यु. ई. एस. कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये उडान महोत्सव उत्साहात साजरा !!
उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) : शुक्रवार दिनांक २३-०१-२०२६ रोजी यु. ई. एस. कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी आणि कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय, उरण यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केला जाणारा उडान महोत्सव यु. ई. एस. महाविद्यालयात जल्लोषात साजरा झाला.
ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभागाचे संचालक डॉ. बळीराम एन. गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी यु. ई. एस. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर, उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर, सदस्य व माजी अध्यक्ष आर्किटेक्ट तनसुख जैन, कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाचे सी.ई.ओ प्रदीप श्रृंगारपुरे व प्राचार्य डॉ. वाल्मिक गर्जे, यु. ई. एस. कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. मिनाक्षी गुप्ता, सिनिअर कॉलेजच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख मनाली तांबडकर आणि वाणिज्य विभागाच्या प्रमुख वर्षा वीर, डीएलएलईचे समन्वयक प्रा.विनोद इंदुलकर (के. डी. एस. कॉलेज), हेमांगी म्हात्रे व अक्षय निवांगुणे (यु. ई. एस. कॉलेज) तसेच शिक्षकगण व शिक्षेकतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे डॉ. बळीराम एन. गायकवाड यांचे स्वागत यु. ई. एस. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर ह्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले.विदयार्थ्यांमधील विविध कलागुणांना व गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी उडाण महोत्सवाचे आयोजन विद्यापीठाच्या वतीने करण्यात येते. या महोत्सवात पोवाडा गायन, पथनाटय, पोस्टर मेकिंग, वक्तृत्व व क्रिएटिव्ह लेखन अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या महोत्सवात नवी मुंबई, उरण, पनवेल, अलिबाग, पेण परिसरातील एकूण २१ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. त्यात एकूण ३८० स्पर्धक विद्यार्थी, ६० स्वयंसेवक व ४० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, असे एकूण ४८० जण कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
ह्या विविध स्पर्धांमध्ये यु. ई. एस. आणि के. डी. एस. कॉलेजच्या विदयार्थ्यांनीही सहभाग नोंदविला आणि पोवाडा गायन स्पर्धेंमध्ये यु. ई. एस. कॉलेजच्या विदयार्थ्यांना द्वित्तीय क्रमांक तसेच पथनाट्य स्पर्धेंमध्ये के. डी. एस. कॉलेजच्या विदयार्थ्यांना तृतीय क्रमांक मिळाला. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचा तसेच विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आलं. यु. ई. एस. कॉलेज आणि कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय यांनी उडान सारख्या खूप मोठ्या महोत्सवाचे आयोजन यशस्वीरित्या केल्याबद्दल सर्व प्रमुख पाहुण्यांनी व उपस्थित सर्व कॉलेजमधील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी यु. ई. एस. आणि के. डी. एस. कॉलेजचे तोंड भरुन कौतुक केले. कार्यक्रमाची सागंता राष्ट्रगीताने झाली.
No comments:
Post a Comment