Saturday, 24 January 2026

गुणवत्ता वाढीस चालना देणारा ‘भादाणे पॅटर्न’ – राज्यासाठी प्रेरणादायी उपक्रम !!

गुणवत्ता वाढीस चालना देणारा ‘भादाणे पॅटर्न’ – राज्यासाठी प्रेरणादायी उपक्रम !!

ठाणे, प्रतिनिधी :
राज्यात प्रथमच ठाणे जिल्ह्यातील भादाणे गावाने शिक्षण क्षेत्रात एक अभिनव आणि प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. भादाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १५ ऑगस्ट २०१५ रोजी तत्कालीन सरपंच तथा शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. श्री. संजय हांडोरे पाटील यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला.

या निर्णयानुसार स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा मान इयत्ता दहावी व बारावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या निवासी व अनिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या आई-वडिलांसह देण्यात येऊ लागला. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागली असून अभ्यासासाठी सकारात्मक स्पर्धा निर्माण झाली आहे.

या निर्णयाचे स्वागत संपूर्ण राज्यभरातून होत असून अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी हा ‘भादाणे पॅटर्न’ संपूर्ण राज्यात राबवावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच हा पॅटर्न राज्यात लागू करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांना सर्वसंमतीने ठराव पाठविण्यात आला आहे.

या उपक्रमामुळे गावातील ध्वजारोहणावरून होणारे राजकीय वाद थांबले असून गावात शैक्षणिक गुणवत्ता, एकोपा व सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. हा निर्णय शाळेच्या शिक्षण समिती व ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला होता. यावेळी तत्कालीन मुख्याध्यापक श्री. राजाराम कंटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या अगोदर एकवीस विद्यार्थ्यांना झेंडा फडकविण्याचा मान मिळाला आहे.
यावर्षी कुमारी संचिता राजेंद्र यशवंतराव या विद्यार्थिनीने बारावी सायन्स परीक्षेत ७७ टक्के गुण मिळवून भादाणे गावातून प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे भादाणे जिल्हा परिषद शाळेच्या प्रजासत्ताक दिनाचा यावर्षीचा ध्वजारोहणाचा मान तिला तिच्या आई-वडिलांसह देण्यात आला.

या अनोख्या व प्रेरणादायी उपक्रमाची दखल देशपातळीवर घेण्यात आली असून उत्तर प्रदेशचे शिक्षण मंत्री मा. श्री. आशिष पटेल यांनी ४ फेब्रुवारी २०२४ रोजी लखनौ येथे श्री. संजय हांडोरे पाटील यांना आमंत्रित करून या उपक्रमाचे विशेष कौतुक करत त्यांचा यथोचित सत्कार केला.

भादाणे पॅटर्न आज शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, प्रेरणा आणि सामाजिक सलोखा यांचे उत्तम उदाहरण ठरत असून तो संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहे. 🌱🇮🇳

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...