अंबिवली- मुरबाड नवीन रेल्वे लाईनला मानिवली गावातील शेतकऱ्यांचा रेड सिग्नल, ज्वांईट सर्वेचे काम थांबवले, सोळाशे गुंठे शेतजमीन व पंचवीसे फळझाडे बाधित !!
कल्याण, (संजय कांबळे) : सबका साथ सबका विकास, अशी वल्गना करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा 'विकास कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठला असून याला तीव्र विरोध होत असून याचाच एक भाग म्हणून काल कल्याण माळशेज घाटमार्गे अहमदनगर (अहिल्याबाई देवी नगर) या प्रस्तावित रेल्वे मार्गातील अंबिवली ते मुरबाड या २८ किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे लाईन च्या ज्वांईट सर्वे ला मानिवली गावातील शेतकऱ्यांनी प्रखर विरोध करत हे काम थांबवले, रेल्वेच्या या भू संपादनामुळे सुमारे१६ शे गुंठे उपजाऊ (बागायती) शेतजमीन तर तब्बल २५ शेकडा विविध प्रकारचे फळझाडे बाधित होणार आहेत. भविष्यात या रेल्वे लाईन ला शेतकऱ्यांचा विरोध वाढेल अशी स्थिती दिसून येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाचा प्रश्न चर्चेला येत आहे, तर नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पावर गट) चे बाळ्यामामा म्हात्रे यांनी गाजर अंदोलन केले, मुरबाड रेल्वे ही केवळ गाजर दाखविण्याचे काम असल्याचा आरोप करण्यात आला होता, तर कोणत्याही परिस्थितीत मुरबाड रेल्वे होणारच असा दावा केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी केला आहे. याचाच एक भाग म्हणून यासंबंधी राजपत्र देखील जारी करण्यात आले. यामध्ये अनेक वेळा हे मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला गेला,
आता कल्याण माळशेज घाट मार्गे अहमदनगर या प्रस्तावित मार्गावरील अंबिवली ते मुरबाड या २८ किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे लाईन ची मोजणी, सर्वेक्षण, संपादन सुरू केले आहे. या करिता विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे मानिवली येथे आले होते. यावेळी येथील शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केला.
रेल्वे अधिनियम १९८९ कलम २०(डि)१ नुसार भू संपादन आणि वापरास तीव्र हरकत व विरोधात करत ज्वांईट सर्वे चे काम बंद पाडले. या नवीन रेल्वे लाईन मुळे मानिवली गावातील शेकडो शेतकऱ्यांची घरे, सुमारे १६०० गुंठे उपजाऊ शेतजमीन बाधित होणार आहे, तर तब्बल २५०० फळझाडे यामध्ये आंबा, चिकू, काजू, पेरु, अशा झाडांची कत्तल होणार आहे. या रेल्वे मुळे शेतकरी भूमिहीन व स्थलांतरित होणार आहेत, अगोदरच मुंबई वडोदरा एक्सप्रेस मध्ये हजारो एकर शेती गेल्याने शेतकरी पूरता हवालदिल झाला आहे. अशातच आता या नवीन रेल्वे मार्गामुळे शेतकरी उध्वस्त होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी याला प्रखर विरोध केला आहे. या अगोदर अंबिवली, मोहिली येथील शेतकऱ्यांनी विरोध केला होता, आता मानिवली गाव रेल्वे विरोधात उभे ठाकले आहे.
नुकत्याच सुरू केलेल्या रेल्वेच्या ज्वांईट सर्वेला विरोध करण्यासाठी घटनास्थळी चंद्रकांत गणपत गायकर, सुनील गायकर, व्दारकानाथ गायकर, भाऊ गायकर, संतोष गायकर, संतोष वारघडे, बळीराम गायकर, जालिंदर गायकर, रमेश आत्माराम केणे, सुनील केणे, कृष्णा गायकर, बळीराम शंकर गायकर, अंनता गायकर, काळुराम गायकर, शालिक गायकर, आणि तुकाराम नवसू गायकर आदी शेतकरी उपस्थित होते. या सर्वानी काम थांबवून रेल्वे लाईन ज्वांईट सर्वे विरोधातील पंचनामा पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या,
यावेळी तलाठी साळवी, सर्वेहर राहुल पाटील, रेल्वे अधिकारी कदम, तसेच कृषी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
याबाबत कल्याण चे प्रांताधिकारी विश्वास गुजर यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही, तर यासंदर्भात आमच्या जास्तीत जास्त हरकती, विरोध, प्रांताधिकारी कल्याण यांच्या कडे नोंदविण्यात येतील असे वकील सुनील गायकर यांनी सांगितले तसेच या रेल्वे साठी सुमारे ११ हेक्टर गायरान ही सरकारी जमीन उपलब्ध आहे, ती बुडित नाही, उंचीवर आहे येथे कोणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाहीत, असे असताना हा' विकास, शेतकऱ्यांच्या मुळावर का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे..
No comments:
Post a Comment