ईडी आणि सीबीआय सारख्या यंत्रणेचा गैरवापर,शरद पवारांची भाजपावर खरमरीत टीका !!
भिवंडी,(कोपर), दिं,११, (अरूण पाटील) :
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडीसह तपास संस्थांच्या होणाऱ्या कारवायांवरून भाजपावर खरमरीत टीका केली. ते पुण्यातील मोदी बाग येथे पत्रकार परिषद बोलत होते.
माजी केंद्रीय कृषीमंत्री मा.शरद पवार म्हणाले, "ईडी आणि सीबीआयसारख्या यंत्रणेचा गैरवापर होत आहे. इतर राज्यांमध्ये मंत्र्यां विरोधात केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर होत आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या घरी छापे टाकणं योग्य नाही. महाराष्ट्रातही तपास यंत्रणाचा वापर वाढला आहे. रोहित पवार यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई अयोग्य आहे. टोकाची दहशत निर्माण केली जात आहे. सक्रिय कार्यकर्त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे."
शरद पवार म्हणाले, "ईडीच्या ५ हजार ९०६ कारवायांपैकी केवळ २५ कारवायांबाबत निर्णय झाला. ईडीकडून केवळ विरोधकांवर कारवाई केली जात आहे. भाजपा सत्तेत आल्यापासून ११५ विरोधी पक्षांच्या नेत्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. ईडीनं कारवाई केलेल्या नेत्यांमध्ये एकाही भाजपा नेत्याचा समावेश नाही. ईडीच्या कारवायाबाबत भाजपाच्या नेत्यांना माहित असते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
राज्यासह देशभरात गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील विविध नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे. ईडीकडून होत असलेल्या या कारवाईवरून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर टीका केली. भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कशा पद्धतीनं कारवाई करण्यात आली आहे, याबाबतची पोलखोल शरद पवार यांनी केली.
यावेळी पवार म्हणाले की, " निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी राजीनामा का दिला आहे, याची कारणमीमांसा स्पष्ट झालेली नाही. याची आम्हला काळजी आहे. आज देशभरात तसेच राज्यात ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. याचे उदाहरण कर्नाटकातील डी. के. शिवकुमार यांच्या चौकशीबाबतीत पहायला मिळाले आहे. कर्नाटकातील दोन नंबरच्या मंत्र्याला अटक करण्यात आली होती."
अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना विनाकारण अटक करण्यात आली होती. तसेच रोहित पवारांच्याबाबतीत देखील त्यांच्या कारखान्याच्या जप्तीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ईडीच्या पाच हजार केसपैकी फक्त पंचवीस केसचा निकाल लागला आहे. त्यातील किती प्रकरणात लोक दोषी आढळले? याचे प्रमाण शुन्य टक्क्यांहून कमी आहे. विशेष म्हणजे २०१४ पासून ईडीने केलेल्या कारवाईपैकी एकही व्यक्ती भाजपाचा नाही. सगळेच विरोधी पक्षातील आहेत. तसेच २००४ ते २०१४ या काँग्रेसच्या सत्तेच्या कालावधीत ईडीनं २६ कारवाई केल्या आहेत. त्यातील ४ नेते कॉंग्रेसचे तर तीन नेते भाजपाचे होते. याचा अर्थ काँग्रेसच्या सत्ताकाळात ईडीचा गैरवापर होत नव्हता. आज ईडीचा उपयोग हा दहशत निर्माण करण्यासाठी करण्यात आहे," असा गंभीर आरोप यावेळी पवार यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, " ईडीनं १८ वर्षात १४७ नेत्यांची चौकशी केली आहे. त्यामध्ये 85 टक्के विरोधी पक्षातील आहेत. भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यावर २०१४ नंतर १२१ लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे. यात ११५ विरोधी पक्षातील आहेत. त्यात काँग्रेसचे २५, टीएमसीचे १९, एनसीपीचे ११, शिवसेनेचे ८, डीएमकेचे ६, बीजेडीचे ६, आरजेडी ५, बीएसपी ५, एसपी ५, टीडीपी ५, आप ३, आयएनएलडी ३, वायएसआरसीपी ३, सीपीएम २, एनसी २, पीडीपी २, आयएनडी २, एमएनएस १ अशा पक्षातील नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून आठ वर्षात १२१ नेत्यांवर कारवाई करण्यात आली असून यात एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विविध विरोधी पक्षाच्या सरकारमधील १४ मंत्री, २४ खासदार, २१ आमदार, ७ माजी खासदार आणि ११ माजी आमदार आहेत. त्यात सर्व विरोधी पक्षातील असून एकही भारतीय जनता पक्षाचा नेता नाही," यावेळी पवार म्हणाले.
रोहित पवार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत मला ईडी कडून अटक देखील होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली आहे. याबाबत पवार यांना विचारले असता म्हणाले की, याबाबत भरवसा नाही. कारण अनिल देशमुख आणि संजय राऊत यांनादेखील अटक करण्यात आली होती.
महा विकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत विचारलं असता ते म्हणाले, की महाविकास आघाडीत जागावाटपाचा फार प्रश्न उरलेला नाही. फक्त प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत निर्णय होणं बाकी आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू असून त्यांच्या हेतुबाबत मी आत्ता शंका घेणार नाही. त्यांनासोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशपातळीवर फक्त तृणमूल काँग्रेसबाबत प्रश्न आहे. त्यांनी पश्चिम बंगालमधे वेगळा लढण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपाचे खासदार अनंत हेगडे यांनी भाजपला ४०० पार हे घटना बदलण्यासाठी पाहिजे असं म्हटलं आहे. यावर पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, "भाजपाला घटना बदलायची आहे. हे तर त्यांना पूर्वीपासून करायचं आहे. आता जर त्यांना चारशेपार खासदार निवडून यायचं आहे. त्यामुळे त्यांना संविधानात बदल करायचा आहे. म्हणून ते आज ४०० पार म्हणत असल्याचं यावेळी पवार म्हणाले."
No comments:
Post a Comment