माणगांव तालुका बौद्धजन पंचायत समितीचे संस्मरणीय माजी कार्यक्षम अध्यक्ष कालकथीत लहु रामजी सकपाळ !
बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : मुंबई वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे निवृत्त कर्मचारी, बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगांव या शाखेचे माजी अध्यक्ष, माणगांव तालुक्यात सर्वप्रथम भव्य दिव्य नियोजनबद्ध आणि शानदार आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करुन यशस्वीपणे पार पाडणारे बुद्ध, शिवछत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार करणारे रायगड जिल्ह्याच्या तळा तालुक्यातील कळसांबडे गावचे धम्म सारथी, सामाजिक कार्यकर्ते, समाज अध्वर्यू कालकथीत लहु रामजी सकपाळ हे तळा आणि माणगांव तालुक्याला लाभलेले सच्चे भीमसैनिक.
लहु रामजी सकपाळ यांनी माणगांव तालुका बौद्धजन पंचायत समितीच्या तालुका अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी माणगांव तालुक्यातील बौद्धजन पंचायत समितीच्या सर्व विभागीय शाखांच्या आजी- माजी पदाधिकारी आणि सर्व समाज बांधवांच्या समवेत सहविचार सभा घेऊन माणगांव तालुका बौद्धजन पंचायत समितीच्या कामकाजात सुसुत्रता आणून माणगांव तालुका बौद्धजन पंचायत समितीच्या सामाजिक, धार्मिक कामकाजाला चालना देऊन गतीमान केले.
लहु रामजी सकपाळ यांनी त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून माणगांव तालुक्याच्या ठिकाणी भव्य दिव्य आणि अलिशान असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह निर्मिती, २० मार्च क्रांती दिन नियोजन, धम्म चक्र प्रवर्तन दिन, संविधान गौरव दिन, महापरिनिर्वाण दिन, विश्व शांतिदूत तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रम आणि बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसार कार्यासाठी सामाजिक व धार्मिक सभा सम्मेलने आयोजित करुन यशस्वीपणे संपन्न केली.
विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक आणि धार्मिक चळवळ गतीमान करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या लहु रामजी सकपाळ यांना दरम्यान च्या काळात इंदापूर येथे वाहन अपघातात आपला एक पाय कायमचा गमवावा लागला होता, त्याच अपघातात त्यांच्या फुफ्फुसाला आणि करण्यांना मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापत झाली होती. या सर्व घटनांवर मात करून ते एखाद्या तरुणाला लाजवेल असे कार्यक्षमपणे सामाजिक व धार्मिक कामकाजात नियमित अहर्निश पणे निस्वार्थ भावनेने काम करत होते. त्यामुळे त्यांच्या निस्सीम कार्याचा सर्वत्र लौकिक असे. संपूर्ण रायगड जिल्ह्यासह माणगांव आणि तळा तालुक्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क निर्माण झाला होता.
अशा या क्रांतिकारी सच्चा भीमसैनिकाचे रविवार दिनांक ०४/ १० / २०२० रोजी निधन झाले. आणि त्यांचा सकपाळ परिवार, हितचिंतक, मित्र परिवार , बौद्धजन पंचायत समिती व संपूर्ण रायगड जिल्ह्यासह माणगांव आणि तळा तालुका शोकाकुल झाला. आज ०४ ऑक्टोबर रोजी त्यांचा प्रथम स्मृती दिन या दिना निमित्त त्यांच्या क्रांतिकारी स्मृतीस विनम्र अभिवादन...!

No comments:
Post a Comment