प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगावात 'संविधान साक्षर बस' उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये होणार संविधानाचे जागरण !
जळगाव, राहुल बैसाणे :
26 जानेवारी 2026 भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जळगाव जिल्ह्यात एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. जळगाव ते भादली दरम्यान धावणारी 'संविधान साक्षर बस' नुकतीच प्रवाशांच्या आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल झाली आहे. संविधानातील मूल्ये, अधिकार आणि कर्तव्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या फिरत्या बसचे रूपांतर एका माहिती केंद्रात करण्यात आले आहे.
हा स्तुत्य उपक्रम शंकर यशोद यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या 'धुंजन टीम जळगाव' च्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. जळगाव बस आगाराच्या वर्कशॉपमध्ये या उपक्रमाचे शानदार उद्घाटन करण्यात आले. जळगाव आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांच्या हस्ते रिबीन कापून या बसचे लोकार्पण झाले.
*बसचे वैशिष्ट्य म्हणजे पोस्टर आणि QR कोड
*विद्यार्थ्यांना संविधानाची माहिती सहज आणि रंजक पद्धतीने कळावी, यासाठी बसवर विविध पोस्टर्स लावण्यात आली आहेत. *यामध्ये संविधानातील मूलभूत मूल्ये,
*नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये,
*संविधानाची प्राथमिक आणि महत्त्वाची माहिती.
तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत बसवर QR कोड देखील लावण्यात आले आहेत. हे कोड स्कॅन करून विद्यार्थ्यांना संविधानाविषयी सविस्तर माहिती आपल्या मोबाईलवर सहज मिळवता येणार आहे.
या कार्यक्रमाला संकल्पक शंकर यशोद, सामाजिक कार्यकर्ते फाहीम पटेल, सतीश पाटील विलास इंधाटे, सहाय्यक अधीक्षक विजय पाटील, प्रभारक दिनेश सपकाळे, प्रभारक स्वीटी तायडे आणि चालक मनोज सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल बैसाणे आणि तथागत सुरवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी सर्व आगार कर्मचाऱ्यांचे आभार मानले व ह्या उपक्रमाचे कौतुक केले.
संविधानाविषयी जागृती निर्माण करणारा हा उपक्रम जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन 'धुंजन टीम' जळगाव तर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment