Saturday, 17 October 2026

कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांची मागणी !!

कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांची मागणी !!

*कल्याण (संजय कांबळे) :* हातातोंडाशी आलेले भात पीक डोळ्यादेखत करपत असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. त्यामुळे कल्याण तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ मिरकुटे यांनी केली आहे.

गोवेली येथे आज आयोजित शेतकरी बैठकीत ते बोलत होते. या मागणीचे निवेदन लवकरच तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील अनेक भागांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असताना कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. हा प्रश्न शासनासमोर गांभीर्याने मांडण्याची गरज असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

*बैठकीतील प्रमुख मागण्या :*

- कल्याण तालुक्याचा दुष्काळग्रस्त भागात समावेश करावा
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्यावी
- पंचनाम्याची वाट न पाहता तातडीने मदत खात्यावर जमा करावी
- खरीप पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत
- रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत द्यावीत
- शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत दिलासा द्यावा
- जनावरांसाठी चारा, पशुखाद्य व पाण्याची व्यवस्था करावी
- सन २०२५-२६ चा धान बोनस तातडीने जाहीर करावा

दसरा-दिवाळी सण तोंडावर असताना शेतकरी आर्थिक संकटात असल्याने तातडीने मदत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी कुंडलिक रामा गायकर, गोपाल गायकर, शिवाजी रोहणे, हरिभाऊ शेलार, बुधाजी बुटेरे, दत्तू काथोडे रोहणे, गुरुनाथ रोहणे, जयराम बुटेरे, प्रभाकर मिरकुटे, तुकाराम बुटेरे, भालचंद्र मिरकुटे आदी शेतकरी उपस्थित होते.

*राज्यस्तरीय पोषण रसोई स्पर्धेत घाटकोपरच्या दीपाली तांबे, प्रतिभा भालेराव यांना प्रथम क्रमांक !!

*राज्यस्तरीय पोषण रसोई स्पर्धेत घाटकोपरच्या दीपाली तांबे, प्रतिभा भालेराव यांना प्रथम क्रमांक !!

प्रतिनिधी - निलेश कोकमकर 

      मुंबई : ‘सर्वांसाठी अन्न आणि पोषण’ या संकल्पनेतून पोषण माह २०२६ निमित्त के कॉर्प चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय पोषण रसोई स्पर्धेत घाटकोपर येथील अंगणवाडी माता दीपाली संदीप तांबे आणि अंगणवाडी सेविका प्रतिभा राहुल भालेराव यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
                    या स्पर्धेत महाराष्ट्रातील पालघर, नंदुरबार, गडचिरोली, कर्जत आणि मुंबई या पाच प्रकल्प क्षेत्रांतील सुमारे ३५० सहभागी १७५ संघांच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या स्पर्धेचा मुख्य उद्देश अंगणवाडी केंद्रांमधून दिल्या जाणाऱ्या पूरक पोषण आहाराचा (टीएचआर) योग्य वापर करून स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यापासून कमी खर्चात पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ तयार करण्यास प्रोत्साहन देणे हा होता.घाटकोपरच्या दीपाली संदीप तांबे आणि प्रतिभा राहुल भालेराव यांनी टीएचआर खिचडी, टीएचआर पराठा, शेवग्याच्या पानांची चटणी, मिश्र भाज्यांचा चाट आणि टीएचआर लाडू यांचा समावेश असलेली पौष्टिक थाळी सादर केली. त्यांच्या अभिनव पाककृतीचे परीक्षकांनी कौतुक केले. या स्पर्धेत पालघरच्या यमुना सुरेश मिसाळ आणि प्रमिला सुभाष मिसाळ यांनी द्वितीय, तर गडचिरोलीच्या कविता रामू दुगा आणि पूजा रंजीत नारोटे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.स्पर्धेच्या पहिल्या फेरीत अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या आणि समुदायातील मातांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहभागी महिलांनी टीएचआरचा वापर करून लाडू, पराठा, रवा वडी, लापशी, खिचडी, सुकडी आणि हलवा यांसारखे विविध पौष्टिक पदार्थ तयार केले. 
                  पदार्थांचे पोषणमूल्य, स्वच्छता, खर्च, टीएचआरचा योग्य वापर, कुटुंबातील सदस्यांना पदार्थांची स्वीकारार्हता आणि सादरीकरण अशा विविध निकषांवर परीक्षण करण्यात आले.या स्पर्धेमुळे स्थानिक खाद्यपदार्थांचा वापर करून पूरक पोषण आहारातून विविध पौष्टिक पदार्थ तयार करण्याच्या क्षमतेला प्रोत्साहन मिळाले. तसेच अंगणवाडी सेविका आणि समुदायातील मातांचा पोषणविषयक उपक्रमांमधील सहभाग वाढविण्यास मदत झाली.
                   या उपक्रमातून निवडक पाककृतींचे संकलन करून टीएचआर पाककृती पुस्तिका तयार करण्यात येणार आहे. ही पुस्तिका अंगणवाडी केंद्रांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून, तिच्या माध्यमातून कुटुंबांना या पाककृती घरच्या घरी तयार करता येतील. मातांचे पोषण, पूरक पोषण आहाराचा नियमित वापर आणि स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देणे या उद्दिष्टांसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आयसीडीएस) आणि आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रमुख पाहुणे आणि परीक्षक म्हणून सहभाग घेतला. गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, धानोरा येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी तसेच सायवन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती. या फेरीतील निवडक संघांना अंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळाली.
                        अंतिम फेरीच्या परीक्षक मंडळात ‘आयसीडीएस’ महाराष्ट्राच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, पोषणतज्ज्ञ व शैक्षणिक सल्लागार डॉ. अनुराधा मित्रा आणि ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेसचे कॉर्पोरेट शेफ राजेश शेट्टी यांचा समावेश होता.
                         या उपक्रमासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना, आरोग्य विभाग, कृषी विज्ञान केंद्रे, ग्रामपंचायती तसेच अरोहन, बायफ, बाल रक्षा भारत, सीएचआरआय, सीआरवाय, सीवायडीए आणि युनायटेड वे ऑफ मुंबई या संस्थांचे सहकार्य लाभल्याबद्दल आभार व्यक्त केले आणि स्पर्धेचा समारोह केला.

