Monday, 26 January 2026

चॅलर्स ब्रिगेड,आव्हान २०२५-२६, राज्य स्तरीय अंतरविद्यापीठ आपत्ती पूर्व तयारी प्रशिक्षण शिबिरात रायगड जिल्हा राष्ट्रीय सेवा योजनेच्या संघाचा यशस्वी सहभाग " !!

*" राजभवन आयोजित ; **चॅलर्स ब्रिगेड,आव्हान २०२५-२६, राज्य स्तरीय अंतरविद्यापीठ आपत्ती पूर्व तयारी प्रशिक्षण शिबिरात रायगड जिल्हा राष्ट्रीय सेवा योजनेच्या संघाचा यशस्वी सहभाग " !!

मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रा. सुशिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सेवा योजना रायगड जिल्हा समन्वयक प्रा. तुळशिदास मोकल यांच्या नियोजनाने  रायगड जिल्ह्याच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा संघ शेठ जे.एन. पालीवाला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.अनिल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आयोजित केलेल्या आंतरविद्यापीठ आपत्तीपूर्व तयारी प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाला होता. या शिबिरात महाराष्ट्र राज्यातील २४ विद्यापीठ व ३६ जिल्ह्यातून १०४८  विद्यार्थी  व ८७ संघनायक कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले होते.
 
शिबिराचा मुख्य उद्देश राष्ट्रीय  सेवा योजनेच्या स्वयंसेवकांमध्ये नैसर्गिक व  मानव निर्मित आपत्तीला सामोरे जाण्यासाठी  जाणीव निर्माण करणे, त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण देणे तसेच स्वयंसेवकांमध्ये सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक जाणीव, शिस्त व राष्ट्रीय मूल्ये रुजविणे हा होता.

आव्हान शिबिरात सहभागी झालेल्या राष्ट्रीय सेवा  योजनेच्या स्वयंसेवकांना राष्ट्रीय आपदा निवारण बल (NDRF) च्या जवान व अधिकाऱ्यांनी सलग आठ दिवस बचावकार्य, आपत्कालीन परिस्थितीत, प्रतिसाद, प्राथमिक उपचार, शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, तसेच आपत्ती काळातील योग्य व्यवस्थापन याबाबत सखोल प्रशिक्षण दिले.तसेच तज्ञ मार्गदर्शकांकडून आपत्ती  व्यवस्थापन विषयक व्याख्यानाच्या माध्यमातून  ज्ञान दिले. 

आव्हान आपत्ती व्यवस्थापन शिबिरातील सांस्कृतिक मिरवणुकीत रायगड जिल्ह्याच्या संघाने पारंपरिक बाल्या नृत्य सादर करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्याच प्रमाणे मुलींनी कोळी नृत्य सादर करून रायगडच्या लोकसंस्कृतीचे सुंदर दर्शन घडवले. मिरवणुकीच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेतील दोनच राजे इथे गाजले ही नाटिका सादर करून स्वराज्य, न्याय, समता, बंधुता व समानतेचा प्रभावी संदेश दिला. या सादरीकरणाची दखल घेवून आयोजकांनी ३६ जिल्ह्यातून रायगड जिल्ह्याच्या संघाची निवड करून प्रतिष्ठेचा समजला जाणारा सर्वोत्तम मिरवणूक पुरस्कार डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद रामराव गडाख यांच्या शुभहस्ते शिबिराच्या समारोप कार्यक्रमात रायगड जिल्ह्या संघाला प्रदान केला.
 
या शिबिरासाठी रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक व कार्यक्रम अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

तसेच सी. के. टी. महाविद्यालय, पनवेल  व शेठ जे.एन.पालीवाला महाविद्यालय पाली-सुधागड  यांचे विशेष सहकार्य लाभले. रायगड जिल्ह्याच्या आव्हान शिबिरातील कामगिरीची दखल घेवून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. रविंद्र कुळकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ . प्रसाद कारंडे यांनी रायगड जिल्ह्याच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या संघाचे कौतुक व अभिनंदन केले.

सौजन्य/प्रसिद्धी करिता - अश्विनी निवाते 

चिमुकल्यांच्या हसण्यात उमटली माणुसकी; आश्रम शाळेत मायेने खाऊ वाटप !!

चिमुकल्यांच्या हसण्यात उमटली माणुसकी; आश्रम शाळेत मायेने खाऊ वाटप !!

ठाणे | प्रतिनिधी —
७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र सकाळी कै. निर्मलादेवी चिंतामण दिघे आश्रम शाळेत एक अतिशय भावूक दृश्य पाहायला मिळाले. हातात खाऊ मिळताच चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हसू आणि डोळ्यांत चमकलेला आनंद उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून गेला.

सकाळी ८.३० वाजता झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना फ्रुटी, बेल बॉण्ड, ब्रिटानिया बिस्किटे व बालाजी वेफर्स यांचे प्रेमाने वाटप करण्यात आले. एखादा लहानसा खाऊ, पण त्यामागची माया, आपुलकी आणि माणुसकीचा भाव या उपक्रमाला खऱ्या अर्थाने मोठे करून गेला.

या कार्यक्रमाचे आयोजन दिनेश बुचडे, दीपक तेली, संजय गुप्ता, विनय प्रजापती व विशाल कुरकुटे यांच्या वतीने करण्यात आले. शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि उपस्थित मान्यवरांनी या सेवाभावी उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
“मुलांच्या हसण्यातच जीवनाचा खरा अर्थ सापडतो,” हे या दिवशी पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले.

खान्देश महिला मंडळ नवी मुंबई उरण तर्फे उरण मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न !

खान्देश महिला मंडळ नवी मुंबई उरण तर्फे उरण मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न !

उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) :
खान्देश महिला मंडळ नवी मुंबई उरण तर्फे उरण मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.श्री प्रसाद हौसिंग सोसायटी नागाव रोड उरण येथे हळदी कुंकू कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.खान्देश महिला मंडळ नवी मुंबई उरण तर्फे उरण मध्ये महिलांनी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे जेष्ठ महिलांकडून पूजन करून हळदीकुंकू साजरि केली.या कार्यक्रमास महिलांनी भरभरून मदत कार्य केले.या कार्यक्रमात महिला भगिनींनी उस्फुर्त सहभाग घेतला. जयश्री विशाल महान, पुष्पा सूर्यवंशी, ज्योती चिते,राजश्री मोरे तसेच  दुर्गा पाटील, मनीषा मोरे, साधना पाटील,दुर्गा पाटील यांनी  विशेष मेहनत घेतली.भारतीय संस्कृतीत हळदी कुंकू कार्यक्रमाला विशेष महत्व असून या कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीचे सर्वत्र जतन, संवर्धन होत आहे. शिवाय या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला आपापसातील मतभेद विसरून एक होतात. एकत्र येतात त्या दृष्टीने सामाजिक प्रबोधन, सामाजिक एकता या कार्यक्रमातून सर्वत्र साधला जात आहे.

'महेंद्रशेठ घरत चषक' आणि 'करंजाडे प्रीमियर लिग'चे महेंद्रशेठ यांच्या हस्ते झोकात उदघाटन !

'महेंद्रशेठ घरत चषक' आणि 'करंजाडे प्रीमियर लिग'चे महेंद्रशेठ यांच्या हस्ते झोकात उदघाटन !

करंजाडे मैदानासाठी राजकीय चपला बाजूला ठेवा : महेंद्रशेठ घरत

उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) ::"करंजाडे गावावर माझे विशेष प्रेम आहे. मी जिल्हा परिषद सदस्य असताना करंजाडे गावाला जलकुंभ बांधला होता. महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यावेळी केले होते. आता करंजाडे गावाला मैदान हे मिळालेच पाहिजे. यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आणि तरुणांनी राजकीय चपला बाहेर ठेवाव्यात. मैदानासाठी आमदारांचे पत्र आणा, आपण पाठपुरावा करून करंजाडेसाठी अधिकृत मैदान मिळवू," असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते महेंद्रशेठ घरत करंजाडे येथे म्हणाले. त्यांच्या हस्ते करंजाडे प्रीमियर लिगचे आणि पारगाव येथे बॅड बाईज ग्रुपने आयोजित केलेल्या 'महेंद्रशेठ घरत चषका'चे उदघाटन शनिवारी (ता. २४) झाले. यावेळी करंजाडे सरपंच मंगेश शेलार, रामेश्वर आंग्रे, विनोद साबळे, मारुती गायकर, सुनील भोईर, मारुती पोपट, बळीराम भोईर, सनी कैकाडी, योगेंद्र कैकाडी, अजय साबळे, संतोष विखारे, अनिल भोईर, विजय आंग्रे, योगेश राणे, तानाजी शेलार, मेघदूत कैकाडी, हेमंत गायकर आदी उपस्थित होते.

पारगाव येथे महेंद्रशेठ घरत म्हणाले, "मी क्रिकेटचा चाहता आहेच; परंतु माझ्या नावाने क्रिकेट स्पर्धा भरवून पारगावच्या तरुणांनी मला एक वेगळीच एनर्जी दिली आहे. त्याबद्दल बॅड बॉईज ग्रुपचे अभिनंदन. त्यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले आहे, चांगल्या प्रकारची बक्षिसे आहेत. काँक्रिटच्या जंगलात मैदान हवेच आणि गावांची ओळखही जपायला हवी, यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा. मी खंबीरपणे त्यांच्या मागे आहे."

यावेळी माजी सरपंच विश्वनाथ पाटील, सुशीलकांत तारेकर, शेखर देशमुख, उरण तालुका प्रमुख विनोद म्हात्रे, अलंकार परदेशी, वैभव पाटील,  तसेच एम. जी. ग्रुपचे सहकारी आणि परिसरातील क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नितेश पंडित यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.

मोठीजुई शाळेत विद्यार्थ्यांनी केले परसबागेतुन 'पक्षीनिरीक्षण' !

मोठीजुई शाळेत विद्यार्थ्यांनी केले  परसबागेतुन  'पक्षीनिरीक्षण' !

उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) : निसर्गाबद्दल प्रेम आणि कुतूहल जागृत करण्याच्या उद्देशाने उरण तालुक्यातील मोठीजुई येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अनोख्या 'पक्षीनिरीक्षण' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या स्वतःच्या परसबागेत राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर पडून निसर्गाचे जवळून निरीक्षण करण्याची संधी मिळाली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिक्षकांच्या पुढाकाराने हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला. शाळेची परसबाग विविध प्रकारच्या भाज्या, फळे आणि फुलांनी बहरलेली असल्यामुळे तिथे अनेक स्थानिक पक्ष्यांचा वावर असतो. याच नैसर्गिक वातावरणाचा फायदा घेत, विद्यार्थ्यांना सकाळी लवकर शाळेच्या बागेत जमण्यास सांगण्यात आले. 

यावेळी विद्यार्थ्यांनी दुर्बिणीतून  शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शांत राहून पक्ष्यांच्या हालचाली कशा टिपायच्या, याची माहिती दिली. या निरीक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळाले. यामध्ये प्रामुख्याने चिमण्या, कावळे, पोपट,साळुंक्या, लाल बुडाचा बुलबुल, भारद्वाज, खाटिक,वटवट्या,व्हला,कबुतर, आणि काही फुलचुख्यांचा (सनबर्डस) समावेश होता. विद्यार्थ्यांनी पक्ष्यांचे रंगरूप, आवाज आणि त्यांच्या खाण्याच्या सवयींचे बारकाईने निरीक्षण केले. काही विद्यार्थ्यांनी तर त्यांच्या निरीक्षणांची नोंद वहीत करून ठेवली. "केवळ पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता," असे शाळेचे उपक्रमशील शिक्षक कौशिक ठाकूर यांनी सांगितले. "परसबाग हे यासाठी उत्तम ठिकाण ठरले, कारण तिथे सहजपणे अनेक पक्षी आकर्षित होतात. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता आणि संवेदनशीलता वाढीस लागते." या यशस्वी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी अधिक गोडी निर्माण झाली असून, भविष्यात असे आणखी उपक्रम राबवण्याचा मानस शाळा प्रशासनाने व्यक्त केला आहे. सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी अविनाश नवाले, कौशिक ठाकूर, विश्वनाथ गावंड, यतीन म्हात्रे, दर्शन पाटील, अंकुश पाटील, काजल पाटील यांनी मेहनत घेतली.

युवा चित्रकार वरद यांचे चित्रकला विषयावर भानूबेन प्रवीण शहा विद्यालयात प्रात्यक्षिक !

युवा चित्रकार वरद यांचे चित्रकला विषयावर  भानूबेन प्रवीण शहा विद्यालयात प्रात्यक्षिक !

उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) :
 युसुफ मेहर अली सेंटर संचलित भानूबेन प्रवीण शहा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तारा येथे विद्यार्थ्यांसाठी 'प्रवास चित्रकलेचा' या विशेष उपक्रमांतर्गत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उरणचे सुपुत्र,युवा चित्रकार वरद खुशाली विलास गावंड यांनी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर शाळेतील शिक्षिका रवीना म्हात्रे यांचे 'व्यक्तिचित्र' रेखाटण्याचे  प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची वैयक्तिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि रचनात्मक वैचारिक वृद्धी व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

   चित्रकला ही केवळ कागदावरील रंगकाम नसून ती विचारांना दिशा देणारे एक प्रभावी माध्यम आहे. सृजनशीलतेमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होते.

   कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक अरुण एस कदम, कलाशिक्षक सहदेव बाविस्कर, शिक्षिका रवीना आनंद म्हात्रे यांच्या विशेष सहकार्यासह विद्यालयातील व महाविद्यालयातील आर एम म्हात्रे, एस.जी जोशी,  एस आर म्हात्रे, आर डी पाटील,  एस एल पाटील, एन के मोकल आदी शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या वतीने चित्रकार वरद यांचे आभार मानण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला विषयाबद्दल नवचैतन्य निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

उरण पोलीसांची मुस्कान मोहीम: भरकटलेली महिला व मुलगा परतले घरी !

उरण पोलीसांची मुस्कान मोहीम: भरकटलेली महिला व मुलगा परतले घरी !

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : उरण पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी ऑपरेशन मुस्कान मोहिमेअंतर्गत उरण बाजारपेठेत भरकटलेल्या महिला आणि मुलाला वाचवले. आशिया परवीन कलाम हुसेन (३२) आणि त्यांचा मुलगा फैजान कलाम हुसेन (१०) हे झारखंडच्या गिरीडी जिल्ह्यातील निवासी असून, कौटुंबिक वादातून घर सोडून बंगलोर जाण्यासाठी चुकीची ट्रेन पकडून उरण येथे आले होते.

पोलीसांनी सखोल चौकशी करून आशियाच्या पती कलाम हुसेन यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आशियाचा भाऊ गया सुदिन आयूब अली अन्सारी उरण पोलीस स्टेशन येथे हजर झाला आणि त्यांना व सदर मिसिंग महिला व मुलगा यांना पोलीस निरीक्षक राहुल कटवानि (गुन्हे) यांचे समक्ष हजर करून त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदर प्रकरणात पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी त्वरित कार्यवाही करून आशिया आणि त्यांच्या मुलाला सुरक्षित त्यांच्या परिवाराच्या ताब्यात दिले. या कार्यवाहीसाठी पोलीस निरीक्षक राहुल कटवानि (गुन्हे) यांनी पोलीस हवालदार  सचिन पाटील यांना शाबासकी दिली आहे.  पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी या अगोदरही अनेक हरविलेल्या व्यक्तींची घर वापसी केलेली आहे. अनेकांना योग्य मार्गदर्शन करून भरकटलेल्यांना योग्य मार्ग दाखविला आहे. सचिन पाटील यांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवामुळे गावांत एकोपा वाढतो : महेंद्रशेठ घरत

सार्वजनिक गणेशोत्सवामुळे गावांत एकोपा वाढतो : महेंद्रशेठ घरत

** पिरकोन आणि भोम येथे माघी गणेशाची २५ वर्षांची परंपरा

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला, त्यामागे लोकांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने नांदत लोकचळवळ उभी राहावी, हा उदात्त हेतू होता. पिरकोन हे सुशिक्षितांचे गाव आहे. या गावात गेल्या अनेक वर्षांपासून माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्याची परंपरा गेल्या २६ वर्षांपासून पिरकोनने जपली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने गावकरी एकत्र येतात, विचारांची देवाण-घेवाण होते. त्यामुळे गावात एकोपा राहण्यास मदत होते. गावातील तंटे कमी होतात. त्यामुळे तरुणांनाही प्रोत्साहन मिळते, गावचा विकास चांगल्या प्रकारे होतो," असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ पिरकोन येथे म्हणाले. शनिवारी (ता. २४) रात्री त्यांनी उरण तालुक्यातील पिरकोन आणि भोम येथे माघी गणेशाचे दर्शन घेतले. त्यावेळी ते बोलत होते.

भोम येथे बोलताना महेंद्रशेठ घरत म्हणाले, "गावातील चांगल्या मंडळींचे सत्कार करण्याची प्रथा चांगली आहे. गाव उत्तम आणि निटनेटके आहे, स्वच्छताही आहे. शिवरायांचे दर्शन गावच्या वेशीवर होत असल्याने ग्रामस्थांत सकारात्मक विचारांची पेरणी झालेली आहे. सतत उपक्रमशील गाव असल्याने भोमवासीयांचे अभिनंदन करतो."
 यावेळी भोमच्या ग्रामस्थांनी आणि साईंची मानाची पालखी काढणाऱ्या तरुणांनीही महेंद्रशेठ घरत यांना आगरी समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला. 
यावेळी सर्पमित्र राजेश पाटील, गायिका प्रांजल पाटील, शैक्षणिक विभागात चमकलेला साई पाटील, साईबाबांच्या पालखीचे प्रमुख समाधान पाटील, क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरीय कामगिरी करणारा स्मित नारंगीकर यांच्याही यावेळी महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी अष्टविनायक मित्र मंडळ व महिला मंडळ मोठे भोम यांच्यातर्फे स्टेप आर्ट एंटरटेन्मेंट आणि पप्पू सूर्यराव निर्मित स्वर नृत्याचा आविष्कार हा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. विविध नृत्यांवर गावकऱ्यांनी आनंद घेतला. यावेळी काँग्रेसचे उरण तालुका प्रमुख विनोद म्हात्रे, ऍड. अविनाश ठाकूर, घनश्याम पाटील, विजय केणी, अलंकार परदेशी, आनंद ठाकूर, किरण कुंभार, उमेश भोईर, भारती ठाकूर, राजेंद्र पाटील, किशोर केणी, सुशील पाटील, रवींद्र भगत, रोषण मोकल, गणेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

उरण हादरलं :चोरट्यांनी गुरांसोबत तरुणालाही गाडीत डांबले,सतर्क नागरिकांच्या धाडसाने चोरटे जेरबंद !

उरण हादरलं :चोरट्यांनी गुरांसोबत तरुणालाही गाडीत डांबले,सतर्क नागरिकांच्या धाडसाने चोरटे जेरबंद !

** जखमी उमेश कोळी व गाई गुरांची सुखरूप सुटका.

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) :
उरण तालुक्यातील चाणजे परिसरात रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास एखाद्या चित्रपटालाही मागे टाकेल असा थरार पाहायला मिळाला जनावरे चोरण्यासाठी आलेल्या टोळीने त्यांना हटकणाऱ्या तरुणाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला मात्र तरुणाची सतर्कता आणि गावकऱ्यांच्या धाडसामुळे चोरट्यांची गाडी उलटली आणि उरण पोलिसांनी तीन चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. 

   चाणजे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच अजय म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे साडेतीन च्या सुमारास उमेश महादेव कोळी हा तरुण कामावरून घरी परतत असताना त्याला काही अज्ञात व्यक्ती फोरविलर गाडीतून गुरे पळवताना दिसल्या. उमेशने त्यांना जाब विचारला असता चोरट्याने त्यालाच पकडून गाडी डांबले आणि गुरांसोबत बांधून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. 

    गावकऱ्यांनी गाड्या काढून चोरट्यांच्या तवेरा गाडीचा पाठलाग सुरू केला. गावकऱ्यांची जिद्द पाहून चोरट्याने वेगाने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र या धावपळीथ चोरट्यांची गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली. मोठा आवाज आणि आरडाओरडा झाल्याने परिसरातील नागरिक जागे झाले. 

    गुरांसोबत आपल्या गावातील तरुणालाही बांधून नेल्याचा राग आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी चोरट्यांना घटनास्थळी चांगला चोप दिला. माहिती मिळताच उरण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तीन चोरट्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची गाडी जप्त केली. पोलीस एफ आय आर क्रमांक ००३२, भारतीय न्याय संहिता
२०२३ कलम११८(१), ११५(२), १२७(२) ,३५२(१) ,१४०(१) ३(५) ,महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम१९७६, नुसार कलम ५ ए, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ कलम ९, आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० ११(१) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून या  घटनेवर पोलिसांनी बारीक लक्ष ठेवले असून पुढील तपास चालू आहे. 

    उरण तालुक्यातील मागील अनेक दिवसांपासून तवेरा गाडीने गुरे चोरणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. आजच्या या घटनेमुळे ही मोठी टोळी उजेडात आली आहे. तरीही शेतकऱ्यांनी ,नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क रहावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

झेड.पी. शाळा फुंडे येथे लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरीतर्फे हेल्मेट वाटप !

झेड.पी. शाळा फुंडे येथे लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरीतर्फे हेल्मेट वाटप !

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी यांच्या वतीने झेड.पी. शाळा, फुंडे येथे हेल्मेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले.लहान वयापासूनच रस्ते सुरक्षेचे महत्त्व समजावे व सुरक्षित प्रवासाच्या सवयी लागाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमास लायन भूमिका सिंग (अध्यक्षा), लायन मोनिका चौकर (सचिव), लायन सीमा घरत (माजी अध्यक्षा), लिओ गोपाळ विटकर व लायन सोनिया पाटील यांची उपस्थिती लाभली. 

हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक रमणिक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व शालेय कर्मचारीवर्गाच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.यावेळी विशेष अतिथी म्हणून उमेश घरत  तसेच श्रीमती निर्मला मच्छिंद्र घरत (गट शिक्षण अधिकारी) उपस्थित होते. हा उपक्रम विद्यार्थी, पालक व शालेय प्रशासनाकडून प्रशंसित झाला असून, सुरक्षित व जागरूक समाज घडविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

न्हावा शेवा सी एच ए आधार सामाजिक संस्था आयोजित आधार चषक २०२६ स्पर्धा उत्साहात संपन्न !!

न्हावा शेवा सी एच ए आधार सामाजिक संस्था आयोजित आधार चषक २०२६ स्पर्धा उत्साहात संपन्न !!

** रसिक प्रेषक, तरुण वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग.

** विविध मान्यवराकडून स्पर्धेचे व संस्थेच्या कार्याचे कौतुक.

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : उरण विभागात सतत होत असलेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबासाठी तसेच दुखापत झालेल्या सीएचए बांधवांसाठी अपघात ग्रस्त निधी संकलनासाठी त्याचप्रमाणे विविध सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने  मी मराठी मैदान मोठी जुई,उरण येथे सी एच ए आधार चषकाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला रसिक प्रेषक, तरुण वर्गांचा मोठा उत्तम प्रतिसाद लाभला.दरवर्षी सीएचए आधार चषक या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते व स्पर्धेतील मिळणारी रक्कम अपघातग्रस्तांसाठी व सामाजिक कार्यासाठी वापरली जाते अशा या सीएचए आधार चषकासाठी नागरिकांनी, रसिक प्रेक्षकांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या स्पर्धेला भेट देऊन सदर स्पर्धेचे व संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी न्हावा शेवा सी एच ए आधार सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी संघ रॉकस्टार मोठीजूई ठरला तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ द्विज इलेव्हन पाले ठरला आहे. या संघावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोट (चौकट ):- 

संस्थेचे विषयी थोडक्यात माहिती :- 

 उरण तालुक्यात तसेच न्हावा शेवा बंदर परिसरात कस्टम हाऊस एजंट(C.H.A.) चे काम करणारे मराठी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात असून यात स्थानिक भूमिपुत्र मोठ्या प्रमाणात काम करीत आहेत. सीएचए (कस्टम हाऊस एजेंट) हे जेएनपीटी व न्हावा शेवा परिसरातील विविध कॅन्टेनर, ट्रक, टेम्पो, जड अवजड मालवाहू वाहने यांच्या कागदपत्राचे पासिंगचे (एक्सपोर्ट आणि इम्पोर्टचे) काम करतात. रात्रंदिवस काम करून, आपला जीव धोक्यात घालून संसार चालवितात व जमेल तेवढं समाजकार्य करतात. अशा या स्थानिक भूमिपुत्र मराठी तरुणांना न्याय मिळावा त्यांचे अधिकार व हक्क त्यांना मिळावेत अपघातग्रस्तांना मदत करता यावी यासाठी न्हावा शेवा सी एच ए आधार सामाजिक संस्थेची स्थापना झाली. आज पर्यंत अनेक सामाजिक कार्य या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. आजपर्यंत अपघातग्रस्त व अपघातात मृत्यू पावलेल्या  पूर्व विभागातील अनेक व्यक्तींना या संस्थेच्या माध्यमातून लाखो रुपयाची मदतही करण्यात आली आहे. उरण विभागात सतत होत असलेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबासाठी तसेच दुखापत झालेल्या सीएचए बांधवांसाठी अपघात ग्रस्त निधी संकलनासाठी सदर संस्था नेहमी अग्रेसर असते. त्याचप्रमाणे विविध सामाजिक कार्यही या संस्थेच्या माध्यमातून होत असतात.

वाजेकर महाविद्यालयास "उत्कृष्ट महाविद्यालय" पुरस्कार !

वीर वाजेकर महाविद्यालयास "उत्कृष्ट महाविद्यालय" पुरस्कार !

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) ::२५ जानेवारी २०२६ रोजी मतदार जागृती दिनाच्या दिवशी रयत शिक्षण संस्थेचे, वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,    महालण विभाग, फुंडे ला वर्ष २०२५-२६ मध्ये महाविद्यालयाच्या वतीने मतदान नोंदणी केल्याबद्दल रायगड जिल्हाधिकारी  किशन जावळे यांच्याकडून "उत्कृष्ट महाविद्यालय" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ह्या प्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, डी.एल.एल.ई. निवडणूक साक्षरता मंडळ,राज्यशास्त्र विभाग सर्व विद्यार्थी व सेवक यांच्या माध्यमातून वर्षभर महाविद्यालयात मतदान साक्षरता, मतदान जागृती, विद्यार्थी व  परिसरातील नागरिक नवमतदार नोंदणी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पध्दतीने मोठ्या प्रमाणात करून घेतली. मतदार जागृतीसाठी निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन, मतदान जागृती रॅली परिसरातील नवघर, भेंडखळ, जसखार, करळ, सोनारी, सिडको कॉलनी इत्यादी ठिकाणी काढण्यात आली. तसेच सेल्फी पॉइंटच्या माध्यमातून परिसरातील लोकांमध्ये जाऊन जागृती करण्यात आली. लोकांमध्ये मतदान करण्यास,मतदार नोंदणी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सर्व विभागाने मेहनत घेतली. इ व्ही एम मशीन ची प्रात्यक्षिके ठीक ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. 

या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पी.जे.पाटील, कॉलेज विकास समितीचे अध्यक्ष  बाळाराम पाटील, सुधीर घरत, उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले. पुरस्कार प्रदान करताना जिल्हा निवडणूक अधिकारी वाघमारे, अश्विनी पाटील  व अनेक मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, डॉ.आमोद ठक्कर, उपप्राचार्य,डॉ. अनिल पालवे, डॉ.संदीप घोडके, चेअरमन निवडणूक साक्षरता मंडळ, प्रा.राम गोसावी,राष्ट्रीय सेवा योजना चेअरमन, डॉ.राजकुमार कांबळे एनसीसी चेअरमन, प्रा.श्रीकांत गोतपागर, प्रा.गजानन चव्हाण उपप्राचार्य तसेच महाविद्यालयाच्या सर्व सेवकांचे यावेळी शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले.

उरणमध्ये बेकायदेशीर डेब्रिज टाकणाऱ्या ७ डंपरवर कारवाई !

उरणमध्ये बेकायदेशीर डेब्रिज टाकणाऱ्या ७ डंपरवर कारवाई !

** सिडको परीक्षेत्रात अनधिकृत डेब्रिज टाकत असल्यास प्रशासनाला कळविण्याचे सिडको प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन.

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या बेकायदेशीर डेब्रिज मूळे उरण मध्ये मोठया प्रमाणात प्रदूषण होत आहे. नवी मुंबई, मुंबई मधील डेब्रिज, घाण, कचरा उरण मध्ये टाकण्यात येत असल्यामुळे उरणच्या नागरिकांचा प्रश्न ऐरणी वर आला आहे.या पूर्वी मुंबई, नवी मुंबई मधील बेकायदेशीर डेब्रिज, घाण, कचरा उरण मध्ये टाकण्यात आले होते. तेंव्हा अनेक डम्पर चालकावर कारवाई करण्यात आली होती.परत उरण मध्ये अशीच घटना पुन्हा घडून आली आहे.

उरणमधील चिर्ले भागातील सिडकोच्या मोकळ्या जागेवर बेकायदेशीररीत्या डेब्रिज टाकण्यासाठी आलेले ७ डंपर पकडण्याची कारवाई सिडकोच्या पथकाने बुधवारी सायंकाळी केली. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या डंपर चालकांवर उरण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

२३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास चिर्ले भागातील हॉटेल गंगा रसोई या हॉटेलसमोरील रोडच्या कडेला माती आणि रॅबिट असलेले डेब्रिज टाकण्यासाठी काही डंपर आले होते. याबाबतची माहिती सिडकोच्या पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, तेथे हे डंपरचालक डंपरमधील डेब्रिज टाकण्यासाठी आल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर सिडकोच्या पथकाने उरण पोलिसांच्या मदतीने सर्व डंपर जप्त करून धीरज सरोज, विमलेशकुमार मदन, राजदेव लोधीया, जगदीश त्रिपाठी, मोहम्मद अकील हुसेन सय्यद, जियारहमान हाझीम अन्सारी आणि मोहम्मद यासीन नबी रहेम खान या डंपरचालकांविरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल केला आहे. सिडको परिक्षेत्रात अनधिकृत डेब्रिज. टाकत असताना नागरिकांना कोणी आढळल्यास त्यांनी त्वरित सिडकोच्या www.cidco. maharashrta.gov.in या वेबसाईटवर किंवा संबंधित पोलीस ठाण्यात कळवावे, असे आवाहन सिडकोने केले आहे

Sunday, 25 January 2026

नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग यशस्वीरीत्या संपन्न !!

नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग यशस्वीरीत्या संपन्न !!

कल्याण, दि. २३ (प्रतिनिधी):
नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे कार्यालय अंतर्गत मा. उपनियंत्रक श्री. विजय जाधव यांच्या मान्यता व मार्गदर्शनाखाली नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग क्र. ०४/२०२६ चे आयोजन दिनांक १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत ना.स. कल्याण कार्यालयातील प्रशिक्षण हॉल येथे करण्यात आले होते.

या प्रशिक्षण वर्गाची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आली. सदर परीक्षा विभागीय क्षेत्ररक्षक व मानसेवी निदेशक श्रीम. शकुंतला राय, कल्याण (प.) यांच्या सहकार्याने सहाय्यक उपनियंत्रक श्रीम. दिपा घरत यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रशिक्षण वर्गात एकूण ३२ प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला.

प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी मा. उपनियंत्रक नागरी संरक्षण श्री. विजय जाधव यांनी प्रशिक्षणार्थींना शपथ देऊन आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक जबाबदारी व नागरी संरक्षणाचे महत्त्व याबाबत मौलिक, उद्बोधक व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

सौजन्य - विश्वनाथ राऊत सर

खडवली येथील जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावरील बॉक्स लंगडी स्पर्धेत पटकावला पहिला क्रमांक !

खडवली येथील जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने  राष्ट्रीय स्तरावरील बॉक्स लंगडी स्पर्धेत पटकावला पहिला क्रमांक !

मुंबई (शांताराम गुडेकर)

             बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ इंडिया अँड बॉक्स लंगडी फेडरेशन ऑफ इंडिया यांनी शिर्डी येथे आयोजित केलेल्या बॉक्स लंगडी स्पर्धेत(१६ जानेवारी २०२६) जी. के. एस.कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली चे  विद्यार्थी कु.रोहित ठाकरे, कु. कौस्तुभ शेवाळे, कु. जीत गुरव, कु.सुजल फुलमाळी, कु.देवांस तिवारी, कु.पारस चेखलिया, कु.प्रणव डहाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे काठमांडू नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाविद्यालयाच्या संचालिका प्रा.कविता शिकतोडे मॅडम यांनी घवघवीत यशाबद्दल कौतुक करत यशस्वी विद्यार्थी वर्गाला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

            तसेच  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जी. सागर सर उपप्राचार्य श्री. प्रशांत तांदळे सर तसेच महाविद्यालयाचे  क्रीडा शिक्षक सौ.हर्षला विशे मॅडम व सहाय्यक क्रीडा शिक्षक श्री.बाळाराम चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राष्ट्रीय प्रतिज्ञेचे जनक ' पेदेमरी व्यंकट सुब्बाराव' !!

राष्ट्रीय प्रतिज्ञेचे जनक ' पेदेमरी व्यंकट सुब्बाराव' !!

आपली ''प्रतिज्ञा'' ही भारताविषयी कृतज्ञता दर्शवते, "भारत माझा देश आहे " ही भावना देशातील प्रत्येक नागरिकाने आत्मीयतेने म्हटली पाहिजे व देशाबद्दल असलेले प्रेम जपले पाहिजे. गांभीर्यपूर्ण शपथ, वचन किंवा दृढ निश्चय आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेमधून दिसून येतो. आपल्या देशासाठी चांगले काम करण्याचा संकल्प आणि देशभक्तीची भावना सुदृढ व्हावी, यासाठी घेतलेला आधार म्हणजे आपली राष्ट्रीय प्रतिज्ञा .विवेकवादी, समतावादी, एकात्म समाज घडविण्याचा संकल्प प्रतिज्ञे मध्ये दर्शवितात.

आपण सर्वजण शाळेत मोठ्या,मोठ्या आवाजात प्रतिज्ञा म्हणायचो आणि आजही अभिमानाने म्हणत आहोत 'भारत माझा देश आहे' ही आपली ''राष्ट्रीय प्रतिज्ञा" शालेय पाठ्यपुस्तकात पहिल्या पानावरच नमूद असलेली प्रतिज्ञा ज्यांच्या लेखणीतून साकार झाली ते आंध्र प्रदेश मधील सुप्रसिद्ध तेलगू साहित्यिक म्हणजे पेदेमरी व्यंकट सुब्बाराव.... 

खरंतर आजही अनेकांना माहिती नसेल की, आपली राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली. खरतर लेखक नरेंद्र लांजेवार यांच्या लेखणी मधून आपल्या सर्वांना राष्ट्रीय प्रतिज्ञेचे लेखक कोण आहेत हे समजले आहेत. महत्त्वाचे संशोधन 'वयम्' मासिकासाठी खास लिहून राष्ट्रीय प्रतिज्ञेच्या मूळ लेखकाची ओळख प्रथम लेखक नरेंद्र लांजेवार यांनी लेख लिहून आपली प्रतिज्ञा कोणी लिहिली? याचा उलगडा सविस्तर लेख मधून केलेला आहे आणि या लेखचा परिपूर्ण फायदा आणि सविस्तर महत्वाची माहिती नागरिकांना आज मिळत आहे. प्रतिज्ञेची माहिती ज्यांनी शोधून काढली ते लेखक नरेंद्र लांजेवार यांचं २०२२ मध्ये वयाच्या ५३ व्या वर्षी दुर्दैवी निधन झालं आहे. त्यावेळी नरेंद्र लांजेवार यांनी प्रतिज्ञेवर लिहिलेला लेख शाळाशाळांमध्ये वाचला गेला व फलकावर लावला गेला होता. २६ जानेवारी २०१२ मध्ये पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या मित्रपरिवाराने प्रतिज्ञेचा सुवर्ण महोत्सव साजरा केला होता तो आजचा दिवस सर्वांसाठी महत्त्वाचा दिवस ठरला आहे. याच दिवसा मुळे इतिहासाचे पाने पुन्हा रंगून गेली आहेत आणि इतिहासात ज्यांचं नाव प्रतिज्ञे सोबत जोडले आहे ते म्हणजे पेदेमरी व्यंकट सुब्बाराव

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू करण्यात आले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस भारतीय 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी १९६५ पासून ही प्रतिज्ञा संपूर्ण देशात लागू करण्यात आली. म्हणजेच राष्ट्रीय प्रतिज्ञेचा ६४ वा वर्धापन दिन असे दोन्ही दिवस आज महत्त्वाचे ठरत आहेत.

"भारत माझा देश आहे" या वाक्यात देशा बद्दलची आत्मियता दिसून येते. "सारे भारतीय माझे बांधव आहेत" हे वाक्य भारतीय संविधानाची आठवण करून देत आहे. "माझ्या देशावर माझे प्रेम आहे" या वाक्यातून देशातील प्रत्येक नागरिकांने आपल्या देशाबद्दलचा आदर प्रेम राखून ठेवणे दिसून येते. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान आहे. जो भारत देश 
विविधतेने नटलेला आहे . ती भारताची सुंदरता आम्हाला सर्वांना सांभाळून ठेवायची आहे असे या ओळीतून म्हटले आहे. अशा अनेक बाबींचा उलगडा प्रतिज्ञेमधून दिसून येतो आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे.

आंध्रप्रदेशच्या नालगोंडा जिल्ह्यातील अन्नेपर्थी या गावच्या पेदेमरी व्यंकट सुब्बारावांचे संस्कृत, तेलगू, इंग्रजी आणि अरेबिक भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण झाले होते. शिक्षणाची आवड त्यांना होती. तर लिखाणाची आवड त्यांनी शेवट पर्यंत जिवंत ठेवली. विशाखापट्टणम् जिल्ह्याचे अनेक वर्षं ते जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून सरकारी नोकरीत होते. आपली नोकरी सांभाळून ते लिखाण करत होते. त्यांची ' कालाभरवाहू ' नावाची तेलगू कादंबरी विशेष गाजली. आणि ती कादंबरी लोकप्रिय आहे.पेदेमरी व्यंकट सुब्बाराव हे मुळात राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेले, स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतलेले कवी म्हणून ओळख त्यांची आहे. आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणावी म्हणून एक प्रतिज्ञा १९६२ मध्ये लिहिली. त्यांच्या एका शिक्षण खात्यातील मित्राला ही कल्पना खूपच आवडली.सुब्बाराव यांचे मित्र तेन्नेटी विश्वनाथम यांनी ही प्रतिज्ञा आंध्रप्रदेशचे तत्कालीन शिक्षणमंत्री पी.व्ही.जी. राजू यांच्याकडे ही प्रतिज्ञा पाठवली. शिक्षणमंत्र्यांनी ही प्रतिज्ञा शाळांमध्ये घेण्याचा आदेश दिला. ‘डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया’ या समितीची स्थापना केलेली असते. या समितीचे अध्यक्ष केंद्रीय शिक्षणमंत्री असतात. या ‘डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इंडिया’ची एकतिसावी मिटिंग तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री एम. सी. छागला यांच्या अध्यक्षतेखाली ११ आणि १२ ऑक्टोबर १९६४ मध्ये बंगळुरू येथे झाली होती. या मिटिंगच्या वृत्तान्तामध्ये-
'शिक्षणाचा भारतातील विकास : स्वातंत्र्यपूर्व आणि पश्चात शैक्षणिक दस्तऐवजांचा ऐतिहासिक सर्वेक्षण' या पुस्तकाच्या पान १४० वर मुद्दा क्रमांक १८ मध्ये उल्लेख आढळतो की, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना सदोदित राहण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये, तसेच राष्ट्रीय दिवसांच्या शुभपर्वावर विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिज्ञा असावी.याकरिता पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली "इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियंस आर माय ब्रदर ॲन्ड सिस्टर’ ही प्रतिज्ञा देशपातळीवर स्वीकारण्याची शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ही प्रतिज्ञा १९६३ मध्ये विशाखापट्टणममधील एका शाळेत प्रथम वाचून दाखवण्यात आली असून मोठा इतिहास रचला गेला.
त्या नंतर त्याच वर्षी इतर अनेक शाळांमध्येही ते वाचून दाखवण्यात आली. म्हणजेच हळूहळू ही प्रतिज्ञा सर्वांची ओळख होऊ लागली. त्यानंतर प्रतिज्ञेचा देशपातळीवरील विविध प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले. 
१९६४ मध्ये बंगळुरू येथे झालेल्या केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाच्या बैठकीत, त्यांच्या अध्यक्ष एमसी छागला यांच्या अध्यक्षतेखाली, शाळांमध्ये ही प्रतिज्ञापत्रे वाचून दाखवण्यात यावीत आणि ही पद्धत २६ जानेवारी १९६५ पर्यंत सुरू करावी असे निर्देश देण्यात आले. १९६५ पासून देशातील सर्वच राज्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तिचा समावेश करण्यात आला. या प्रतिज्ञेला फक्त पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा दर्जा न देता, तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देशपातळीवर देण्यात आला.आज ही प्रतिज्ञा देशाचा अभिमान म्हणून सर्वांच्या मनावर राज्य करत आहे.

२६ जानेवारी २०१२ मध्ये आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदाने सुब्बारावांच्या मित्र परिवाराने प्रतिज्ञेचा सुवर्ण महोत्सव साजरा केला होता. म्हणजेच प्रतिज्ञे बद्दलचा आदर आणि सन्मान व्हावा म्हणून पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या मित्र परिवाराने सामाजिक बांधिलकी आणि प्रतिज्ञेबाबत आपली जबाबदारी पार पाडली आहे असे दिसून येत असून, देशातील प्रत्येक नागरिकांने राष्ट्राची एकदा अबाधित ठेवणे गरजेचे आहे. प्रतिज्ञेचा सुवर्ण महोत्सव साजरा झाल्या बाबतची बातमी ' टाइम्स ऑफ इंडिया' आणि दैनिक' हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्रांत त्याविषयीची बातमी प्रकाशित झाली. या बातमीमुळेच आजच्या पिढीतील अनेकांना आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा खरे लेखक पेदेमरी व्यंकट सुब्बाराव आहेत याची ओळख झाली. जर प्रतिज्ञेचा सुवर्ण महोत्सव साजरा झालाच नसता त्याविषयी वर्तमानपत्रात बातमी छापून आलीच नसती , लेखक नरेंद्र लांजेवार यांनी संशोधन करून प्रतिज्ञे बद्दल लेख लिहलाच नसता तर आम्हाला आज पर्यंत राष्ट्रीय प्रतिज्ञेचा लेखक कोण? हे समजू शकले नसते. 

