कल्याण पंचायत समितीच्या धोकादायक इमारतींचे पाडकाम सुरू, अनेकांचे वाचले होते जीव ?
कल्याण (संजय कांबळे) : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या कल्याण पंचायत समितीच्या धोकादायक इमारतींचे पाडकाम अखेरीस सुरू झाले असून या इमारतीचे स्लॅब कोसळून अनेकांचे जीव थोडक्यात वाचले होते.
कल्याण तालुक्याचे विकास केंद्र म्हणून कल्याण पंचायत समितीकडे पाहिले जाते. लोंडबेरिंग पद्धतीने बांधलेल्या या इमारतीचे उद्घाटन १९६२ च्या आसपास झाले होते. परंतू या इमारतीच्या बांधकामाला सुमारे ५० वर्षे पूर्ण झाली असून यामुळे हिचे आयुष्य जवळपास संपले होते. तळमजला आणि पहिला मजला असे दोन मजले असलेल्या या इमारतीच्या तळमजल्यावर गटविकास अधिकारी यांचे दालन तसेच स्वर्ण जंयती ग्रामस्वरोजगार योजना, लेखा विभाग, ग्रामपंचायत विभाग, खादी ग्रामोद्योग, शिक्षण, पंतप्रधान रोजगार योजना, आरोग्य विभाग आणि अभिलेख विभाग तर पहिल्या मजल्यावर सभापती, उपसभापती दालन, कृषी, उप अभियंता बांधकाम, उप अभियंता लघू पाटबंधारे, उप अभियंता पाणीपुरवठा, पाणी पुरवठा, पशुसंवर्धन, एकात्मिक बालविकास अधिकारी विभाग आणि सभागृह अशी कार्यालये होती. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावातून नागरिक येथे विविध प्रकारच्या कामासाठी नेहमीच येत होते.
ही इमारत धोकादायक घोषित केली असली तरी येथे कारभार सुरू होता. कर्मचारी जीव मुठीत धरून काम करित होते. अनेक दरवाजा, जिना, व्हरांडा, ग्रामपंचायत विभागाचे वर स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. सुदैवाने कोणालाही इजा पोहचली नाही. तर वरील मजल्यावर सभापती चे दालनातील काही भाग कोसळला होता. प्रशासन व लोकप्रतिनिधी इमारती दूरूस्ती बाबत सतत आवाज उठवीत होते. परंतू वाढीव चटईक्षेत्रावर घोडे आडले होते. अखेरीस कल्याण पंचायत समितीच्या आताच्या लोकप्रतिनिधी व गटविकास अधिकारी श्वेता पालवे उप अभियंता एस आर चव्हाण, विस्तार अधिकारी, पत्रकार या सर्वाच्या प्रयत्नातून या इमारतीच्या दुरुस्तीसाठी भरघोस निधी मंजूर झाल्याने ही इमारत पाडण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे अखेरीस तालुक्यातील नागरिकांना बसण्याची व्यवस्था होईल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की या पाडलेल्या या मोकळ्या जागेत अतिक्रमण व्हायला नको. याची काळजी घ्यावी.

No comments:
Post a Comment