फणसवळे गावचे भूमिपुत्र सतीश जोशी "लोककला विशेष गौरव पुरस्कार - २०२३" ने सन्मानित !!
मुंबई - ( दिपक कारकर )
महाराष्ट्रातील कोकण म्हणजे निसर्ग संपदेने नटलेला प्रांत आहे. सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वत रांगा, फेसाळणारा अथांग समुद्र किनारा आणि क्रांतीच्या विचारांची प्रेरणा करणारे महापुरुष यामुळे जगाच्या नकाशावर "कोकणचे" नाव आहे.
अशा निसर्गरम्य कोकणात अनेक लोककलांचा उगम झाला. भजन, भारूड, कलगी-तुरा, तमाशा ह्यातीलच शिमगोत्सवाचे वेध सुरू होता अवघ्या कोकणभर विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात नमन कलेचा सुर गवसताना दिसतो. अशी कोकणातील बहूप्रिय नमन लोककला जोपासणाऱ्या मु.पो.फणसवळे, ( ता.जि.रत्नागिरी ) येथे जन्मलेल्या कोकणभूमिपुत्र अर्थातच एक लेखक/ दिग्दर्शक/ गायक/ गीतकार/ नेपथ्यकार सतीश रामचंद्र जोशी यांना नुकताच "नमन लोककला संस्था ( नोंदणीकृत )" उपरोक्त संस्थेच्या वतीने मुंबईतील साहित्य संघ मंदिर,गिरगाव नाट्यगृह येथे अनेक मान्यवर/प्रेक्षकांच्या उपस्थितीत "लोककला विशेष गौरव पुरस्कार - २०२३" देऊन सन्मानित करण्यात आले.
नमनकार सतीश जोशी यांना लहानपणापासून नमन कलेची आवड, अवघ्या वयाच्या दहाव्या वर्षी श्री कृष्णाची पहिली भूमिका साकार केली. तद्नंतर सन १९८८ मध्ये मुंबई रंगमंचावर आपली कला सादर करण्यासाठी आपल्या मंडळातील हौशी कलाकारांना सोबत घेऊन १९८९ ला पहिला प्रयॊग मुंबई रंगमंचावर साहित्य संघ नाट्यगृहात स्व-लिखित/दिग्दर्शित "सुडसंभ्रम" हे वगनाट्य सादर केले. त्याच बरोबर नारद, श्रावण बाळ, राधा व राजकुमार ह्या भूमिका त्यांनी त्यांच्या तरुण वयात यशस्वीपणे साकारल्या.
गेली ३५ वर्ष नमन या कलेसाठी त्यांनी दिलेलं योगदान विपुलनीय आहे.आता पर्यंत पौराणिक कथेवर आधारित अनेक गणेश पुराण लिहली आहेत. तसेच वगनाट्यांमध्ये काल्पनिक वगनाट्य, ऐतिहासिक वगनाट्य व विनोदी वगनाट्य अशी सुंदर वगनाट्य त्यांनी आपल्या लेखणीतून आणि दिग्दर्शनातून रंगमंचावर सादर केली. मुंबई रंगमंचावर ज्या नाट्यगृहातून आपल्या कलेची सुरवात केली आज त्याच नाट्यगृहात मला पुरस्कार मिळण्याचे भाग्य हा आयुष्यातील एक अविस्मरणीय आनंद आहे, असे सतीश जोशी यांनी बोलताना सांगितले.
"नमन" कलेत सतीश जोशींनी लेखन करताना आजवर गणेश पुराण प्रकारात तारकासुराचा वध, त्रिपुरासुराचा वध, देवांचे गर्व हरण, दुरासदाचे गर्व हरण, कालभैरव, महोत्कट रूप गजाननाचे, समुद्र मंथन,प्रकटला सिध्दीविनायक, गरुडाचे गर्वहरण आदी भावणार्या नाट्यकृती सादर केल्या, तर सुडसंभ्रम, भाव भावाचा कर्दनकाळ, हा वाघ मराठ्यांचा, सुडाग्नी, परदान्या जिता हाय, साक्षात्कार, कुळसंग्राम , आदीशक्ती, कृष्ण हनुमान भेट, राजाचा वाजला बाजा, व आगामी नाटयकृती हवेली हि वगनाट्य त्यांच्या लेखनशैलीतून रंगमंचावर अधिराज्य गाजवत आहेत.
नमन कलेसाठी झटणाऱ्या ह्या उत्तुंग कलाप्रेमी व्यक्तिमत्वाला प्राप्त झालेल्या पुरस्कारा बद्दल श्री हनुमान सेवा मंडळ, फणसवळे ( रजि.), नमन लोककला संस्था ( रजि.) व श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) व विविध स्तरातून त्यांचे अभिनंदनासह कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment