धार्मिक कार्यक्रमाला तात्पुरता विराम देत कोकण नगर रहिवाशी संघाचे विद्यार्थ्यांसाठी मोठे पाऊल !!
प्रतिनिधी - निलेश कोकमकर
मनवेलपाडा विरार (पूर्व) येथील कोकण नगर रहिवाशी संघ यांच्या वतीने गेल्या १६ वर्षांपासून दरवर्षी सार्वजनिक रीतीने श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात येत होते, त्याच बरोबर विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत होते. मात्र यावर्षी संघाने समाजहिताचा आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी मोठे पाऊल उचलून एक प्रेरणादायी निर्णय घेत धार्मिक कार्यक्रमाला तात्पुरता विराम देत शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.हा उपक्रम दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ०३:०० वाजता सी. जी. इंग्लिश मिडीयम हायस्कूल, मनवेलपाडा गाव, कोकण नगर, विरार (पूर्व) येथे आयोजित करण्यात आला आहे.
या निर्णयानुसार यावर्षी सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजेऐवजी कोकण नगर परिसरातील गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. शिक्षण हेच खरे ईश्वरपूजन असून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक हीच खरी समाजसेवा आहे, अशी स्पष्ट भूमिका संघाने यावेळी मांडली आहे.
कोकण नगर रहिवाशी संघ गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाशी नाळ जपत कार्यरत आहे. धार्मिकतेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत घेतलेला हा निर्णय नागरिकांकडून विशेष स्वागतार्ह ठरत आहे.
संघाच्या वतीने सांगण्यात आले की, “दरवर्षी धार्मिक कार्यक्रम घेणे महत्त्वाचे असले तरी यावर्षी शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करणे अधिक गरजेचे वाटले. एका मुलाच्या शिक्षणासाठी दिलेला हातभार हीच खरी पूजा आहे.”
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस दिशा देण्यासाठी करिअर मार्गदर्शनपर प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच समाजातील महिलांसाठी सन्मान व एकोप्याचे प्रतीक असलेला महिला मंडळाचा हळदी-कुंकू समारंभही उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास समाजसेवक श्री. कमलाकर देवजी फिलसे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपासाठी मोठे सहकार्य केले आहे. तसेच श्री. सत्यवान यशवंत रेडकर (वरिष्ठ अनुवाद अधिकारी, केंद्रीय वस्तू व सेवा कर, मुंबई – भारत सरकार) हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. विनायक शिगवण साहेब (अध्यक्ष – कोकण नगर रहिवाशी संघ) भूषवणार आहेत. या उपक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे कार्यकारणी तर्फे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment