Wednesday 6 November 2024

चांगले उद्योग गुजरातला आणि विनाशकारी रिफायनरी राजापुरला ? - उध्दव ठाकरे

चांगले उद्योग गुजरातला आणि विनाशकारी रिफायनरी राजापुरला?

उद्योग मंत्र्यांनी स्वतः च्या जिल्ह्यात किती प्रकल्प आणले - कोकणचे भविष्य गुंडांच्या हातात द्यायचे आहे का?

** उद्धव ठाकरे यांचे रत्नागिरीतील सभेत घणाघाती भाषण

रत्नागिरी, (केतन भोज) :-
आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करत आहेत. सिंधुदुर्गात एक वडील आणि दोन भाऊ, रत्नागिरीत दोन भाऊ, मग सर्वसामान्य माता भगिनींनी करायचे काय. मग आता ही घराणेशाही नाही का. मागच्या अडीच वर्षात मींधे सरकारने चांगले प्रकल्प गुजरातला पाठवले आणि विनाशकारी रिफायनरी सारखे प्रकल्प राजापुरात आणले. हा रिफायनरी प्रकल्प मी रद्द करणार म्हणजे करणारच. कोकणात सुरू असलेल्या गुंड शाही राजकारणाला तुम्ही २० तारखेला मतामधून चूड लावल्याशिवाय राहणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे असे घणाघाती भाषण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी येथे आयोजित सभेत केले. रत्नागिरी जलतरण तलाव येथे महा विकास आघाडीच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घणाघाती भाषण केले. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, माजी विधान परिषद सदस्या ऍड. हुस्नबानु खलिफे, शिवसेना नेते अजित यशवंतराव, उल्का विश्वासराव, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रमेश कदम, बशीर मुर्तूझा, जिल्हा प्रमुख विलास चाळके, तालुका प्रमुख बंड्या साळवी, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, माजी नगराध्यक्ष मिलिंद किर, काँग्रेसचे खेत्री, सौ. नेहा माने आदी नेते उपस्थित होते.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोकण कुणाचे गुंडांचे. कोकणचे भविष्य सर्वसामान्य माणसांचे नेतृत्व करणाऱ्याच्या हातात द्यायचे की गुंडांच्या हातात द्यायचे आहे?. कोकणातल्या एकेकाळच्या सोनेरी क्षणांच्या आठवणी बाळ माने यांनी सांगितल्या. वामनराव महाडिक पाहिले खासदार झाले. आपल्याकडे काहीही नव्हतं. तेव्हा आपण एकत्र आलो होतो. हिंदुत्वासाठी एकत्र आलो होतो. मग अशी भाजपला काय अवदसा आली होती की संकट काळात शिवसेनेला बाजूला टाकलीत. आजचे पाप माझ्या हाताने घडलं. हा रत्नागिरीतला गद्दार मी तुम्हाला दिला होता. शेवटच्या क्षणी २००४ साली हे भूत आले. लढलो आपण. तुमचा दुर्दैवाने पराभव झाला. युती झाल्यानंतर तुम्ही परत या भुताला बंडखोरी न करता प्रामाणिक काम केले. आता हे भूत माने वरून उतरून टाकायचेच आहे. २०१९ साली सत्ता आली यांना मंत्री बनवले. ती सुद्धा चूकच. उद्योग मंत्री झाले. बाहेरचे उद्योग किती केले ते सांगा. बाहेरचे उद्योग एक तरी आणला का रत्नागिरीत स्वतःच्या मतदार संघात एक उद्योग आणू शकले नाही असे निरुद्योग मंत्री आता मत मागायला येता? हा लढा निष्ठवांतशी लढा द्यायचा आहे. राजन साळवी खोके घेऊन सुरतेला पळालेले नाहीत. अनेक दडपणे आणली. हटले नाहीत. आता कोण गद्दार आहे ते बघुयात तुम्हीच लढा. गद्दाराला आडवा करून टाकूयात. राजन साळवी यांच्या घरात ठेवलेल्या पुतळ्याची किंमत केली. सिंधुदुर्गात पुतळा कोसळला त्याच काय. महाराजांचा पुतळा आठ महिन्यात पडू शकतो?. मोदींनी महाराष्ट्रात येऊन माफी मागितली. ती म्हणजे कशी गुर्मीत. महाराष्ट्र तुमचं पाय पुसन नाही. हा महाराष्ट्र तुमचं निशाण पुसून टाकेल. 

आमचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर बांधल्या शिवाय राहणार नाही. आणि सुरते मध्ये सुद्धा महाराजांचे मंदिर बांधणार. आमच्या सरकारने शिवभोजन थाळी दिली. त्याचा आता आम्ही विस्तार वाढवणार. गरिबांना १० रुपयात पोटभर अन्न मिळालेच पाहिजे. लाडकी बहीण योजना आणली. 

महिलांसाठी १५०० रुपयात घर चालते काय. महागाई एवढी वाढली आहे की १५०० रुपये घरी येई पर्यंत संपून जात आहेत. आपले सरकार आल्यानंतर राज्यात प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देणार. तुमच्या पायावर तुम्ही उभे राहा. शेतकऱ्यांचं एक रुपयाचं सुद्धा नुकसान होऊ न देता राज्यात पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार. हा माझा निश्चय आहे. महिला पोलिसांसाठी आणि महिला तक्रारदारांसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे उभारणार आहोत. 

रोजगाराच्या नावाने ठणठणाट आहेत. गद्दाराने आपले सरकार पाडले नसते तर अनेक उद्योग सुरू झाले असते. कोकणात रिफायनरी माथी मारत आहेत. तुमचा आशीर्वाद द्या मी रिफायनरी हद्दपार करून देतो.

जनतेच्या माथी विनाशकारी प्रकल्प मारताय. तुमच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राला काय पाहिजे त्याच्यासाठी जनतेची मते पाहिजेत?. महाराष्ट्र हा अडाणी की मोदी आणि शहा चा होणार आहे का? सगळी कडे जाहिराती येत आहेत. आमचे जागतिक दर्जाचे औद्योगिक केंद्र आम्ही मुंबईत महाराष्ट्रात आणणार आहोत. असे घणाघाती भाषण उद्धव ठाकरे यांनी केले.

No comments:

Post a Comment

चांगले उद्योग गुजरातला आणि विनाशकारी रिफायनरी राजापुरला ? - उध्दव ठाकरे

चांगले उद्योग गुजरातला आणि विनाशकारी रिफायनरी राजापुरला? उद्योग मंत्र्यांनी स्वतः च्या जिल्ह्यात किती प्रकल्प आणले - कोकणचे भविष्य गुंडांच्य...