Monday, 16 March 2026

बोकडविरा येथे कबड्डीच्या सामन्यांचा थरार !!

बोकडविरा येथे कबड्डीच्या सामन्यांचा थरार !!

प्रत्येकाला गाववाल्यांच्या खांद्याची जाणीव हवी : महेंद्रशेठ घरत 

उरण दि १६, (विठ्ठल ममताबादे) : "उरण हे ऐत्याहासिक पार्श्वभूमी असलेले शहर आहे. कबड्डी हा मातीशी निगडित मर्दानी खेळ आहे. अशा या कबड्डीची परंपरा आजही बोकडविरा येथे जपली जातेय. येथील सर्व ग्रामस्थ कबड्डीसाठी एकत्र येतात, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. गावाशी प्रत्येकाचे अतूट नाते हवे. कारण शेवटी गाववाल्यांच्या खांद्यावरूनच आपल्याला शेवटचा प्रवास करायचा असतो, याची जाणीव हवी. त्यामुळे गावातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे आपले कर्तव्यच असते. तेथे कधीही राजकारण आडवे येता कामा नये. गावाचा सर्वांगीण विकास हे ध्येय उराशी बाळगणारी मंडळी हवीत, तर गावाचा विकास होतो. माझ्याकडे जे जे आहे ते ते देण्याचा मी प्रयत्न करतोय, त्यामुळे ग्रामस्थांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे," असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी बोकडविरा येथे मत मांडले. सरपंच कबड्डी चषकाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर, पंचायत समिती सदस्य दीपक भोईर, बोकडविरा सरपंच अपर्णा पाटील, उपसरपंच ध्रुव पाटील, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आस्वाद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. श्री गणेश मित्र मंडळ बोकडविरा (गणेशपूर) आणि ग्रामस्थ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सरपंच कबड्डी चषक आयोजित करण्यात आला आहे. त्याचे उदघाटन रविवारी (ता. १५) सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते झाले.  

यावेळी माजी आमदार मनोहर भोईर म्हणाले, "जर आपला समाज एकत्र असला तर आपण कितीही उंच भरारी घेऊ शकतो. भावना घाणेकर यांना उरणच्या जनतेने बहुमताने निवडून दिले, ही समाजाची ताकद आहे. आमच्याकडे सत्ता नाही तरीही महेंद्रशेठ, भावना घाणेकर आणि मी पक्षाशी एकनिष्ठ आहोत. सत्ता येते, सत्ता जाते, पण सत्तेचा माज नसावा."  

उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर म्हणाल्या, "वास्तविक मी निवडणुकीला उभीच राहणार नव्हती; परंतु महेंद्रशेठ आणि मनोहर भोईर यांच्या हट्टापायी मी निवडणुकीला उभी राहिले. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माझा पाय मुरगळला, पण तरीही मी पायाला भिंगरी लावल्यागत लोकांपर्यंत गेले. कारण मी आगरी समाजाची वाघीण आहे. माझ्यावर उरणच्या जनतेने विश्वास दाखवला आहे, आता तो सार्थ ठरवायचा आहे." सरपंच कबड्डी चषकात रायगड आणि कोकणातील ३२ संघांनी सहभाग घेतला आहे. यावेळी जयवंत पाटील, निर्मलाताई पाटील, मनोज पाटील, गावचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment

कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत, न्याय मागण्यांबाबत भारतीय मजदूर संघाचा भव्य ‘कामगार आक्रोश मोर्चा’ !!

कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत,  न्याय मागण्यांबाबत भारतीय मजदूर संघाचा भव्य  ‘कामगार आक्रोश मोर्चा’ !! ** १६ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथ...