आरोग्य सभापती संदेश ढोणे यांनी म्हसेपाडा येथे भेट देऊन दिल्या मार्गदर्शन सूचना !!
जव्हार, जितेंद्र मोरघा :
विक्रमगड तालुक्यातील म्हसेपाडा येथे लावण्या चव्हाण या दीड महिन्याच्या चिमुकलीचा जीव गेला, त्या अनुषंगाने बालकाच्या आईवडिलांची भेट घेऊन आरोग्य आणि बांधकाम समिती सभापती संदेश ढोणे यांनी म्हसेपाडा येथे संबंधित सर्व अधिकाऱ्यांसह भेट देऊन मार्गदर्शनपर सूचना दिल्या.
सदर चिमुकलीचा मृत्यू हा अत्यंत दुर्दैवी असल्याची खंत व्यक्त करून यापुढे अशी घटना घडू नये यासाठी संपर्कहीन असलेल्या म्हसेपाडा येथे आरोग्य यंत्रणेने दररोज संपूर्ण गावाची तपासणी करण्याच्या सूचना यावेळी सभापती संदेश ढोणे यांनी दिल्या, तसेच सदर चिमुकलीची माता प्रसूती झाल्यामुळे तिची देखील नियमित तपासणी करण्यात यावी असे सांगितले. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र परळी अंतर्गत गारगाव पथकातील वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र मलवाडा, व त्या अंतर्गत येणारे उपकेंद्र वाकी येथील वैद्यकीय अधिकारी यांनी आपापली वेळ ठरवून गावात दररोज येऊन प्रत्येकाची तपासणी करावी व लहान आजारांसाठी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, असे सभापती संदेश ढोणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केले.
यावेळी दोन सदस्यीय समिती नेमून बालकाच्या मृत्यूची चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले.
म्हसेपाडा ते पीक या रस्त्यावर हा बंधारा असून आपत्कालीन परिस्थितीत म्हसेपाडा येथील नागरिकांना ये जा करण्यासाठी लघुपाटबंधारे विभागांतर्गत तात्पुरती सुरक्षित उपाय योजना करण्याबाबतच्या सूचना उपअभियंता लघुपाटबंधारे यांना करण्यात आल्या.
डिसेंबर 2022 रोजी वनविभागाकडील ३/२ चा प्रस्ताव मंजूर होऊन रस्त्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे, सद्यस्थितीत आंबेपाडा (गारगाव) ते टोपलेपाडा दरम्यान कच्चा रस्ता उपलब्ध असून सदर रस्ता 2 कि.मी इतक्या अंतराचा आहे.परंतु या रस्त्याचे काम करण्यासाठी मग्रारोहयो अंतर्गत मजुरांचे आधार कार्ड अपडेट झाले नसल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वी होऊ शकले नाही. याबाबत तात्काळ शिबीर आयोजित करून मजुरांचे आधार कार्ड अपडेट करून घेण्याचे आदेश सभापतींनी गारगाव ग्रामसेवकांना दिले.
सदर पाडा हा सम्पर्कहीन असल्यामुळे पावसाळ्यात स्वस्त धान्य गावातच वाटप केले जावे, अशा सूचना उपस्थित पुरवठा निरीक्षक व रास्त धान्य दुकानदारांना दिल्या.
यावेळी म्हासेपाडा येथील जिल्हा परिषदे च्या शाळेची चौकशी सभापती संदेश ढोणे यांनी केली.सदर शाळेचा पट २३ इतका असून शाळेतील शिक्षक नियमित शाळेत येतात याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी डॉ निंबाळकर तालुका वैद्यकीय अधिकारी विक्रमगड, डॉ कुलकर्णी तालुका वैद्यकीय अधिकारी वाडा डॉ योगेश निवासी वैद्यकीय अधिकारी गारगाव, दीपक पाटील उपसरपंच ग्रामपंचायत पीक, वाघ ग्रामसेवक ग्रामपंचायत मलवाडा, . चौधरी ग्रामपंचायत गारगाव, डॉ ठक्कर वैद्यकिय अधिकारी मलवाडा, सूर्यवंशी पुरवठा निरीक्षक तहसील विक्रमगड, लहांगे क. अभियंता लघु पाटबंधारे विभाग वाडा, बोरसे उप अभियंता बांधकाम विभाग प स विक्रमगड, डाबेराव क. अभियंता बांधकाम विभाग प स विक्रमगड, जाधव तलाठी सजा साखरे व ईतर सबंधित विभागाचे कर्मचारी अधिकारी हजर होते.
No comments:
Post a Comment