Monday, 6 November 2023

एनआरसी कामगारांची दिवाळी अंधारात !!

एनआरसी कामगारांची दिवाळी अंधारात !!

*येत्या निवडणुकीत धडा शिकवणार*

कल्याण, संदीप शेंडगे : चार दिवसांवर दिवाळी आली असून कामगारांना त्यांच्या हक्काची देणी अद्याप मिळाली नाहीत त्यामुळे याही वर्षी कामगारांना आपली दिवाळी अंधारातच घालवावी लागणार आहे. त्यामूळे कामगार वर्गात तीव्र संताप निर्माण झाला आहे.

एकेकाळी एनआरसी कामगारांचा एक बोनस हा इतर कामगारांच्या चार पगारा इतका असायचा, या कामगारांचा दिवाळी सण म्हणजे मोठा महोत्सव असायचा परंतु याच एनआरसी कामगारांना गेल्या पंधरा वर्षात एक फुटी कवडी सुद्धा मिळाली नाही.

दारिद्र्याच्या खाईत कामगार__

एकेकाळी संपूर्ण आशिया खंडात नावलौकिक असलेला तसेच भारतातील रेयोन उत्पादन करणारा सर्वात मोठा कारखाना म्हणून एनआरसी कंपनीची ओळख होती. तोच एनआरसी कारखाना गेल्या पंधरा वर्षापासून बंद असून कामगार मात्र न्यायाची प्रतीक्षा करीत आहे. एकाचवेळी हजारो कामगार दारिद्र्याच्या खाईत लोटले गेले तर शेकडो कामगार पैशाची वाट पाहून देवा घरी गेले. निम्याहून अधिक कामगार वॉचमन, सूरक्षा रक्षकाचे काम नाईलाजाने काम करत आहेत. अनेकांना वय झाल्यामुळे नोकऱ्याच मिळाल्या नाहीत. आजही शेकडो कामगारांच्या मुलांच्या शाळेच्या फी भरल्या नाहीत म्हणून त्यांना दाखले मिळत नाहीत. अनेक कामगार मुलांच्या नोकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. अनेक कामगारांनी परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत तर अनेक कामगारांच्या मुलांनी देखील नैराश्य येऊन आत्महत्या केल्या आहेत.

कारखाना का बंद झाला__

शासनाचे कामगार विरोधी धोरण, कामगार कायद्यातील बदल, जमिनीला आलेला सोन्यासारखा भाव, भांडवलधार्जीणी व्यवस्था, युनियन मधील अंतर्गत कलह, गुंड व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कामगार नेते, कामगार वर्गात पडलेली फूट, युनियन मध्ये राजकीय पक्षांचा सहभाग, कंपनी मालकांना मिळत असलेले राजकीय पाठबळ आणि पोलीस पाठबळ, स्वतंत्र कामगार न्यायालय नसल्याने कामगारांना उशिरा मिळणारा न्याय आणि मालकांना न्यायालयीन संरक्षण, कामगार कायद्यातील पळवाटा या पार्श्वभूमीवर चालू स्थितीत असलेले अनेक कारखाने बंद झाले त्यात एनआरसी कारखाना सन २००९ साली बंद होऊन १५ हजार स्थायी अस्थायी कामगार एकाच वेळी देशोधडीला लागले.

एनसीएलटी कोर्टाकडून कामगारांना अशा__ 

काही कामगारांनी युनियनच्या माध्यमातून एनसीएलटी कोर्टात केस दाखल करून माय बाप कोर्टाकडून न्यायाची प्रतीक्षा करू लागले परंतू पंधरा वर्षे उलटूनही कामगारांना अद्यापही न्याय मिळाला नसून तारखांवर तारखा पडत आहेत सध्या एनसीएलटी कोर्ट दिल्ली येथे ७ नोव्हेंबरला सुनावणी आहे. दिल्ली एनसीएलटी कोर्टात कामगारांच्या बाजूने तात्काळ निकाल लागेल याची शाश्वती नसून पुढील तारीख मिळण्याची शक्यता आहे. परंतु कामगारांना न्याय मिळण्याची कोर्टाकडून आशा आहे असे आयटकचे महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी उदय चौधरी सांगितले आहे. आजही कोर्टावर कामगारांचा विश्वास असून नेत्यांवरील कामगारांचा विश्वास उडाला आहे.

कंपनीचे मौल्यवान भंगार विकून देनी देता आली असती__

आंबिवली रेल्वे स्थानकाला लागून एनआरसी कारखान्याची साडेचारशे एकर जमीन आहे. त्या जमिनीवर एन आर सी कारखाना तसेच आलिशान एनआरसी कामगार वसाहत होती. परंतु अलीकडच्या काळात ही सर्व जमीन अदानी समूहाने लिलावाद्वारे विकत घेतली असल्याने संपूर्ण कंपनीच्या जागेवर आदानी समूहाने ताबा मिळविला आहे. कंपनी प्रशासनाने काही गुंड व नेत्यांना हाताशी धरुन संपूर्ण कारखाना पूर्णपणे जमीनोध्वस्त करून त्याचे भंगार सुद्धा विकण्यात आले आहे. काहींच्या मते या कारखान्याचे मौल्यवान होते. उच्च प्रतीचे लोखंड जे आजही जशास तसे शाबूत होते त्याचप्रमाणे तांबे, पितळ, शिसे, पारा, सोने, पंचधातू पासून कंपनीचे मूळ स्ट्रक्चर तयार करण्यात आले होते. हे मौल्यवान भंगार विकून सुद्धा कामगारांची देणी देणे शक्य होते परंतु कंपनी प्रशासनाने तसे न करता काही कामगार नेत्यांना आणि गुंडांना हाताशी धरून राजरोसपणे कंपनीचे भंगार विकले आहे.

अदानी समूहासमोर सत्ताधारी मंत्री नम्र तर विरोधी हतबल__

अनेक मंत्र्या संत्र्यांची दारे ठोठावली अनेकांची घरे वाजवली, अनेक मंत्र्यांच्या कार्यालयात खेटे मारले अनेक नेत्यांना भेटले 
अलीकडच्याच काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन कामगार भेटले, माजी मंत्री गणेश नाईक यांच्या कार्यालयात अनेक बैठका झाल्या. माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट देखील झाली तसेच एनआरसी कॉलनी येथे क्रिकेटचे सामने भरविण्यात आले होते त्यावेळी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी एनआरसी महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून कामगारांना न्याय देण्याची विनंती केली होती तसे लेखी निवेदन दिले होते. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची देखील कामगारांनी भेट घेतली शरद पवार यांनी अदानी समूहा बरोबर चर्चा देखील केली परंतु यातूनही काही निष्पन्न झाले नाही. 

कामगारांना कोणाकडूनही न्याय मिळत नसल्याने कामगार पूर्णपणे हतबल  झाला आहे. न्यायव्यवस्थेवर त्याचा आजही विश्वास आहे.

अदानी समोर नेते हतबल__

केंद्रातील सत्ताधारी विद्यमान खासदार व आमदार हे अदानी समोर नम्रपणे वागत असून त्याच्या विरोधात एक ब्र शब्दही काढायला तयार नाहीत तर विरोधी पक्षात असलेले खासदार व आमदार अदानी समोर हतबल असल्याचे पाहावयास मिळत आहे.

हजारो कोटीची थकबाकी असतानाही आदानी समूहाने एनआरसी कारखान्याच्या जागेवर भले मोठे बेकायदेशीर वेअरहाऊस बांधले आहे या वेअर हाऊसची अनेक नेत्यांनी कामगारांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली परंतु याचा काही उपयोग झाला नाही. 

येत्या निवडणुकीत धडा शिकविणार__

दिल्ली येथील एनसीएलटी कोर्टात ७ नोव्हेंबर रोजी सोनवणे असून सुनावणी पुढे ढकलण्याची शक्यता आहे परंतु कामगारांचा न्यायव्यवस्थेवर आजही आम्ही विश्वास आहे परंतु जे केंद्रात व राज्यात असलेले सरकार कामगारांना न्याय देण्यास अपयशी ठरत असल्याने येत्या निवडणुकीत एन आर सी कामगार धडा शिकविल्याशिवाय 
राहणार नाहीत.

1 comment:

  1. प्रत्यक्षात लोकांनी ऐक जुटीने मतदाना वर बहिष्कार टाकला पाहिजे

    ReplyDelete

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...