पावसाच्या उघडिपीनंतर साथीच्या आजाराचा पूर, खाजगीसह शासकीय रुग्णालये ओव्हरप्लो !!
कल्याण, (संजय कांबळे) : गेल्या आठवड्यापासून ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे,भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, शहापूर आणि मुरबाड भागात अनेक सखल ठिकाणी पावसाचे पाणी भरले होते. पावसाचे पाणी ओसरले असले तरी घाणीचे साम्राज्य पसरल्याने विविध साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. यामुळे खाजगी सह शासकीय रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत.
जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते, नद्यांना आलेल्या पुराचे पाणी लोकांच्या घरात देखील शिरले होते, म्हारळ, कांबा,वरप, कल्याण शिवाजी चौक, भिवंडी तीनबत्ती नाका, वाशिंद परिसर, अंबरनाथ,बदलापूर इत्यादी परिसरात पाणीच पाणी होते. पावसाने उघडिप दिल्यानंतर रस्त्याच्या कडेला कच-याचे डिग, दुर्गंधीचे पाणी, तुंबलेली गटारे, पिण्यासाठी अशुद्ध पाणी, मच्छर, डास, या सर्वाचा परिणाम म्हणून मलेरिया, टायफॉईड, कावीळ, सर्दी, ताप, जुलाब,अशा आजाराचे अनेक रुग्ण सध्या, खाजगी तसेच शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कल्याण तालुक्याचा विचार केला तर मामणोली, वाहोली, रायते, म्हसकळ, निंबवली आदी गावातील टायफॉईड, जुलाब, चे रुग्ण गोवेली ग्रामीण रुग्णालयात भर्ती झाले आहेत. शिवाय खडवली, दहागांव प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील रोज बहुसंख्य रुग्ण उपचारासाठी येत आहेत. शिरढोण खोणी परिसरातील एक रुग्ण डेंग्यू चा असून तो ग्रामीण रुग्णालय बदलापूर येथे उपचार घेत आहे. विशेष म्हणजे खडवली, दहागांव, आणि निळजे या तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात कावीळ, अतिसार, ग्रँस्टो चा एकही रुग्ण नसल्याचा रिपोर्ट आहे. ही समाधानाची बाब आहे.
या संदर्भात कल्याण पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या दहागांव प्राथमिक आरोग्य केंद्र दहागांव आरोग्य पथका मार्फत सव्हेक्षण सुरू केले आहे, पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. ताप, उलटी, अतिसार यासाठी पुरग्रस्त भागात घरोघरी जाऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार देण्यात येत आहे. असा दावा आरोग्य विभागाने केला आहे.तसेच या बाबतीत ग्रामसेवकांना पत्रे देण्यात आली असून आज आरोग्य कर्मचारी यांची पंचायत समिती ला बैठक घेण्यात आली आहे. असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भारत मासाळ यांनी सांगितले.
तथापि सध्या पावसाचे प्रमाण वाढत आहे, त्यानुसार साथीचे आजार देखील वाढतील, याचा फायदा काही बोगस डॉक्टर मंडळी घेऊ शकतात, याकडे देखील आरोग्य विभागाने लक्ष द्यायला हवे.
No comments:
Post a Comment