पोलिसांची नाकाबंदी व गस्ती पथके कागदावर, तळीरामांची धुमधडाक्यात' गटारी नदी किनाऱ्यावर व बंधाऱ्यावर ?
कल्याण, (संजय कांबळे) : ठाणे जिल्हाधिकारी यांनी माळशेज घाटासह शहापूर, कल्याण, मुरबाड, भिवंडीआणि अंबरनाथ आदी तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे व धबधबे, नदी किनारे, बंधारे इत्यादी ठिकाणी जाण्यास मनाई आदेश लागू केले आहे. त्यानुसार पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी, गस्ती पथके तैनात केल्याचे सांगण्यात आले. परंतु तळीरामांनी हे जुगारून रविवारी 'स्पेशल गटारी, धुमधडाक्यात नदी किनारी, बंधाऱ्याच्या पाण्यात बसून साजरी केली. त्यामुळे पोलिसांची नाकाबंदी व गस्ती पथके केवळ कागदावर होती की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, धबधबे, तलाव, मुरबाड मधील सिध्दगड, डोंगरन्हावे, सोनाळे, हरिश्चंद्र गड, बारवी धरण परिसर, पडाळे डँम, माळशेज घाटातील सर्व धबधबे, पळु, खोपवली, गोरखगड, सिंगापूर, नानेघाट, धसई डँम,आंबेटेबे, शहापूर मधील अशोका धबधबा, भातसा धरण, माहुली किल्ला, आर्जा पर्वत, सापगाव नदी, कंळबे किनारा, कसारा घाट, अंबरनाथ मधील कोंढेश्वर धबधबा, तर कल्याण मधील पावशेपाडा, टिटवाळा,खडवली नदी परिसर, आपटी बंधारा, कांबा परिसर, बंधारे आदी ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात. अशा ठिकाणी जिवीतहानी च्या घटना घडल्या आहेत.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, कोणताहि अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हाधिकारी ठाणे यांनी कलम १४४ लागू केले आहे.
त्यामुळे पोलिसांनी अशा ठिकाणी तळीरामांनी जाऊ नये, हुल्लडबाजी करु नये मद्यपान करून गाड्या चालवू नये, म्हणून जागोजागी नाकाबंदी, गस्ती पथके तैनात करण्यात आल्याचे कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले होते. परंतु आज रविवार असल्याने, तसेच गटारी ही उद्या म्हणजे सोमवारी आल्याने ती आजच साजरी करण्यासाठी पावशेपाडा, मानिवली बंधारा, आपटी, रायते नदी किनारी, खडवली मधील काही ठिकाणी ओलावर, बंधाऱ्याच्या पाण्यात बसून येथेच मद्यपान सुरू असल्याचे चित्र दिसत होते.
आजच गटारी साजरी करण्याचा बेत अनेकांनी आखल्याने व माळशेज घाट बंदी केल्याने अनेकांनी जवळपास ठिकाणांची निवड केली. सकाळ पासून, बिर्ला गेट, म्हारळ, वरप, कांबा, रायते, गोवेली, टिटवाळा, खडवली, येथील मटणाच्या दुकानदावर, तसेच चिकन, मच्छी टप्प्यावर तूफान गर्दी दिसून येत होती, तर तळीरामांची वाईन शाँपवर झुंबड उडाली होती. त्यामुळे पोलिसांची नाकाबंदी, गस्ती पथके, कुठे आहेत हे शोधावे लागत होते?
,
No comments:
Post a Comment