उरण पोलीसांची मुस्कान मोहीम: भरकटलेली महिला व मुलगा परतले घरी !
उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : उरण पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी ऑपरेशन मुस्कान मोहिमेअंतर्गत उरण बाजारपेठेत भरकटलेल्या महिला आणि मुलाला वाचवले. आशिया परवीन कलाम हुसेन (३२) आणि त्यांचा मुलगा फैजान कलाम हुसेन (१०) हे झारखंडच्या गिरीडी जिल्ह्यातील निवासी असून, कौटुंबिक वादातून घर सोडून बंगलोर जाण्यासाठी चुकीची ट्रेन पकडून उरण येथे आले होते.
पोलीसांनी सखोल चौकशी करून आशियाच्या पती कलाम हुसेन यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आशियाचा भाऊ गया सुदिन आयूब अली अन्सारी उरण पोलीस स्टेशन येथे हजर झाला आणि त्यांना व सदर मिसिंग महिला व मुलगा यांना पोलीस निरीक्षक राहुल कटवानि (गुन्हे) यांचे समक्ष हजर करून त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदर प्रकरणात पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी त्वरित कार्यवाही करून आशिया आणि त्यांच्या मुलाला सुरक्षित त्यांच्या परिवाराच्या ताब्यात दिले. या कार्यवाहीसाठी पोलीस निरीक्षक राहुल कटवानि (गुन्हे) यांनी पोलीस हवालदार सचिन पाटील यांना शाबासकी दिली आहे. पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी या अगोदरही अनेक हरविलेल्या व्यक्तींची घर वापसी केलेली आहे. अनेकांना योग्य मार्गदर्शन करून भरकटलेल्यांना योग्य मार्ग दाखविला आहे. सचिन पाटील यांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment