शिर्डी साई मंदिरात दर्शनासाठी आता ग्रामस्थांना ओळख पत्राची आवश्यकता !!
भिवंडी, दिं,१७, अरुण पाटील (कोपर) :
आता शिर्डीतील साई मंदीरात (समाधी मंदिर) प्रवेश करताना शिर्डी ग्रामस्थांना ओळखपत्र दाखवूनच मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर साई संस्थानानं हा आदेश जारी केला आहे.
शिर्डीच्या साई मंदिरात प्रवेश करताना ग्रामस्थांना ओळखपत्र दाखवावं लागणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर साई संस्थानकडून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. साई संस्थानानं उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत साई मंदिर परिसरातील महाव्दारांवर चिकटवून नियम लागू केले आहेत.
शिर्डीच्या साई मंदिरात देशभरातून साईभक्त दर्शनासाठी येतात. या भाविकांना दर्शन रांगेतून साई मंदिरात प्रवेश दिला जातो. या सोबतच शिर्डी, पंचक्रोशीतील अनेक नागरिक साईंच्या दर्शनाला नियमित येत असतात. त्यांना विशिष्ट गेटमधून प्रवेश दिला जातो. आता या ग्रामस्थांना साई मंदिरात प्रवेश करण्यासाठी ओळखपत्र दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याबाबत याचिका दाखल केली होती. श्री. साई मंदिरात सीआयएसएफ सुरक्षेची गरज असल्याचं त्यांनी जनहित याचिकेत म्हटलं होतं. या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं ग्रामस्थांना साईमंदिर तसंच परिसरात वावरताना ओळखपत्र दाखवणं बंधनकारक असल्याचा आदेश दिला आहे.
आदेशाची अंमलबजावणी सुरू : शिर्डीच्या स्थानिक ग्रामस्थांना साईमंदिर परिसरातील ग्राम दैवतांच्या दर्शनाला परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. यासाठी स्थानिकांनी वेळोवेळी साई संस्थानाकडं बैठका घेऊन तक्रारी केल्या होत्या. मात्र, आता प्रशासनानं उच्च न्यायालयाच्या १० डिसेंबरच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू केल्यानं ग्रामस्थ काय पावले उचलतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
साईबाबा समाधी मंदिराला भेट देण्यासाठी जगभरातून मोठ्या संख्येनं साई भक्त शिर्डीत येतात. त्यामुळं शिर्डी ग्रामस्थांना त्यांचं आधारकार्ड तपासून रजिस्टरमध्ये नावे नोंदवल्यानंतरच गेटमधून प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानंतरच त्यांना साई समाधी, साईबाबांची आरती, गावातील शनी देव मंदिर, महादेव मंदिर, गणपती मंदिराचं सहज दर्शन घेता येणार आहे. तसंच गेट क्रमांक ४ मधून ग्रामस्थांचे आधार कार्ड पाहून त्यांना सोडण्यात येईल, अशा सूचना साई मंदिराचे सुरक्षा अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांनी दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment