मोहने येथील ‘संघानी क्लिनिकचे; सांडपाणी रस्त्यावर !!
** बायोमेडिकल कचऱ्यामुळे नागरिक हैराण
मोहने, संदीप शेंडगे : स्वर्गीय काशिनाथ तरे मार्केट गाळेगाव परिसरातील डॉक्टर संघानी क्लिनिकच्या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांचा संताप उफाळून आला असून, संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी पुढे येत आहे. क्लिनिकमधून बाहेर पडणारे ड्रेनेजचे घाण पाणी थेट रस्त्यावर सोडले जात असल्याने परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक रहिवाशांच्या मते, या सांडपाण्यामुळे रोजच्या ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः लहान मुले, महिलां आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, क्लिनिक परिसरात वापरलेली इंजेक्शन्स, औषधांच्या रिकाम्या बाटल्या, तसेच एक्सपायरी झालेल्या गोळ्या यांसारखा बायोमेडिकल कचरा उघड्यावर फेकण्यात येत असल्याचेही उघड झाले आहे. या प्रकारामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या सर्व प्रकाराविरोधात स्थानिक रहिवासी भगवान सोढा व इतर नागरिकांनी एकत्र येत सह्यांची मोहीम सुरू केली असून प्रशासनाने त्वरित दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
नागरिकांनी पालिकेच्या आरोग्य विभागाला स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की, क्लिनिकमधून होणारे सांडपाणी तात्काळ थांबवावे व बायोमेडिकल कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करावे. अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment