महाविकास आघाडीचे उरणचे नेते आजारी कार्यकर्त्यांच्या भेटीला !!
** माजी आमदार मनोहर भोईर, भावना घाणेकर, महेंद्रशेठ घरत यांचा एकाच मोटारीने प्रवास
उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) : कार्यकर्ते हेच राजकीय पक्षांचे खरे बळ असते; परंतु बऱ्याच वेळा निवडणुका झाल्या की कार्यकर्ते अडगळीत पडतात. त्यांना फारसे कुणी विचारतेच असे नाही. मात्र याला अपवाद उरणमधील महाविकास आघाडीचे नेते ठरले आहेत. क्रिकेटप्रेमी आणि पेट्रोलियम युनियनचे सरचिटणीस किरीट पाटील यांचा अलीकडेच पाय मुरगळा आहे. त्यामुळे त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया केलेली आहे. सध्या ते बेडरेस्टवर आहेत. तसेच अखलाख शिलोत्री हे ज्येष्ठ कार्यकर्तेही आजारी असल्याचे महेंद्रशेठ घरत यांना समजले. नुकतेच शिवसेनेचे माजी आमदार मनोहर भोईर, नगराध्यक्षा भावना घाणेकर (राष्ट्रवादी काँग्रेस), काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत उरण तालुक्यातील बोकडविरा येथे कबड्डी सामन्यांच्या उदघाटनप्रसंगी एकत्र आले होते. कबड्डी हा मातीतला खेळ, बोलता बोलता महेंद्रशेठ घरत यांनी किरीट पाटील आणि अखलाख शिलोत्री आजारी असल्याचा विषय औपचारिक गप्पांत काढला. त्यामुळे मी लवकर निघतो, असेही म्हणाले. परंतु शिवसेनेचे माजी आमदार मनोहर भोईर आणि नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनीही आपण सोबत येत असल्याचे सांगितले. त्यानंतर चक्क महाविकास आघाडीचे तिघे नेते एकाच गाडीने अखलाख शिलोत्री आणि त्यानंतर किरीट पाटील यांच्या घरी रात्री नऊच्या दरम्यान पोहोचले. तेव्हा आजारी असलेल्या कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले, आपल्या तब्बेतीविषयी चौकशी करण्यासाठी माजी आमदार मनोहर भोईर, उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर, महेंद्रशेठ घरत एकत्र आल्याने आजारी कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आनंद झाला. त्यानंतर नेते आणि कार्यकर्ते मस्त गप्पांत रमले. ख्यालीखुशाली विचारून महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते यांनी अशीच वज्रमूठ ठेवून उरणच्या विजयाची पताका फडकवू या, असा आशावाद व्यक्त केला. विशेष म्हणजे उरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर यांचा निवडणुकीदरम्यान स्वतःचाच पाय मुरगळला आहे. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रियाही होणार आहे; परंतु त्या अशा अवस्थेत स्वतःला विसरून आजही अनेक कार्यक्रमांत सहभागी होतात, कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखातही जातात. यामुळे समाजात त्यांच्याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे
No comments:
Post a Comment