आपले राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आणि राष्ट्रगान बंकिमचंद्र चटर्जी यांच्या नावे ओळखले जाते. तशीच ही राष्ट्रीय प्रतिज्ञाही पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या नावाने ओळखली जात आहे. पाठ्यपुस्तकात पहिल्या पानावर असलेली ही राष्ट्रीय प्रतिज्ञा' देशा बद्दल आदर ,प्रेम, निर्माण करते. सर्वांमध्ये बंधू भावाची भावना निर्माण करते. भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारे मूल्ये हा आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञे मध्ये सापडतात. ज्या प्रमाणे कविता लिहिणाऱ्याच नाव असते, पाठ्यपुस्तकात ''धडा'' असतो त्याखाली लेखकाचे नाव असते त्याच प्रमाणे पुस्तकातील छापलेल्या प्रतिज्ञेखाली , ज्या लेखकाच्या लेखणीतून ही प्रतिज्ञा सारकारलेली आहे. त्याचं नाव आलेच पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांना न्याय मिळेल. आज प्रतिज्ञेला ६४ वर्षं होऊन गेली आहेत. १३ ऑगस्ट १९८८ रोजी त्यांचे निधन झाले. निधनानंतरही, या राष्ट्रीय प्रतिज्ञेच्या माध्यमातून आजही प्रत्येक भारतीय नारीच्या ,विद्यार्थ्याच्या मनात लेखक पेदेमरी व्यंकट सुब्बाराव प्रतिज्ञेच्या रूपात जिवंत आहेत .या प्रतिज्ञेचे पालन करून आदराने सन्मान करू या.

'मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय'


लेखक - मिलिंद सुरेश जाधव 
रा. पडघा, भिवंडी 
मो.८६५५५६९४३६

Saturday, 24 January 2026

यु. ई. एस. कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये उडान महोत्सव उत्साहात साजरा !!

यु. ई. एस. कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये उडान महोत्सव उत्साहात साजरा !!

उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) : शुक्रवार दिनांक २३-०१-२०२६ रोजी यु. ई. एस. कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी आणि कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय, उरण यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केला जाणारा उडान महोत्सव यु. ई. एस. महाविद्यालयात जल्लोषात साजरा झाला.

ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभागाचे संचालक डॉ. बळीराम एन. गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी यु. ई. एस. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर, उपाध्यक्ष  मिलिंद पाडगांवकर, सदस्य व माजी अध्यक्ष आर्किटेक्ट तनसुख जैन, कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाचे सी.ई.ओ प्रदीप श्रृंगारपुरे  व प्राचार्य डॉ. वाल्मिक गर्जे, यु. ई. एस. कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. मिनाक्षी गुप्ता, सिनिअर कॉलेजच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख मनाली तांबडकर आणि वाणिज्य विभागाच्या प्रमुख  वर्षा वीर, डीएलएलईचे समन्वयक प्रा.विनोद इंदुलकर  (के. डी. एस. कॉलेज), हेमांगी म्हात्रे व अक्षय निवांगुणे (यु. ई. एस. कॉलेज) तसेच शिक्षकगण व शिक्षेकतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे डॉ. बळीराम एन. गायकवाड यांचे स्वागत यु. ई. एस. संस्थेचे अध्यक्ष  चंद्रकांत ठक्कर ह्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले तसेच उपस्थित सर्व  मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले.विदयार्थ्यांमधील विविध कलागुणांना व गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी उडाण महोत्सवाचे आयोजन विद्यापीठाच्या वतीने करण्यात येते. या महोत्सवात पोवाडा गायन, पथनाटय, पोस्टर मेकिंग, वक्तृत्व व क्रिएटिव्ह लेखन अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या महोत्सवात नवी मुंबई, उरण, पनवेल, अलिबाग, पेण परिसरातील एकूण २१ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. त्यात एकूण ३८० स्पर्धक विद्यार्थी, ६० स्वयंसेवक व ४० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, असे एकूण ४८० जण कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
ह्या विविध स्पर्धांमध्ये यु. ई. एस. आणि के. डी. एस. कॉलेजच्या विदयार्थ्यांनीही सहभाग नोंदविला आणि पोवाडा गायन स्पर्धेंमध्ये यु. ई. एस. कॉलेजच्या विदयार्थ्यांना द्वित्तीय क्रमांक तसेच पथनाट्य  स्पर्धेंमध्ये के. डी. एस. कॉलेजच्या विदयार्थ्यांना तृतीय क्रमांक मिळाला. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचा तसेच विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आलं. यु. ई. एस. कॉलेज आणि कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय यांनी उडान सारख्या खूप मोठ्या महोत्सवाचे आयोजन यशस्वीरित्या केल्याबद्दल सर्व प्रमुख पाहुण्यांनी व उपस्थित सर्व कॉलेजमधील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी यु. ई. एस. आणि के. डी. एस. कॉलेजचे तोंड भरुन कौतुक केले. कार्यक्रमाची सागंता राष्ट्रगीताने झाली.

गुणवत्ता वाढीस चालना देणारा ‘भादाणे पॅटर्न’ – राज्यासाठी प्रेरणादायी उपक्रम !!

गुणवत्ता वाढीस चालना देणारा ‘भादाणे पॅटर्न’ – राज्यासाठी प्रेरणादायी उपक्रम !!

ठाणे, प्रतिनिधी :
राज्यात प्रथमच ठाणे जिल्ह्यातील भादाणे गावाने शिक्षण क्षेत्रात एक अभिनव आणि प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. भादाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १५ ऑगस्ट २०१५ रोजी तत्कालीन सरपंच तथा शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. श्री. संजय हांडोरे पाटील यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला.

या निर्णयानुसार स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा मान इयत्ता दहावी व बारावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या निवासी व अनिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या आई-वडिलांसह देण्यात येऊ लागला. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागली असून अभ्यासासाठी सकारात्मक स्पर्धा निर्माण झाली आहे.

या निर्णयाचे स्वागत संपूर्ण राज्यभरातून होत असून अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी हा ‘भादाणे पॅटर्न’ संपूर्ण राज्यात राबवावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच हा पॅटर्न राज्यात लागू करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांना सर्वसंमतीने ठराव पाठविण्यात आला आहे.

या उपक्रमामुळे गावातील ध्वजारोहणावरून होणारे राजकीय वाद थांबले असून गावात शैक्षणिक गुणवत्ता, एकोपा व सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. हा निर्णय शाळेच्या शिक्षण समिती व ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला होता. यावेळी तत्कालीन मुख्याध्यापक श्री. राजाराम कंटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या अगोदर एकवीस विद्यार्थ्यांना झेंडा फडकविण्याचा मान मिळाला आहे.
यावर्षी कुमारी संचिता राजेंद्र यशवंतराव या विद्यार्थिनीने बारावी सायन्स परीक्षेत ७७ टक्के गुण मिळवून भादाणे गावातून प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे भादाणे जिल्हा परिषद शाळेच्या प्रजासत्ताक दिनाचा यावर्षीचा ध्वजारोहणाचा मान तिला तिच्या आई-वडिलांसह देण्यात आला.

या अनोख्या व प्रेरणादायी उपक्रमाची दखल देशपातळीवर घेण्यात आली असून उत्तर प्रदेशचे शिक्षण मंत्री मा. श्री. आशिष पटेल यांनी ४ फेब्रुवारी २०२४ रोजी लखनौ येथे श्री. संजय हांडोरे पाटील यांना आमंत्रित करून या उपक्रमाचे विशेष कौतुक करत त्यांचा यथोचित सत्कार केला.

भादाणे पॅटर्न आज शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, प्रेरणा आणि सामाजिक सलोखा यांचे उत्तम उदाहरण ठरत असून तो संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहे. 🌱🇮🇳

उरण शिवजयंतीच्या अध्यक्षपदी अभिषेक भोईर व उपाध्यक्षपदी हर्षद शिंदे यांची निवड !

उरण शिवजयंतीच्या अध्यक्षपदी अभिषेक भोईर व उपाध्यक्षपदी हर्षद शिंदे यांची निवड !

 नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी घेतली माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट

उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) : उरण मध्ये शिवजयंतीच्या उत्सव साजरा करण्याबाबत शिवसेना शहर शाखेमध्ये नुकतीच बैठक बोलवण्यात आली होती, या बैठकीत २०२६ च्या शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे युवा कार्यकर्ते अभिषेक भोईर यांची व उपाध्यक्षपदी हर्षद शिंदे यांची  बिनविरोध निवड करण्यात आली, ही निवड होताच नवनिर्वाचित अध्यक्ष  अभिषेक भोईर व उपाध्यक्ष  हर्षद शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट घेतली, यावेळी त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्य कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

 सदर वेळी उपजिल्हाप्रमुख नरेश राहळकर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, माजी उपनगराध्यक्ष परमानंद करंगुटकर, माजी विभागप्रमुख सूर्यकांत दरणे, उरण शहरप्रमुख  विनोद म्हात्रे, उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, जेष्ठ कार्यकर्ते  रमाकांत म्हात्रे व पदाधिकारी उपस्थित होते.

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न !

माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न !

उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख माजी आमदार  मनोहरशेठ भोईर हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज नवीन शेवा येथे शिकणाऱ्या १० वी (S S C) व १२ वी (H S C) आर्टस् व सायन्स च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संस्थेचे संस्थापक  माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या वेळी विध्यार्थ्याचा मार्गदर्शन करताना माजी आमदार  मनोहरशेठ भोईर म्हणाले की, दहावी व बारावी ही आपल्या जीवनाची पहिली व दुसरी पायरी आहे, येथे आपण यशस्वी झालात तर जीवनात पुढे जीवनात यशस्वी होत जाल म्हणुन थोडे दिवस टीव्ही, मोबाइल पासून दूर राहा व खुप अभ्यास करून गुणवंत होऊन आपले, गुरुजनांचे, आईवडिलांचे व आपल्या शाळेचे नाव मोठे करा आशा शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले उरण तालुका संघटक बी एन डाकी, संस्थेचे चे उपाध्यक्ष व उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, नवीन शेवा सरपंच सोनल निलेश घरत, केंद्रप्रमुख म्हात्रे सर, गावंड सर, अमृत ठाकूर, मुख्याध्यापक संतोष म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले तर विद्यार्थी यांनी आपले निरोपाचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत म्हात्रे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजन, श्री सरस्वती पूजन व स्वागत गीतांनी करण्यात आली, तसेच विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे शैक्षणिक भेट देण्यात आली.

सदर कार्यक्रमास नवीन शेवा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष व उपतालुकाप्रमुख  कमलाकर पाटील, शाखाप्रमुख  शैलेश भोईर, पोलीस पाटील मनोहर सुतार, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वीर वाजेकर महाविद्यालयात मतदार जागृती !

वीर वाजेकर महाविद्यालयात मतदार जागृती !

उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) : राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारी २०२६ च्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कॉलेज, फुंडे येथे मतदार जागृती  भित्तीपत्रक चे उद्घाटन उपजिल्हाधिकारी तथा मतदान अधिकारी आवीष कुमार सोनोने  ह्यांच्या हस्ते करण्यात आले. सदर भित्तिपत्रके इलेक्ट्रोल लिटरसी क्लब व राज्यशास्त्र विभागा च्या विद्यार्थ्यांनी तयार केले होते.याप्रसंगी मुलांचे तहसीलदार उद्धव कदम  यांनी मतदानाची शपथ वाचून नव मतदार विद्यार्थ्यांनाही शपथ घ्यायला लावली. तसेच उप जिल्हाधिकारी सोनोने  यांनी उपस्थित नव मतदार विद्यार्थी यांना मतदानाचा हक्क सर्वांनी बजावा यासाठी समाजात जागरूकता निर्माण करणे साठी आवाहन केले तसेच वीर वाजेकर महाविद्यालय नेहमीच शासकीय उपक्रमांना आणि मतदार जागृती कार्याला प्राधान्याने सहकार्य करते त्याबद्दल महाविद्यालयाचेही आभार मानले.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. २५ जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या १६ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ही रॅली आयोजित करण्यात आली होती.

 "My India My Vote" या थीमसोबत "भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे" हा विषय ठेवण्यात आला होता.या रॅलीत उपजिल्हाधिकारी तथा मतदान अधिकारी आविष कुमार सोनोने , तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. उद्धव कदम, नायब तहसीलदार  प्रभाकर नवाळे यांच्यासह कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर, प्रा. राम गोसावी, डॉ. राजकुमार कांबळे, डॉ संदीप घोडके, उपप्राचार्य गजानन चव्हाण, डॉक्टर चिंतामण दिंधळे, प्रा. श्रीकांत गोतपागर, डॉ. सुजाता पाटील प्रा. भूषण ठाकूर प्रा प्रांजल भोईरयांनी सहभाग घेतला.या उपक्रमाद्वारे विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये मतदानाचे महत्त्व जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एनएसएस ,एनसीसी व डी एल एल ई च्या  २१० विद्यार्थ्यांनी  रॅलीत सक्रिय सहभाग घेतला. सदरच्या रॅलीत  विद्यार्थी सहभागी झाले मतदार जागृतीचा संदेश प्रसारित केला. राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने अशा जागृती उपक्रमांद्वारे लोकशाहीतील सहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले

नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधिताचे आमरण उपोषण स्थगित !!

नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधिताचे आमरण उपोषण स्थगित !!

उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) : नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधिताचे गेली चार दिवस सुरु असलेले आमरण उपोषण सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक  गोयल यांच्या दालनात सकारात्मक चर्चेनंतर स्थगित करण्यात आले आहे. 

अनेक मागण्या मान्य करण्यात आले असून त्यात घरभाडे भत्ता व प्रोत्साहन भत्ता देण्याचे सिडकोने मान्य केले आहे  मात्र त्यासाठी गावातील घरांच्या तोडक कामाची तारीख निश्चित करावी लागेल. शुन्य पात्रता अथवा नाकारलेली घरे यांचे सबळ पुरावे सादर करणे आवश्यक आहे. प्रकल्प बाधितांच्या मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी निधीची तरतूद केली आहे, प्रशिक्षणासाठी विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांच्या मुलांनी आपली नाव नोंदणी करुन प्रशिक्षण घ्यावे, सिडकोने ही व्यवस्था केली आहे.आमरण उपोषणाच्या या मागण्या मान्य केल्याने हे आंदोलन तुर्त स्थगिती करण्यात आले आहे. प्रकल्प बाधितांच्या वतीने चर्चेत उपोषणकर्ते किरण केणी व प्रविण मुठ्ठेनवार सह नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीचे अध्यक्ष अनिल पाटील, कमिटी सदस्या चांगुणा ताई डाकी, कुंदा ताई भोपी, किसान सभा अध्यक्ष कॉ. रामचंद्र म्हात्रे व सेक्रेटरी कॉ.संजय ठाकूर व नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विभागातील अधिकारी उपस्थित होते

चॅलर्स ब्रिगेड,आव्हान २०२५-२६, राज्य स्तरीय अंतरविद्यापीठ आपत्ती पूर्व तयारी प्रशिक्षण शिबिरात रायगड जिल्हा राष्ट्रीय सेवा योजनेच्या संघाचा यशस्वी सहभाग " !!

*" राजभवन आयोजित ;  **चॅलर्स ब्रिगेड,आव्हान २०२५-२६, राज्य स्तरीय अंतरविद्यापीठ आपत्ती पूर्व तयारी प्रशिक्षण शिबिरात रायगड जिल्हा राष्ट...