Monday, 16 March 2026

शेतकऱ्याच्या घरावरच ‘ब्रिज’चा डंख ! अल्फकॉन्सच्या मनमानीवर संताप; तहसील कार्यालयाने दिले चौकशीचे आदेश !!

शेतकऱ्याच्या घरावरच ‘ब्रिज’चा डंख ! अल्फकॉन्सच्या मनमानीवर संताप; तहसील कार्यालयाने दिले चौकशीचे आदेश !!

उरण दि १६, (विठ्ठल ममताबादे) : विकासाच्या नावाखाली कंपन्यांची मनमानी किती वाढली आहे याचे धक्कादायक उदाहरण करंजा सातघर येथे समोर आले आहे. शेतकऱ्याच्या घराशेजारी परवानगीशिवाय ब्रिजचे काम सुरू केल्याचा गंभीर आरोप अल्फकॉन्स कंपनीवर करण्यात आला असून या प्रकारामुळे नऊ जणांच्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

करंजा सातघर येथील श्रीमती आशा कमळाकर थळी (घर क्र. २३४४, सर्वे नं. १६) यांच्या घराशेजारी अल्फकॉन्स कंपनीकडून ब्रिजचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र घरमालकाची कोणतीही परवानगी न घेता काम सुरू केल्याने थळी कुटुंब धास्तावले आहे. या घरात एकूण नऊ जणांचे कुटुंब वास्तव्यास असून ब्रिजच्या कामामुळे घराला तसेच कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
या संदर्भात ११ मार्च २०२६ रोजी आशा थळी यांनी उरण तहसील कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, ब्रिजच्या कामामुळे त्यांच्या कुटुंबाच्या जीवितास काही धोका झाल्यास अल्फकॉन्स कंपनी, संबंधित अधिकारी, वन विभाग तसेच ग्रामपंचायत जबाबदार राहतील.

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत उरण तहसील कार्यालयाने मंडळ अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिकार अभिलेखांची तपासणी करून, प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून तसेच शासनाचे कायदे, नियम व प्रचलित धोरणांच्या आधारे सखोल चौकशी करून वस्तुस्थितीचा अहवाल सादर करावा, असे निवासी नायब तहसीलदार महेश पाटील यांनी लेखी निर्देश दिले आहेत.

ग्रामस्थांचे म्हणणे असे की, यापूर्वी जसखार गावाजवळून जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे जागृत देवस्थान श्री रत्नेश्वरी देवी मंदिर आणि ग्रामस्थांची घरे बाधित होत असल्याने पुलाची जागा बदलण्यात आली होती. त्यामुळे त्याच धर्तीवर करंजा येथील पुलाचे नियोजन बदलून उभारणी करण्यात यावी, अशी मागणी थळी कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण असून “विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या घरावरच बुलडोझर चालवण्याचा उद्योग थांबवावा” अशी जोरदार मागणी आता उरण तालुक्यातून होत आहे

No comments:

Post a Comment

आसनगाव येथे नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग क्र. ०७/२०२६ यशस्वीरीत्या संपन्न !!

आसनगाव येथे नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग क्र. ०७/२०२६ यशस्वीरीत्या संपन्न !! बातमीदार प्रतिनिधी : ता. १६, नागरी संरक्षण...