रेल्वे कारशेड सुविधांसाठी कळवा मुंब्रा रेल्वे प्रवासी संघर्ष समिती आक्रमक !!
दि.२६, कळवा (ठाणे) :
अनधिकृत प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुढे करून मध्य रेल्वेने कळव्यातील गेली कित्तेक वर्षे सुरू असलेली कारशेड प्रवासी वाहतूक बंद करण्याचे ठरविले आहे. कारशेड मधून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीला आळा बसावा म्हणून कळव्यात रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूने संरक्षक भिंत बांधून कळवा पश्चिमेकडे कारशेडच्या वरून पादचारी पुल निर्माण होत आहे.
वास्तविक गेल्या काही वर्षात कळव्याची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने आणि अपुऱ्या सोयी सुविधांअभावी कळवा स्टेशन मधून सकाळच्या वेळी मुंबई कडे प्रवास करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. तसेच यावेळी कल्याणकडून येणाऱ्या सर्वच लोकल खचाखच भरून येत असल्याने कळवेकरांना लोकल मि ळणे खूप कठीण जाते. दरवाजात लटकून प्रवास केल्याने कळवा ठाणे दरम्यान असलेल्या खाडीत पडून आजवर कित्तेक प्रवाशांचा मृत्यू देखील झालेला आहे. म्हणूनच नाईलाजाने स्वतः चा जीव धोक्यात घालून कळव्यातील बहुसंख्य नागरिक कारशेडमधून सुटणाऱ्या गाड्यांनी रोज मुंबईकडे प्रवास करतात. यात प्रामुख्याने, नोकरदार वर्ग, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांचा समावेश असतो.
परंतु आता रेल्वे प्रशासनाने अनधिकृत प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुढे करून कळवेकरांची ही सुविधा बंद करण्याचा घाट घातला आहे.
दरम्यान मध्य रेल्वेचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आता कळवा मुंब्रा प्रवासी संघर्ष समिती मैदानात उतरली असून रेल्वे प्रशासनाच्या या अन्यायकारक निर्णयाविरोधात कळव्यात ठिकठिकाणी जनजागृती अभियान राबविले जात आहे. रेल्वे प्रवासी संघर्ष समितीच्या या अभियानाला कळव्यातील नागरिकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला असून मोठ्या संख्येने कळवेकर या अभियानात सामील होत असून मध्य रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आपला रोष प्रगट करीत आहेत.
दरम्यान या अभियानाला अधिक बळकटी मिळावी म्हणून रेल्वे प्रवासी सुरक्षा समितीने रेल्वे महाप्रबंधक यांची भेट घेऊन त्यांना कळवेकरांच्या कारशेड बाबतच्या मागणीसह इतरही काही मूलभूत मागण्यांचे निवेदन दिले आहे. तसेच कळव्यातील बहुसंख्य नगरसेवकांना देखील रीतसर पत्र देऊन या अभियानात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कळव्यातील ज्येष्ठ माजी नगरसेवक मिलिंद पाटील तथा समाजसेवक मंदार केणी यांनी याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून कारशेड सुविधा बंद करण्यापूर्वी कळवेकरांना आधी होम प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान दिवसेंदिवस कळवा मुंब्रा रेल्वे प्रवासी संघर्ष समितीच्या या कळवा कारशेड बाबतच्या अभियानाला नागरिकांचा भरघोस पाठिंबा मिळत असून रेल्वे प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे समितीचे संयोजक प्रथमेश उपरकर यांनी सांगितले आहे.
कळवा येथे एक. नंबरवर. टॉयलेट नाही.
ReplyDeleteहे लाजीरवाणे सत्य आहे.