स्मृती दिवस
------------------
*आदिवासींचे लढाऊ नेते कॉ वेस्ता पांडू बारेला*
चोपडा तालुक्यातील आदिवासी भागात उमरटी येथील ७० च्या दशकात एक तरुण आदिवासींच्या जब्रान ज्योत आंदोलनात सहभागी झाला तसेच पुढे ४० वर्षे लढला, सहभागी झाला, त्यावेळी वय अवघे २० वर्षे होते
१९७० /७१ साली "ज्याच्या त्याच्या हाती नांगराचा चट्टा" असेल त्याला जमिनीचा पट्टा, भूमिहीन आदिवासींना जमिनी मिळाल्या पाहिजेत म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने देशभर जी आंदोलने केली त्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात १५ आदिवासी गावात आदिवासींनी मोठे आंदोलन उभे राहिले. त्यासाठी कॉ. वेस्ता बारेला यांनी आपले आयुष्य झोकून दिले.. चळवळ करत असता कम्युनिस्ट पार्टीचे वाग:मय / वृत्तपत्रे नियमित वाचत. त्यांना वाचनाची आवड एवढी होती की, जंगलात तेंदू पत्ता, डिंक जमा, शेतात काम करायला गेले तरी पुस्तक सोबत घेऊन जात.
दुसरे म्हणजे त्या काळात जळगाव जिल्हा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला होता. स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांचे शैक्षणिक कार्य आदिवासी भागात होते. त्यांची एक मोठी परिषद करजाना गावात झाली. हजारो आदिवासी जमले लाऊड स्पीकर वरून जाहीर भाषण करताना त्यांनी जाहीर आवाहन केले की, कोण आहेत वेस्ता पांडू बारेला? त्यांनी स्टेजवर यावे. पण ते स्टेजवर गेले नाहीत. गेले असते तर त्यांच्या स्वतःचा विकास झाला असता, परंतु त्यांनी कमुनिस्ट पक्षाची कास व आदिवासींची साथ सोडली नाही.
त्या काळात आदिवासींच्या अठरा-वीस गावात बऱ्यापैकी शिक्षण झालेले ते एकमेव तरुण होते. त्यामुळे घराण्यात मुलांचे शिक्षणाकडेही त्यांनी लक्ष दिले, सुदैवाने त्यांच्या घराण्यात मुलींची संख्या बऱ्यापैकी आहे. या सर्वच मुली छोट्या छोट्या नोकऱ्यांपासून मध्यम हुद्द्यावर सरकारी नोकऱ्या करीत आहेत. पुतण्या प्रल्हाद बारेला पोलीस पाटील आहेत. भाऊ प्रेमसिंग बा त्यांचा वारसा चालवत आहेत
त्याकाळी आदिवासी भागात रस्ते नव्हते. एसटी सत्रासेन पर्यंतच असायची. अशावेळी तालुक्याच्या ठिकाणी येणे जाणे म्हणजे ४० किलोमीटर पायपीट होती आणि आदिवासीं मध्ये फॉरेस्ट विभागाची फार मोठी दहशत होती. त्यात सरकारने पोलिसांची मदत घेऊन आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न असायचा परंतु आदिवासींनी सत्याग्रह केले..सनदशीर आंदोलनातून कॉ. बारेला यांनी त्यांना धीट बनवले. सरकारने त्यांचे सकट कॉ जुलाल लंके, माधव धनगर, अमृत बाविस्कर याना तुरुंगातही टाकले होते. त्यावेळी अक्षरशत्रू आदिवासींना कोर्ट कचेरी, भाषा सर्व अपरिचित होती, अशावेळी कॉम्रेड वेस्ता पांडू बारेला यांनीच मदत केली, चोपड्यातील कॉम्रेड माधव नारायण धनगर यांचे घर तर उमरटी चे आदिवासींना हक्काचे घर होते.
जळगाव जिल्ह्यात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार सना भालेराव, व्ही बी मोरे यांच्या नेतृत्वात शेतमजूर आदिवासी चळवळी चालत. त्यांचेच नेतृत्वाखाली आदिवासी गावातील आदिवासींचा प्रचंड पायी मोर्चा चोपडा ते जळगाव कलेक्टर कचेरीवर आणण्यात आला. रस्त्यात गोरगावले येथील कॉ अमृत भीवजी बाविस्कर यांनी आदिवासींची चांगली व्यवस्था केली होती व आदिवासी भागात अकुलखेडा गावाचे पहिले सरपंच कॉ जुलाल चींधू लंके हे आदिवासी भागात जाऊन हस्त पत्रक वाटप करणे आदिवासींची मेळावे घेणे मोर्चे काढणे काम करत असत.. त्यांचेच्या मार्गदर्शनात कॉ. बारेला यांचे नेतृत्व विकसित होत गेले..१९७४ साली आणीबाणी लागली. त्यावेळी जंगल सत्याग्रह मागे घ्यावा लागला कारण इंदिरा गांधींच्या २० कलमी कार्यक्रमात आदिवासींना जमीन मिळेल असे तऱ्हेची परिस्थिती निर्माण झाली होती परंतु जमिनी मिळाल्या नाहीत, उलट केंद्र सरकारने फॉरेस्ट प्रीझर्वेशन कायदा वटहुकूम काढल्याने आदिवासींना जमिनी मिळवण्याच्या लढा मागे पडला. त्यानंतर २० वर्ष सतत आदिवासींच्या नवाड जमिनीचा प्रश्न, रस्ते, बस वाहतूक, शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगार हमीचे , विद्युतीकरण घरकुलांचे प्रश्न याबाबतीत भारतीय कम्युनिस्ट पार्टी शेतमजूर युनियन त्यांची सतत आंदोलने सुरू होती. त्यात कॉम्रेड वेस्ता पांडू बारेला यांचा सहभाग मोलाचा राहिला आहे. त्यांना उमटी ग्रामपंचायत तीन वेळा सरपंच निवडून दिले.
त्यांनी सरपंच पदाला संपूर्ण न्याय दिला त्यात उमर्टी गावाला चोपडे तालुक्यात आदिवासीना जास्त घरकुले मंजूर करून आणली. गावात ग्रामपंचायत कोंडवाडा बांधला. बारमाही बस सुरू रहावी म्हणून पाठपुरावा केला एवढेच काय? चोपडा वाया सतरासेन मार्गे ४० किलोमीटर फेऱ्याची उमरटी बस चोपडा खाऱ्यापाडा मार्गे सुरु करा यासाठीही पाठपुरावा केला.काही दिवस बस चालली सुध्धा!!. त्यामुळे आदिवासींच्या वेळ आणि पैसा आणि ६/७ किलोमीटर फेरा वाचला .हा रस्ता बऱ्यापैकी तयार झाला आहे. या पाठीमागे कॉम्रेड बारेला यांचे योगदान कोणी विसरू शकणार नाही त्यांत त्यांचे गावातील मित्र.गावाचे पहिले माजी सरपंच श्री भीम सिंग शंकरसिंग परदेशी हे देखील त्यांना साथ देत..
त्यांना कामाच्या धावपळीमुळे हृदयविकार जडला त्यावेळी एन्जोप्लास्टी करावी लागली होती मुंबईला नायर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी दिवंगत काँ नारायण घागरे यांनी मदत केली होती. मला तीन दिवस मुक्काम करावा लागला होता त्यानंतर ते बारा वर्षे वाचले
आदिवासींच्या जमिनीची अतिक्रमणाची पात्रता तपासण्यासाठी दोनदा मोठे मोठे कॅम्प आदिवासी भागात लावण्यात आले. संपूर्ण आदिवासींचे कोर्ट केसेस पुरावे त्यांचे वारस दाखले, सर्व संबंधित कागदपत्रे ही सर्व कारकुनी काम करण्यासाठी वेस्ता बारेला यांनी खूप मेहनत घेतली. उमर्टी गावी काँ स. ना. भालेराव हयात असताना एकदा आणि दुसऱ्यांदा २००३ साली आदिवासींच्या मोठ्या परिषदा घेतल्या. दुसऱ्या परिषदेत आदिवासींच्या विकाससाठी *उमरटी जाहीरनामा* मंजूर झाला आहे. त्यावेळी पुस्तिका छापण्यात आली. ती केंद्र सरकार राज्य सरकार यांना पाठवण्यात आली. त्या जाहीरनाम्यातील बऱ्याचशा मागण्या पूर्ण देखील झाल्या आहेत. २००६ झाली दिलेल्या केंद्रस्थानी डाव्या पक्षांची ६१ खासदार निवडून आले. त्यात पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात यूपीए सरकार निवडले त्यांना पाठिंबा देताना डाव्या पक्षानी आदिवासींचा वन जमिनीच्या प्रश्न उचलून धरला त्यात सरकारला वनाधिकार कायदा करावा लागला. त्यातून चोपडे तालुका जळगाव जिल्ह्यातच काय संपूर्ण देशात आदिवासींना त्यांच्या सत्याग्रहाच्या आधारे जमिनी मिळाल्या, आज आदिवासी भागात जमिनी आदिवासी कसत आहेत, जी काही सुबत्ता निर्माण झालेली आहे, त्या पाठीमागे दिवंगत कॉम्रेड वेस्ता बारेला यांची योगदान नाकारून चालणार नाही.. अशा या आदिवासींच्या सेवाभावी लढाऊ नेत्याचे १७ जुलै २०११ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृती दिनाला आमचा क्रांतिकारी लाल सलाम💐💐
*लेखक... कॉ. अमृत महाजन (चोपडा) राष्ट्रीय कौन्सिल मेंबर भारतीय खेत मजदूर युनियन*
No comments:
Post a Comment