डोंबिवलीहून पंढरपूरला सायकलने दिंडी रवाना; 20 ते 72 वयोगटातील 16 जणांचा सहभाग !!
*डोंबिवली, दि. 8 जुलै 2026*
डोंबिवली एमआयडीसी येथील गणपती मंदिरातून आज सकाळी पंढरपूर येथील सायकल रिंगण संमेलनासाठी 16 जणांची सायकल दिंडी रवाना झाली. सायकल सखी ग्रुप आणि सायकल डोंबिवली क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले आहे.
*शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर उपस्थित*
दिंडीला शुभेच्छा देण्यासाठी भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब, नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यासाचे डॉ. सुनील पुणतांबेकर, सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे तसेच डोंबिवलीतील अनेक नागरिक उपस्थित होते.
*वारीचा उद्देश*
या दिंडीत 20 वर्षांपासून 72 वर्षांपर्यंतच्या महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. पर्यावरण, आरोग्य, पर्यटन, देवदर्शन आणि 'बेटी पढाव बेटी बचाव' हा या सायकल वारीचा उद्देश आहे. पाऊस, वाऱ्याची पर्वा न करता हे सायकलस्वार 385 किलोमीटरचा तीन दिवसांचा प्रवास करून 10 जुलै रोजी रात्री पंढरपूरला पोहोचणार आहेत.
12 जुलै रोजी पंढरपूर परिक्रमा, रिंगण आणि संमेलनात सहभागी झाल्यानंतर हे वारकरी बसने परतणार आहेत.
*सहभागी सायकलस्वार*
मुकुंद कुलकर्णी 72, शंभू नारायण सिंग 72, नयना आगरकर 64, प्रशांत विसपुते 63, वर्षा महाडिक 58, सारंग मुळे 54, अश्विनी कारंडे 53, भीमाशंकर बिराजदार 51, विलास वैद्य 50, मेघेश कुलकर्णी 50, शोभा चौगुले 47, तेजल थोरवे 46, योगिता थोटांगे 43, विजय लहाने 38, रविना जाधव 36 आणि मेघ छेडा 20 या दिंडीत सहभागी झाले आहेत.
वारीसोबत अँब्युलन्स, आवश्यक सामानासाठी टेम्पोची व्यवस्थाही करण्यात आली आहे. शिवाय 11 जुलै रोजी अंदाजे 40 महिला-पुरुष बसने पंढरपूरला जाणार आहेत.
*दुसरी तुकडी उद्या रवाना*
गुरुवार 9 जुलै रोजी सकाळी एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुपतर्फे अध्यक्षा हर्षल सरोदे यांच्या नेतृत्वाखाली 33 जणांची दुसरी तुकडीही एमआयडीसी गणपती मंदिरातून पंढरपूरसाठी रवाना होणार आहे.
एकूण डोंबिवलीतून सुमारे 50 जण सायकलने पंढरपूर वारीसाठी जात आहेत. दरवर्षी या संख्येत वाढ होत असून डोंबिवलीकरांचा उत्साह लक्षणीय आहे.
No comments:
Post a Comment