बिनविरोध विजयी उमेदवारीमुळे लोकशाही धोक्यात – पँथर साईनाथ खरात
ठाणे,दि.३.( प्रतिनिधी )
लोकशाहीच्या मुळावर घाव घालणाऱ्या बिनविरोध विजयी उमेदवारीच्या वाढत्या प्रवृत्तीवर आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते पँथर साईनाथ खरात यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सातत्याने बिनविरोध विजयी उमेदवार निवडून येणे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
लोकशाही ही लोकांची, लोकांसाठी आणि लोकांद्वारे चालणारी शासनपद्धती आहे. मात्र आज अनेक ठिकाणी निवडणूक ही केवळ औपचारिकता उरली असून, स्पर्धा, मतदान आणि जनतेचा थेट सहभागच नसल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याने मतदारांचा निवड करण्याचा अधिकार हिरावला जात आहे, असे पँथर साईनाथ खरात म्हणाले.
“बिनविरोध निवड कायद्याने चुकीची नसली, तरी ती सातत्याने होत राहिली तर लोकशाही कमकुवत होते. कारण जनतेचा आवाज मतदान पेटीत पोहोचतच नाही,” असे ते म्हणाले. काही ठिकाणी राजकीय दबाव, दडपशाही आणि भीतीचे वातावरण निर्माण करून विरोधी उमेदवार उभे राहू दिले जात नसल्याचे आरोपही त्यांनी यावेळी केले.
लोकशाहीमध्ये मतदार जितका जागरूक असणे आवश्यक आहे, तितकेच महत्त्व निवडणूक लढवण्याच्या स्वातंत्र्याला आहे. “जर स्पर्धाच नसेल, तर विकासाचा जाब कोण विचारणार लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचा हिशोब कोण घेणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
लोकशाही मजबूत करण्यासाठी निवडणुका खर्या अर्थाने स्पर्धात्मक व्हायला हव्यात, मतदारांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करताना पँथर साईनाथ खरात म्हणाले, “मतदान नसेल तर लोकशाही फक्त कागदावर उरेल.”
हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा नसून संपूर्ण व्यवस्थेचा आहे. लोकशाही वाचवायची असेल, तर प्रत्येक नागरिकाने आणि प्रत्येक मतदाराने आपला हक्क ओळखून निर्भयपणे तो वापरणे गरजेचे आहे, असे आवाहन खरात यांनी शेवटी बोलत असताना केले.
बिनविरोध होऊ शकत नाही त्याच्या विरुद्ध नोटा हा एक उमेदवार आहे
ReplyDeletevikaskharat53956@gmail.com
ReplyDelete