विरारची विश्वजा विजय जाधव ‘रुपेरी वाळूत’मधून मराठी संगीतविश्वात झळकली !
विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण
मराठी संगीतविश्वात सध्या चर्चेचा विषय ठरलेले ‘रुपेरी वाळूत’ हे बहुप्रतिक्षित गीत नुकतेच ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाले असून, प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना व सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील आणि ‘इंडियन आयडॉल’ फेम सुप्रसिद्ध गायक अभिजीत सावंत यांच्या प्रमुख सहभागासोबतच, विरारची उगवती गायिका विश्वजा विजय जाधव हिने या गीताला आपल्या सुरेल आवाजाने वेगळी उंची दिली आहे.
विरारच्या मुलजीभाई मेहता इंटरनॅशनल स्कूल येथे इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेली विश्वजा ८ ऑक्टोबर २००९ रोजी जन्मली असून तिचे मूळ गाव औरंगाबाद आहे. विरार हेच सध्या तिचे कार्यक्षेत्र आहे.
वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी मालिकेच्या शीर्षक गीतासाठी आवाज देत तिने आपल्या संगीतप्रवासाची सुरुवात केली आणि तेव्हापासून तिचा प्रवास सातत्याने पुढे जात आहे.
‘रुपेरी वाळूत’ हे नितांत सुंदर रोमँटिक गीत असून, लोकप्रिय गायक अभिजीत सावंत आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नृत्यांगना व सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. अलिबागच्या समुद्रकिनारी, रुपेरी वाळूत शूट केलेल्या या गाण्याने रिलीज होताच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या गीताला संगीतकार विजय भाटे यांचे आधुनिक संगीत लाभले असून, अभिजीत सावंत यांच्यासोबत पार्श्वगायिका म्हणून विश्वजाचा आवाज गाण्याला वेगळी उंची देतो.
या गाण्याची संधी विश्वजाला सोशल मीडियावरील एका वेगळ्या ट्रेंडमुळे मिळाली. इंस्टाग्रामवर तिने सुरू केलेल्या फरमाईशी गायन ट्रेंडमुळे तिची दखल घेण्यात आली आणि त्यातूनच ‘रुपेरी वाळूत’ या गाण्याची संधी तिला मिळाली.
विश्वजाच्या आतापर्यंतच्या यशस्वी प्रवासात टोनी कक्कड यांच्यासोबत रेकॉर्ड केलेले “सितारों तुम सो जाओ” हे अल्बम गीत, तसेच पद्मश्री शंकर महादेवन यांच्या उपस्थितीत नाशिक येथे सादर केलेली थेट मैफल हे महत्त्वाचे टप्पे ठरले आहेत. तिने ‘बेरीज–वजाबकी’ आणि ‘भारत माझा देश आहे’ या मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले असून, शेमारू वाहिनीवरील ‘पवनपुत्र हनुमान’ या मालिकेचे शीर्षक गीतही तिने गायले आहे. नाशिक येथे झालेल्या शंकर महादेवन लाईव्ह इन कॉन्सर्ट या कार्यक्रमात शंकर महादेवन यांच्यासोबत तिला गाण्याची सुवर्णसंधी मिळाली. तसेच संगीतकार नितीन शंकर, जतिन पंडित आणि गायक मोहम्मद सलामत अली यांच्यासोबत तिने अनेक प्रतिष्ठित मंचांवर थेट कार्यक्रम केले आहेत.
टेलिव्हिजनवरील विविध संगीत स्पर्धांमधील तिची कामगिरीही उल्लेखनीय आहे. संगीत सम्राट (झी युवा), सूर नवा ध्यास नवा – छोटे सुरवीर (कलर्स मराठी – टॉप १०), रायझिंग स्टार ३ (कलर्स हिंदी – टॉप १०), तारे जमीन पर (स्टार प्लस – फायनलिस्ट) आणि सुपरस्टार सिंगर सीझन २ (सोनी टीव्ही – टॉप १२) अशा कार्यक्रमांमधून तिने लहान वयातच प्रचंड लोकप्रियता मिळवली.
विश्वजा ही संगीतपरंपरेच्या घरातून आलेली आहे. तिचे आजोबा सुखदेव जाधव हे प्रसिद्ध शाहिर असून, दिवंगत काका रवींद्र जाधव हे संगीत अलंकार प्राप्त गायक होते. आई नेत्रा विजय जाधव या अनुभवी संगीत शिक्षिका असून त्यांनी ‘ब्लॅकबोर्ड’ या मराठी चित्रपटासाठी लहान मुलांच्या कोरसचे संगीत संयोजन केले आहे. तसेच अनेक नामवंत कलाकारांसोबत मंचावर कार्यक्रम केले आहेत. वडील विजय जाधव हे गेल्या २५ वर्षांपासून तालवादक म्हणून कार्यरत असून, मराठी व बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी योगदान दिले आहे.
आई नेत्रा जाधव आणि विदुषी अर्चना कण्हेरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत शिक्षण घेत असलेली विश्वजा लवकरच आणखी एका आगामी मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन करणार आहे. ‘रुपेरी वाळूत’मधील तिच्या दमदार गायनामुळे ती सध्या चर्चेत असून, मराठी तसेच हिंदी संगीतविश्वात तिचा आवाज आणखी उंच भरारी घेईल, असा विश्वास संगीतप्रेमी व्यक्त करत आहेत.
No comments:
Post a Comment