आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याने तब्बल 70 वर्षांनंतर उजळले ठाकूर पाडा परिसरातील रस्ते !!
*आनंद गगनात मावेना आमच्या भगिनींचा*
कल्याण, सचिन बुटाला : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या टिटवाळा परिसरातील मण्याच्या पाड्यावर काल खऱ्या अर्थाने दिवाळी पहाट उगवली. या भागातील रस्ते तब्बल 70 वर्षांनंतर उजळून निघाले आणि या गावातील रस्त्यांवरचा अंधःकार दूर झाला. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी ठाकूर पाडा परिसराला पथदिव्यांचे हे गिफ्ट देऊन लहान मुलांसोबत दिवाळी साजरी केल्याचे दिसून आले.
टिटवाळा पूर्वेतील या आदिवासी वाडीवर गेली 7 दशके अंधकार होता. सुर्यास्तानंतर तर या भागाचे अस्तित्वही लोप पावायचे. या प्रश्नासाठी श्रमजीवी संघटनेकडूनही केडीएमसीकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र विकासकामांच्या भूमीपुजनासाठी काही महिन्यांपूर्वी आमदार विश्वनाथ भोईर या आदिवासी वाडीवर आले आणि तिथली परिस्थिती पाहून त्यांना धक्काच बसला. आणि मग इथल्या या लोकांना अंधकारातून बाहेर काढण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झाले. केडीएमसीच्या विद्युत विभागाकडे त्यांच्याकडून या भागात तातडीने पथदिवे बसवण्यासाठी पत्र देण्यात आले. केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनीही या विषयाचे गांभीर्य ओळखून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व आदिवासी वस्तींवर पथ दिवे बसवण्यासाठी बजेटमध्ये 75 लाखांची तरतूद केली. ज्यातून सर्व मिळून 129 पथदिवे या आदिवासी पाड्यांवर बसवले जाणार आहेत. त्यापैकी ठाकूर पाडा भागात 16 लाखांचा खर्च करून 25 पथदिवे बसवण्यात आल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.
दिवाळीचा पहिला दिवस असणाऱ्या धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर काल हे पथदिवे प्रज्वलित झाले आणि त्यासोबतच केवळ या वाडीवरचा नव्हे तर या लोकांच्या मनातील अंधकारही दूर झाला. इतक्या वर्षानंतर प्रकाशमान झालेले रस्ते बघून एकच जल्लोष सुरू झाला. अनेकांचे डोळे आनंदाश्रुंनी पाणावले. तर लहान मुलांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. पथ दिवे प्रज्वलित झाल्यानंतर 15 - 20 मिनिटे ही मुले नाचत आणि उड्या मारत होती. आमदार विश्वनाथ भोईरही मग या चिमुरड्यांसोबत फटाके वाजवून त्यांच्या आनंदात सहभागी झाले होते. पथ दिव्यांप्रमाणेच या भागातील इतर मूलभूत समस्याही आपण लवकरच दूर करू आणि इथल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणू अशी प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केली. तर आमच्या आदिवासी वाडीवर येणारे विश्वनाथ भोईर हे पहिले आमदार असल्याची प्रतिक्रिया इथल्या स्थानिकांनी दिली.
यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह माजी नगरसेवक जयवंत भोईर, शिवसेना उपशहरप्रमुख विजय मारुती देशेकर, विभाग संघटक सचिन मळये, उपविभाग प्रमुख बबलेश पाटील, नितिन सिंग, शाखाप्रमुख अशोक चौरे, सिध्दांत कसबे, किरण पाटील, उपशाखाप्रमुख अरविंद शिगवण, गटप्रमुख प्रथमेश देवघरकर, ऋषिकेश गावडे, ठाकुरपाडा रहिवासी एकनाथ शिंदे, धापटे सर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment