छत्रपती संभाजी महाराजांचा वध जर औरंगाजेबाने केला हे जर खरे ऐतिहासिक सत्य असते तर रायगडावर औरंगाजेबाचे राज्य आले असते : "शिव व्याख्याते विजय आवस्कर"
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : मुक्काम पेण तर्फे तळे तालुका माणगांव जिल्हा रायगड येथील शिवगर्जना मित्र मंडळ आणि पेण तर्फे तळे ग्रामस्थ, महिला मंडळ व मुंबईकर यांच्या वतीने पेण तर्फे तळे येथे शुक्रवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिवजयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. मात्र या वर्षी कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने खबरदारी म्हणून जारी केलेल्या अधिसूचना आणि नियमांचे पालन करून सदर कार्यक्रमाचे शिवगर्जना मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शानदार नियोजन करण्यात आले होते.
सकाळी ८ : ०० वाजता शिवज्योतिचे आगमन आणि त्या नंतर शिवज्योतिची मिरवणूक व त्या नंतर शिवप्रतिमेचे आणि शिवज्योतिचे पूजन करतात आले. या नंतर दुपारी १२ ते २ या कालावधीत रायगड जिल्ह्यातील पेण कोळीवाडा येथील सुप्रसिद्ध शिव व्याख्याते माननीय श्री. विजय आवस्कर सर यांनी बहुजन प्रतिपालक, रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी स्वराज्य आणि त्यांचे राजनैतिक विचार यावर उपस्थित विद्यार्थी, तरूण, तरुणी, सर्व ग्रामस्थ महिला मंडळ आणि सर्व शिवभक्तांना अभ्यास पुर्ण आणि सविस्तर असे शिव व्याख्यान पर मार्गदर्शन केले.
सुप्रसिद्ध शिव व्याख्याते माननीय श्री विजय आवस्कर सरांनी आपल्या शिव व्याख्यानात छत्रपती शिवाजी महाराज निर्मित स्वराज्य अर्थात रयतेचे राज्य, आणि त्यांची राजनीती, राजशिष्टाचार, कुशल रणनीती, गनीमी कावा, सर्व धर्म समभावाची शिकवण, शेतकरी हिताचे कायदे, सर्व समाज घटकांना आपल्या स्वराज्यात समानतेची वागणूक आणि त्यांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धती, समानतेच्या तत्वाने रांझ्याच्या पाटलाला कोणत्याही प्रकारची भीस्त न बाळगता केलेली कठोर शिक्षा, त्यांचे अष्टप्रधान मंडळ, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यातील बहुतांश किल्ल्याचे किल्लेदार तत्कालीन महार या शूर जातीतील नेमलेले होते. या शिवाय त्यांच्या सैन्यात सुमारे पंचेचाळीस टक्के मुस्लिम समाजातील निष्ठावंत सैनिक आणि विश्वासू सहकारी होते.
या वरून हे सिद्ध होते की, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी कधीच नव्हते, त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात कधीही व कुठेही मस्जिद पाडल्याचा एकही पुरावा सापडत नाही. शिवरायांनी कल्याण च्या सुभेदाराच्या सूनेला आई समान मानून तीला सन्मान पूर्वक परत केली. या वरून त्यांचे चारित्र्य आणि स्त्री विषयक दृष्टिकोन दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची कटकारस्थान करून केलेली हत्या या ऐतिहासिक घटनांवर शिव व्याख्याते माननीय श्री विजय आवस्कर यांनी आपल्या अभ्यास पुर्ण शिव व्याख्यानातून प्रकाशझोत टाकला.
शिव व्याख्याते माननीय श्री विजय आवस्कर यांनी आपल्या व्याख्यानाच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराजांच्या वधाचे गूढ रहस्य शिवभक्त श्रोत्यांसमोर मांडताना ते म्हणाले की, येथील व्यवस्थेने आजवर छत्रपती शिवाजी महाराज आणि महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास आपल्या समोर येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे. आपल्या शिव व्याख्यानमालेचा समारोप करताना ते म्हणाले की, जर छत्रपती संभाजी महाराजांचा वध औरंगाजेबाने केला असे आपल्याला सांगितले जाते. हे उदाहरण जर सत्य व खरे असते तर छत्रपती संभाजी महाराजांच्या वधानंतर रायगडावर औरंगाजेबाचे राज्य यायला हवे होते.
व्याख्यानमाले नंतर उपरोक्त मंडळाच्या वतीने सर्वांच्या अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.या नंतर सायंकाळी ६ ते ८ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर पोवाडे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

No comments:
Post a Comment