सार्वजनिक गणेशोत्सवामुळे गावांत एकोपा वाढतो : महेंद्रशेठ घरत
** पिरकोन आणि भोम येथे माघी गणेशाची २५ वर्षांची परंपरा
उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला, त्यामागे लोकांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने नांदत लोकचळवळ उभी राहावी, हा उदात्त हेतू होता. पिरकोन हे सुशिक्षितांचे गाव आहे. या गावात गेल्या अनेक वर्षांपासून माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्याची परंपरा गेल्या २६ वर्षांपासून पिरकोनने जपली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने गावकरी एकत्र येतात, विचारांची देवाण-घेवाण होते. त्यामुळे गावात एकोपा राहण्यास मदत होते. गावातील तंटे कमी होतात. त्यामुळे तरुणांनाही प्रोत्साहन मिळते, गावचा विकास चांगल्या प्रकारे होतो," असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ पिरकोन येथे म्हणाले. शनिवारी (ता. २४) रात्री त्यांनी उरण तालुक्यातील पिरकोन आणि भोम येथे माघी गणेशाचे दर्शन घेतले. त्यावेळी ते बोलत होते.
भोम येथे बोलताना महेंद्रशेठ घरत म्हणाले, "गावातील चांगल्या मंडळींचे सत्कार करण्याची प्रथा चांगली आहे. गाव उत्तम आणि निटनेटके आहे, स्वच्छताही आहे. शिवरायांचे दर्शन गावच्या वेशीवर होत असल्याने ग्रामस्थांत सकारात्मक विचारांची पेरणी झालेली आहे. सतत उपक्रमशील गाव असल्याने भोमवासीयांचे अभिनंदन करतो."
यावेळी भोमच्या ग्रामस्थांनी आणि साईंची मानाची पालखी काढणाऱ्या तरुणांनीही महेंद्रशेठ घरत यांना आगरी समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला.
यावेळी सर्पमित्र राजेश पाटील, गायिका प्रांजल पाटील, शैक्षणिक विभागात चमकलेला साई पाटील, साईबाबांच्या पालखीचे प्रमुख समाधान पाटील, क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरीय कामगिरी करणारा स्मित नारंगीकर यांच्याही यावेळी महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी अष्टविनायक मित्र मंडळ व महिला मंडळ मोठे भोम यांच्यातर्फे स्टेप आर्ट एंटरटेन्मेंट आणि पप्पू सूर्यराव निर्मित स्वर नृत्याचा आविष्कार हा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. विविध नृत्यांवर गावकऱ्यांनी आनंद घेतला. यावेळी काँग्रेसचे उरण तालुका प्रमुख विनोद म्हात्रे, ऍड. अविनाश ठाकूर, घनश्याम पाटील, विजय केणी, अलंकार परदेशी, आनंद ठाकूर, किरण कुंभार, उमेश भोईर, भारती ठाकूर, राजेंद्र पाटील, किशोर केणी, सुशील पाटील, रवींद्र भगत, रोषण मोकल, गणेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment