त्र्यंबकमधील लाचखोर तहसीलदार बाहिरमचा खाजगी चालकही कोट्यवधीची माया जमावल्या प्रकरणी चर्चेत !!
*ठाणे जिल्ह्यातही असाच प्रकार सुरु असल्याची शक्यता*
भिवंडी, दिं, ८, अरुण पाटील (कोपर) :
लाचखोर त्र्यंबक तहसीलदार नरेश बहिरमला रंगेहाथ पकडल्यानंतर त्र्यंबक तहसीलदारांच्या अशासकीय (खाजगी ) वाहन चालकाचे कारनामे देखील चर्चेत आले आहेत. या चालकाचे बहिरम याच्याशी दैनंदिन साटेलोटे असल्याची चर्चा असून, त्याच्या कथा आता चर्चिल्या जाऊ लागल्या आहेत. अशाच प्रकारे ठाणे जिल्ह्यातही तहासिदराचे खाजगी वाहन चालक व खाजगी वसुली इसम कार्यरत असल्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. काही वर्षा
पुर्वी अश्याच एका प्रकरणात ठाणे तहसिलदारांच्या एका संशयित खाजगी इसमाला एसीबीने रंगेहाथ पकडल्याची चर्चा आहे.
तब्बल १५ वर्षांपासून त्र्यंबक तहसीलदारांच्या वाहनावर खासगी चालक म्हणून काम करणार्या या चालकाने तहसीलदारांच्या वरद हस्ताने त्र्यंबक तालुक्यात मोठी माया जमवल्याचे बोलले जात आहे. हा चालक संशयित आरोपी बहिरमच्या वाहनावरही कार्यरत होता. चालकाच्या लिलया कारनाम्यांमुळे तो बहिरमच्या गळ्यातील ताईत बनल्याचीही चर्चा आहे. प्रत्येक तहसीलदाराचे अशासकीय (खाजगी) सारथ्य त्याने अतिशय चोखपणे केल्याचे अनेक किस्से त्र्यंबकमध्ये चर्चेत आहेत. त्यामुळे बहिरम नंतर आता या चालकाचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.
त्र्यंबक तालुक्यात तहसीलदारापेक्षा या चालकाच्या नावाची चर्चा आहे. प्रारंभी बचतगटाचे काम करणारा चालक म्हणून काम करू लागला. काही वर्षांपूर्वी तो त्र्यंबक तहसीलदारांच्या सरकारी वाहनावर चालक म्हणून नियुक्त झाला. तेव्हापासून आता पर्यंत अशासकीय (खाजगी) चालक म्हणून तोच तहसीलदारांच्या वाहनांचे सारथ्य करत असल्याचे समजते.
विशेष म्हणजे त्र्यंबक तालुक्यात तहसीलदार म्हणून बदलून जाणार्या प्रत्येक तहसीलदाराला या चालकानेे भुरळ घातली. त्र्यंबक तहसीलदारांची अनेक अशासकीय कामे हा पठ्ठ्या लिलया पार पाडतो. कुठून काय घ्यायचे हे इत्यंभूत माहित असल्याने तहसीलदारांचा बराचसा अशासकीय कारभार हाच पठ्ठ्या सांभाळत असल्याचेही समजते. या व्यक्तीचे कारनामे संपूर्ण जिल्ह्यात चवीचवीने चर्चिले जात आहेत. त्र्यंबक तहसीलदार कार्यालयाशी संबधित सर्व सेटिंग्ज हा चालकच करत असल्याने त्याला प्रति तहसीलदारांचा अघोषित दर्जा प्राप्त झाला आहे.
गेल्या १५ वर्षांपासून हा खासगी चालक तहसीलदारांच्या वाहनावर काम करत असल्याने त्याने जमवलेली माया डोळे पांढरे करणारी आहे. साधा वाहनचालक असला तरी त्याच्या नावावर अनेक तहसीलदारांनी माया जमविली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याचा त्र्यंबकमध्ये आलिशान बंगला देखील असून, त्र्यंबक रोडवरील एक मोठे हॉटेल त्याच्या मालकीचे असल्याचे सांगितले जात आहे.
या वाहनचालकाने त्र्यंबक तालुक्यातील पेगलवाडी, अंजेनेरी शिवारात कोट्यवधी रूपयांचे भूखंड घेतल्याचे समजते. तालुक्यातील गौण खनिजाचे हप्ते, जमिनीच्या वादातील मध्यस्थी तसेच विविध सेटिंगमार्फत त्याने माया जमविल्याचे बोलले जाते. त्यामुळे या अशासकीय चालकाची देखील एसीबीने चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
No comments:
Post a Comment