Wednesday, 11 December 2024

एन विभाग घाटकोपर पश्चिम मधील दत्तक वस्ती योजनांच्या कंत्राटांची चौकशी होणार ; मुख्य महानगरपालिका आयुक्तांचे आदेश !

एन विभाग घाटकोपर पश्चिम मधील दत्तक वस्ती योजनांच्या कंत्राटांची चौकशी होणार ; मुख्य महानगरपालिका आयुक्तांचे आदेश !

घाटकोपर, (केतन भोज) : मुंबई महानगर पालिकेने परिसरातील नालेसफाई आणि स्वच्छता गृहाच्या देखभालीसाठी दत्तक वस्ती योजना जाहीर केली. झोपडपट्टीत साफसफाई,घराघरांतून कचऱ्याचे संकलन, छोटी गटारे, सार्वजनिक शौचालये आदींची स्वच्छता करण्याकरिता पालिकेतर्फे ही योजना राबविली जाते. प्रत्येक महापालिकेच्या विभागा मध्ये लॉटरी पद्धतीच्या माध्यमातून दत्तक वस्ती योजनेसाठी संस्थांची निवड केली जाते आणि मग त्या संस्थेला वस्तीच्या स्वच्छतेची जबाबदारी सोपविली जाते. यासाठी प्रत्येक सफाई कामगाराला पालिका वेतन अदा करते. त्यामध्ये संस्थांनी वस्तीच्या स्वच्छतेची सर्व कामे करून घ्यावी, असे या योजनेत अपेक्षित आहे. मात्र मुंबई महानगर पालिकेच्या एन विभागात घाटकोपर पश्चिम मधील दत्तक वस्ती योजनेत मोठा गैरकारभार चालू असून दत्तक वस्ती योजनेचे कंत्राटदार यांच्या माध्यमातून कामगार केवळ कागदावर दाखवून त्यांच्या वेतनाची रक्कम ठेकेदार खिशात टाकत असल्याचे प्रकार घडत आहेत, यात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे सर्व प्रकारे चालू आहेत. तसेच दत्तक वस्ती योजना अस्तित्वात असून ही सर्वच वॉर्डात नाले सफाई, कचरा संकलन होत नसल्याच्या तक्रारी आहेत. असा सर्व धक्कादायक प्रकार महानगर पालिकेच्या एन विभागाच्या घाटकोपर पश्चिम येथील सर्वच वॉर्डात सुरू आहे, तर एन विभागातील सर्वच वॉर्डातील स्वच्छतेची कामे होत नसल्याने ही योजना केवळ कागदावरच आहे. संस्थांच्या गैरप्रकारांमुळे या विभागातील कचरा रोजच्या रोज उचलला जात नाही. तसेच या योजनेच्या नियमाप्रमाणे घरोघरी जाऊन कुठल्याच ठिकाणी कचरा संकलन होत नाही आणि विभागातील गटारांची ही सफाई होत नाही. त्यामुळे या योजनेचीचं आता स्वच्छता करावी अशी तेथील सर्व स्थानिक नागरिकांची मागणी आहे. तरी मुंबई महापालिकेच्या एन विभागातील घाटकोपर पश्चिम येथील दत्तक वस्ती योजनेच्या सर्वच कंत्राटांची योग्य प्रकारे चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिकांसह सामाजिक कार्यकर्ते यांनी मुंबई महानगपालिका मुख्य आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली होती. या तक्रारीची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून तत्काळ एन विभागातील घाटकोपर पश्चिम मधील सर्वच दत्तक वस्ती योजनांच्या कंत्राटांची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

No comments:

Post a Comment

वाढदिवसानिमित्त शंभर युवकांनी केले रक्तदान !

वाढदिवसानिमित्त शंभर युवकांनी केले रक्तदान ! ** रक्तदात्यांचा आदर्श रक्तदाता ने सन्मान मुंबई, (केतन भोज) : भारतीय जनता पार्टीचे ...