आज ठाण्यात योगेंद्र यादव यांचे व्याख्यान !
ठाणे दि. ५
आज बुधवारी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात, सायं. ७ः३० वा. भारत जोडो अभियानच्या वतीने ‘लोकशाही, संविधान व मताधिकार’ या विषयावर नागरिकांचे सांस्कृतिक संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय संयोजक व प्रसिद्ध निवडणूक विश्लेषण तज्ञ योगेंद्र यादव यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. यावेळी लोकशाहीर संभाजी भगत व त्यांचे सहकारी आंबेडकरी जलशाची झलक सादर करणार आहेत. भारत जोडो अभियानचे राज्य संयोजक उल्का महाजन व डॅा. संजय मंगला गोपाळ यांचेही यावेळी मार्गदर्शन होईल. भारत जोडो अभियान कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसून देशातील नागरिकांचे संवैधानिक हक्क शाबूत रहावेत व जगणे सुसह्य व्हावे यासाठी कार्यरत संघटना आहे.
देश कधी नव्हे तो संक्रमण काळातून जात आहे. लोकसभा निवडणुकीत विद्यमान सत्ताधाऱ्यांचा चारसो पारचा नारा निष्प्रभ करत, विरोधकांनी त्यांना कुबड्यांवरील सरकार स्थापन करायला लावले. यात महाराष्ट्रातील जनतेचा सिंहाचा वाटा राहिला आहे. तशीच जागरुकता आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम रहावी, यादृष्टीने सदर सांस्कृतिक संमेलन आयोजित केले असल्याचे भाजोअ कोकण विभाग संयोजक मुक्ता श्रीवास्तव व राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले.
देशातील विद्यमान सरकारच्या गेल्या १०-११ वर्षांच्या काळात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या हमीभावास नकार, ठराविक कार्पोरेट कंपन्यांना मलिदा आणि आदिवासी व संघटीत - असंघटीत कामगारांच्या दैन्यावस्थेत भर, अशी स्थिती बिघडत चालली आहे. मणिपूर पासून बदलापूर पर्यंत महिला अत्याचाराच्या करूण कहाण्या वाढत आहेत. राज्यातील सरकारही फसवणुकीच्या आधारे सत्तेवर आले असून, केंद्राच्या टेकूवर ते तग धरुन आहे. राज्याच्या हितापेक्षा स्वतःचे व स्वपक्षाचे हित अशी महायुतीतील पक्षांची वाटचाल सुरु आहे. डबल इंजिन सरकार म्हणतांना सर्वसामान्यांवरील अत्याचार व बेहालीत दुप्पट वाढ झाली आहे. लोकशाही अधिकारांचे व अभिव्यक्ति स्वातंत्र्याचे हनन होते आहे.
अशा परिस्थितीत राज्यात सत्तापरिवर्तन घडवून आणण्याच्या प्रयत्नास भारत जोडो अभियान ही कटीबद्ध आहे. संविधानवादी ठाणेकर नागरिकांनी या सांस्कृतिक संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ठाण्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व संमेलन संयोजक जगदीश खैरालिया व वंदना शिंदे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment