कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान, ऐन दिवाळीत अन्नात माती? कृषी विभागाकडून पाहणी !!
कल्याण (संजय कांबळे) : काल सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी वादळी पाऊसामुळे शेतात कापून ठेवलेले भात पिक भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ऐन दिवाळीत शेतक-याच्या अन्नात माती कालवली गेल्याने शेतकर्यांची दिवाळी कडू झाली आहे,
काल सायंकाळी अचानक कल्याण तालुक्यासह शहापूर, मुरबाड, बदलापूर आदी परिसरात वादळी वा-यासह अवकाळी पाऊस पडला. सध्या ठाणे जिल्ह्यात सर्वत्र भात कापणी सुरू आहे. कल्याण तालुक्यातील ४६ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गावात साधारणपणे दसरा झाल्यावर भात कापणीला सुरुवात करतात, काही ठिकाणी सुरुवात झाली देखील पण काही गावात मजुर न मिळाल्याने उशिरा कापणी चालू केली, तालुक्यातील मांजर्ली, आपटी, दहागाव, चौरे, मामणोली, घोटसई, मानिवली, आदी बहुतांश गावात भात कापून ते शेतात व बांधावर ठेवलेले होते, दिवाळी झाल्यावर व चांगले सुकल्यावर भारे बांधून ते घराजवळ बनवलेल्या खळ्यात नेऊन ठेवायचे व वेळेनुसार झोडायचे असे शेतकऱ्यांनी ठरविले होते.
पण काल सायंकाळी ५ नंतर अचानक वादळी वा-यासह व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला, हे इतके अचानक घडले की शेतकरी काही करु शकत नव्हता, उघड्या डोळ्यांनी कापलेले भात शेतात भिजताना पाहत होता, मांजर्ली येथील संजय घारे,बारकू घारे, विलास घारे या शेतकऱ्यांच्या शेतात तर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, त्यामुळे हाता तोंडाशी आलेला अन्नाचा घास मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रु निघत होते, आता आम्ही वर्षभर काय खायचे ?असा प्रश्न ते विचारत होते.
अशीच परिस्थिती मुरबाड, शहापूर, आदी तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत कल्याण तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आमच्या विभागाचे कर्मचारी व विम्याचे कर्मचारी प्रत्येक विभागात गेले आहेत, शिवाय शेतकऱ्यांनी भिजलेल्या भाताचे फोटो काढून ठेवावेत असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment