वंचितांचा रंगमंच म्हणजे वंचित युवांच्या मनातील स्पंदनांचा हुंकार आहे, सुप्रसिद्ध रंगकर्मी सुप्रिया मतकरी विनोद यांचे उद्गार* !
* ठाणे, दि. २२,
वंचितांचा रंगमंच ही एक चळवळ आहे, वंचितांच्या आवाजाला मंच उपलब्ध करुन द्यायची, अशा विचाराने श्रेष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी या उपक्रमाची कल्पना मांडली आणि समता विचार प्रसारक संस्थेने गेली १२ वर्ष ठाण्यात हे शिवधनुष्य समर्थपणे पेललं, अशा शब्दात मतकरींची सुकन्या आणि सिनेनाट्य क्षेत्रात नावाजलेली कलाकार सुप्रिया मतकरी विनोद यांनी नाट्यजल्लोषचे कौतुक केले.
काल ठाण्यात वंचितांच्या रंगमंचावर रत्नाकर मतकरी स्मृती नाट्यजल्लोष दणक्यात साजरा झाला. या वर्षी ठाण्यातील आणि आसपासच्या गावातील वस्त्यांमधील मुलांनी ‘बदलते शहर’ या थीमवर आधारित नाटिका सादर केल्या. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन या उपक्रमाच्या सांयोजिका हर्षदा बोरकर यांनी केले. संस्थेचे संस्थापक डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी या उपक्रमाची माहिती दिली.
या वेळी उपस्थित वॉइस एक्सपोर्ट सोनाली लोहार यांनी मुलांचं आणि संस्थेचं कौतुक करत म्हटलं की तळागाळात काम करत वंचित समूहातील संवेदनशील वयातील मुलांना मार्गदर्शन करत त्यांच्या विचारांना दिशा दर्शवण्याचे महत्वाचे काम ही संस्था करत आहे. नाट्यकर्मी आणि ठाण्याचा इतिहास रंजकपणे लिहिणारे मकरंद जोशी यांनी म्हटलं की या पुढे ठाण्याचा इतिहास वंचितांच्या रंगमंचाच्या उल्लेखानेच परिपूर्ण होणार आहे. ठाण्यातील जुने जाणते नाट्यकर्मी प्रताप प्रजापती यांनी या वेळी सर्व नाटिकांतून काम करणाऱ्या सर्व कलाकारांना भेट वस्तू देऊन गौरवलं. ठाण्यात आखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन भरवले असताना, वंचितांच्या रंगमंचावरील नाटिकांचे प्रयोग विशेष दालनात आयोजित केल्याची आठवण मराठी नाट्य परिषदेचे नरेंद्र बेडेकर यांनी जागवली.
बदलतं शहर या थीम अर्थपूर्ण नाटिका
या वर्षी बदलतं शहर या थीम वर ठाण्यात वस्तीतील मुलांनी नाविन्यपूर्ण विषयाच्या नाटिका सादर केल्या. कळवा पाईप लाईन जवळील भीम नगर येथील मुलींनी ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ या नाटिकेत शहरात मुलींचे शिक्षण वाढल्याने त्यांच्या विचारात बदल होऊन त्यांनी त्यांच्या मनातील भीतीवर मात केली यावर प्रभावी नाटिका सादर केली. त्यांना अरुण पंदरकर याने मार्गदर्शन केले. घणसोली येथील वी नीड यू या संस्थेतील मुलांनी ‘नवी एकजूट’ या नाटिकेतून जुनी बिल्डिंग पाडून नवी बिल्डिंग पाडण्याने होत असलेल्या भावनिक कल्लोळाचे आणि असे बदल स्वीकार करण्याच्या गरजेचे उत्तम चित्रण दाखवले. किसन नगर गटाने विश्वनाथ चांदोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बसविलेल्या ‘मी रंगायतन’ या नाटिकेतून खुल्या रंगमंचावर नाटके होण्यापासून गडकरी रंगायतनची घडण होण्यापर्यंत आणि त्याला आता प्राप्त होत असलेल्या नव्या स्वरुपापर्यंतच्या घडामोडी खूप कल्पकतेने दाखवल्या. रमाबाई आंबेडकर नगरातील मुलांनी बदलत्या ठाणे शहराबरोबरच इथल्या स्वच्छता, ट्रॅफिक सारख्या बदलत्या समस्या अधोरेखित करत त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे हे ‘आमचे ठाणे’ या नाटिकेत छान प्रकारे दाखवलं. मो. ह. विद्यालयातील मराठी माध्यमाच्या मुलींनी शिक्षिका संगीता धनुकटे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इये मराठीचीये नगरी’ या नाटिकेत मराठी भाषेत होणाऱ्या बदलावर भाष्य करत मराठी भाषेचे महत्त्व विशद केलं आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याने काय फरक पडेल हे ही उत्तम रित्या सादर केलं. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्तीच्या मनातील बदलले विचार आणि त्यानुसार त्याच्या मनस्थितीत आणि परिस्थितीत होणारे बदल यावर विनोदी अंगाने ‘बटरफ्लाय’ ही नाटिका सादर करून उत्तम मनोरंजन केलं.
या सर्व नाटिकांमध्ये उत्तम अभिनय, उत्तम लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण या बद्दल सुप्रिया विनोद यांच्याकडून भीमनगरच्या आँचल हरिजन, घणसोलीच्या रोनित भिडे, किसान नगर च्या आसिफ शेख आणि दुर्वा केसरकर, रमाबाईच्या संस्कृती काळे आणि अक्षय ओवाळे, मो; ह. विद्यालयाच्या वैष्णवी नेसले, देवश्री कोळी, आणि संस्थेच्या नाटीकेसाठी अक्षता दंडवते यांना खास बक्षिसे देऊन कौतुक करण्यात आलं.
या कार्यक्रमाला जगदीश खैरालिया, मिलिंद विनोद, डॉ. गिरीश साळगावकर, योगेश खांडेकर, वृषाली कुलकर्णी, अतिता जोशी, प्रकाश धनवडे, महा. अनिसचे अजित जंगले, जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश ग. प्रा,, प्रा. प्रदीप लुडबे, राकेश शिर्के, विश्वनाथ जोशी, नीलिमा सबनीस असे मान्यवर, हितचिंतक उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी लतिका सु. मो., हर्षलता कदम, सुनील दिवेकर, यमनीषा जोशी, मीनल उत्तुरकर या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर अजय भोसले, निनाद रावराणे, ऋतुराज परह्यार आदी कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली.
जगदीश खैरालिया,
संस्थापक, समता विचार प्रसारक संस्था
No comments:
Post a Comment