन वैद्य सभागृह येथे कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण क्लब, कोकण बिझनेस फोरम ग्लोबल कोकण यांच्या २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोकणातील गावागावात असामान्य काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा कोकण आयडॉल पुरस्काराने सन्मान करण्यासाठी “भव्य कोकण आयडॉल सन्मान सोहळा २०२३” आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कोकण विभागांतील आदिवासी बहुल भागांतील असंख्य गोरगरीबांसाठी मोफत अत्याधुनिक हॉस्पिटल व इथल्या गरीब कुटुंबातील मुलांसाठी मोफत आंतरराष्ट्रीय शाळा, मोफत MPSC/UPSC च्या माध्यमातून हजारो युवकांना अधिकारी होण्याचा मार्ग सुखकर करण्याचे भरीव कार्य केलेल्या कार्याची दखल घेत जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांना छत्रपती शिवरायांच्या घराण्यातील तंजावर तामिळनाडूचे राजे श्रीमंत बाबाजी राजे भोसले यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्याप्रसंगी छत्रपती शिवरायांच्या घराण्यातील तंजावर तामिळनाडूचे राजे श्रीमंत बाबाजी राजे भोसले, छत्रपती सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे, लोकमान्य टिळकांचे वंशज कुणालजी टिळक, राज्याचे माजी मुख्य सचिव द.म सुकथनकर, ग्लोबल कोकणचे श्री.सजंय यादवराव आदी मान्यवर उपस्थित होते.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक मा. श्री. निलेश भगवान सांबरे हे गेली १४ वर्षे आपल्या स्वकमाईतून समाजसेवा या तत्वाच्या आधारे संपूर्ण कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यात कार्यरत आहेत. आरोग्य सेवा, शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगार आणि क्रिडा अशा अनेक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांच्या माध्यमातून त्यांनी लाखो गरजूंना मदतीचा हात पुढे केला आहे.
गुणवत्ता असूनही ज्यांना केवळ पैशांअभावी आपले शिक्षण पूर्ण करता येत नाही. अश्या कोकणातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या पंखात बळ देण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे विविध मोफत उपक्रम राबवले जातात. आदिवासी, शेतकरी, शेतमजूर या वर्गाला अत्याधुनिक शिक्षणाचा परिसस्पर्श होण्यासाठी दुर्गम भागात 8 सीबीएसई नि:शुल्क शाळा चालवल्या जात असून यात एकूण 2311 विध्यार्थी शिक्षण घेत आहेत. गरजू विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी २५ लाख वह्यांचे मोफत वाटप केले जाते. तसेत जिजाऊ मिशन ॲकेडमी ५ वी ते १० वी मोफत क्लासेस जव्हार, खानिवली, पाचमाड, मोखाडा व विक्रमगड येथे चालविले जातात.
तसेच एकही रुग्ण आरोग्य सुविधांअभावी दगावला जाऊ नये, या संस्थेच्या ध्येयानुसार पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील झडपोली गावात भगवान महादेव सांबरे नि:शुल्क सुसज्ज रुग्णालय चालवले जात आहे. इतकेच नाही तर असंख्य रुग्ण याचा लाभ घेत असून दरवर्षी ६०० आरोग्य शिबिरे, २०० रक्तदान शिबिरं देखील आयोजित केली जातात.
कोकणातील महिला हिंमतवान आणि मेहनती आहेत.अश्या मायभगिनींना सक्षम केले तर त्या स्वावलंबी होऊन खऱ्या अर्थाने कोकणाच्या सक्षमीकरणास उभारी देतील या हेतूने जिजाऊच्या त्यांच्यासाठी २ हजार ३३६ महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगारप्रवण करणारे उपक्रम राबवत आहे.
निसर्गाचं वरदान लाभलेल्या कोकणातील शेती ही तोट्याची असू नये, ती जोडधंद्यांसह फायद्याचीच ठरावी यासाठी जिजाऊ सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम चालवत असते. त्यासाठी दरवर्षी शेतकऱ्यांना पाच लाख फळरोपे वाटपा बरोबरच इतरही उपक्रम संस्थेमार्फत राबवले जातात.
इतकेच नाही तर तरुणांना सरकारी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध व्हावी यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यासह आता रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग मध्ये देखील मोफत कार्यशाळा सुरु करण्यात आल्या आहेत.ज्या माध्यमातून हजारो तरुणांना विशेष भरती पूर्व प्रशिक्षण देऊन त्यांना उत्तम नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे.
समाज परिवर्तन ही एका दिवसात होणारी गोष्ट नाही काहीतरी चमत्कार घडेल आणि समाजात परिवर्तन घडेल असे कधी होत नाही. इथल्याच माय मातीच्या उदरात एक विचार रुजावावा लागतो. इथल्याच हाडा माणसांच्या माणसांत तो फुललावा लागतो तेव्हा कुठे समाजपरिवर्तन होईल. जिजाऊ संस्थेने नेमका हाच विचार रुजवण्याचे कार्य केले असून ह्याच विचारांनी जडण – घडण होत समाज सक्षमीकरणाचं ध्येय मनाशी बाळगून जिजाऊ नावाची संस्था आज अनेकांच्या जीवनात आधरवड ठरू पाहत आहे.
No comments:
Post a Comment