घाटकोपर पश्चिम मध्ये वाहतूक कोंडी ; बेशिस्त पार्किंग, फेरीवाल्यांचा विळखा !!
घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिमेकडील रेल्वे स्थानक, मेट्रो स्टेशन परिसर आणि घाटकोपर रेल्वे स्थानकाला जोडणारे रस्ते एमजी रोड, हिराचंद देसाई मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग याठिकाणी दिवसागणिक वाहतूक कोंडीची समस्या वाढत चालली आहे. वाहतूक कोंडीमुळे सायंकाळ नंतर या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागताना दिसतात. घाटकोपर स्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असल्याने तसेच स्थानका बाहेर अनधिकृत फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडून ठेवल्याने परिणामी प्रवाशांना या मार्गावर वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. स्थानक परिसरात शेअर रिक्षा मोठ्या प्रमाणात असल्याने बस आणि इतर वाहनांना मार्ग काढणे अवघड जात आहे. अमृतनगर, आरसिटी मॉल, असल्फा व्हिलेज, श्रेयस सिनेमा आदी मार्गाकडे जाणाऱ्या शेअर रिक्षा या स्थानकाच्या एकाच मार्गातून जात असल्याने प्रवाशांना कोंडीचा त्रास होत आहे, तरी याबाबत संबंधित स्थानिक प्रशासनाकडून नियोजन होताना दिसत नाही आहे. याशिवाय रस्त्यामध्येच बेशिस्तपणे वाहन पार्किंग तसेच घाटकोपर स्थानक परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेले फेरीवाल्यांचे अतिक्रमण हे या वाहतूक कोंडीचे मुख्य कारण आहे. तर या फेरीवाल्यांनी नागरिकांसाठी असणारे फुटपाथ ही गिळंकृत केले असून फुटपाथ ही ताब्यात घेतले आहेत, घाटकोपर खोद गल्ली येथे महापालिकेची शाळा आहे आणि समोरच महापालिकेचा दवाखाना आहे, त्याला ही या फेरीवाल्यांनी विळखा मारला असून त्यांच्या समोरच्या मुख्य गेटवरच फेरीवाले आपले बस्तान बसवतात त्यामुळे याठिकाणी येणारे शाळकरी मुले आणि दवाखान्यात उपचारासाठी येणारे रुग्ण यांना या अनधिकृत फेरीवाल्यांचा खूप त्रास सहन करावा लागत आहे, परिणामी संध्याकाळच्या वेळी नागरिकांना याठिकाणी चालणे ही अवघड होत आहे. घाटकोपर पोस्ट ऑफिस परिसराची ही तिचं स्थिती आहे. तर याविरुद्ध कोणी सामान्य नागरिकांनी आवाज उठविला तर हे फेरीवाले दादागिरी करत त्या नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याचे प्रकार ही या परिसरात घडले आहेत. त्यामूळे या सर्व फेरीवाल्यांची मुजोरी आता वाढत आहे. या मुजोर फेरीवाल्यांच्या विरुद्ध आता काही सामाजिक कार्यकर्ते एकवटले असून प्रशासनाचे डोळे उडण्यासाठी त्यांनी याविरुद्ध आंदोलन छेडले आहे, परंतु महापालिका आणि पोलिसांकडून ठोस कारवाईच केली जात नसल्याने सामान्य नागरिक आणि वाहन चालक हे निर्माण केले जाणारे अडथळे, वाहतूक कोंडी मुळे त्रस्त झाले आहेत. मागे घाटकोपर स्थानकाच्या बाहेर अनधिकृतरित्या रस्त्यावर खाद्य पदार्थ बनविणाऱ्या गाडीवर सिलेंडर स्फोट होऊन याठिकाणी आग लागली होती. यावेळी या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अग्निशामक दलाच्या वाहनाला आगीवर नियंत्रण आणण्यासाठी जाताना प्रचंड वाहतूक कोंडीतून आपल्या वाहनाची वाट काढताना कसरत करावी लागली. तसेच रुगणवाहिकेची पण तीच स्थिती आहे बाजूलाच राजावाडी येथे महापालिकेचे मोठे रुग्णालय आहे. एखादा गंभीर रुग्णाला किंवा गरोदर स्त्रियांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना देखील रुग्णवाहिकेला सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडीतून वाट काढताना खूप कसरत करावी लागते. मग याला जबाबदार कोण? या संबंधित स्थानिक प्रशासन काय करत आहे.याला कोणाचे अभय आहे, स्थानिक आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी यावर आतापर्यंत काय केले? असा प्रश्न त्रस्त नागरिक विचारत आहेत.
तसेच भटवाडी, असल्फा, साकीनाका आणि अंधेरी मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी म्हणून घाटकोपर अंधेरी लिंक रोडची निर्मिती करण्यात आली. परंतु अद्याप ही या ठिकाणी सिग्नल यंत्रणा न बसवल्या गेल्यामुळे याठिकाणी तिन्ही मार्गावरून येजा करण्याऱ्या वाहनांची या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. तरी तिन्ही मार्गावरून एकच वेळी येणाऱ्या वाहनांमुळे याठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी यावर अद्याप ही कोणतीही उपाययोजना होताना दिसत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
No comments:
Post a Comment