मुरबाड तालुक्यातील भोंडाई महोत्सव उत्साहात; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांची उपस्थिती !!

मुरबाड तालुक्यातील भोंडाई महोत्सव उत्साहात; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांची उपस्थिती !!

*कल्याण (संजय कांबळे) :* मुरबाड-शहापूर तालुक्याची सांस्कृतिक परंपरा जपणारा आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारा भव्य 'भोंडाई महोत्सव' मुरबाड येथील वैशाखरे (पारधवाडी) झाडघर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आयोजित या महोत्सवाला जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

भोंडाई हा आदिवासी समाजाचा पारंपरिक उत्सव असून निसर्ग, शेती आणि लोककलांचा अनोखा संगम आहे. कडक उन्हातही आदिवासी महिलांनी या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या महोत्सवात आदिवासी बांधवांचे पारंपरिक नृत्य, गीत व वाद्यांचे सादरीकरण, आदिवासी हस्तकला, खाद्यपदार्थ व कृषी प्रदर्शन, स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि आदिवासी संस्कृतीची माहिती देणारे स्टॉल्स ही वैशिष्ट्ये होती. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या आदिवासी बांधवांच्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले, "भोंडाई महोत्सव ही केवळ परंपरा नाही, तर आदिवासी समाजाची ओळख आहे. अशा महोत्सवांमुळे स्थानिक कला, संस्कृती आणि परंपरांना प्रोत्साहन मिळते. प्रशासन नेहमीच अशा उपक्रमांना पाठिंबा देईल."

आमदार किसन कथोरे यांनी आदिवासी बांधवांसाठी राबवलेल्या विविध योजना आणि विकासकामांची माहिती दिली.

यावेळी जि. प. माजी उपाध्यक्ष सुभाष पवार, ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन अरुण पाटील, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र घोडविंदे, तहसीलदार अभिजित देशमुख, कामगार उपायुक्त सौ. क्षीरसागर, गटविकास अधिकारी लता गायकवाड, डीवायएसपी अनिल लाड यांच्यासह पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, कलाकार आणि हजारो आदिवासी बंधू-भगिनी उपस्थित होते.

बाजीप्रभू चौकातील केडीएमटी बस थांब्याजवळ साफसफाई, डीडीटी पावडरची फवारणी; वाढीव शेडची मागणी !!

बाजीप्रभू चौकातील केडीएमटी बस थांब्याजवळ साफसफाई, डीडीटी पावडरची फवारणी; वाढीव शेडची मागणी !!

*डोंबिवली, राजू नलावडे :* बाजीप्रभू चौक येथील केडीएमटी निवासी बस थांब्याजवळील फ्रँकी आणि चायनीजच्या अनधिकृत टपऱ्यांवर केडीएमसी अतिक्रमण विभागाने कारवाई केल्यानंतर त्या ठिकाणी साफसफाई करून डीडीटी पावडर मारण्यात आली आहे.

यामुळे निवासी थांब्यावर रांगेत उभे राहणाऱ्या प्रवाशांना आता व्यवस्थित उभे राहता येणार आहे. स्वच्छतेमुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, याच ठिकाणी बस थांब्याला लागून वाढीव शेड उभारण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. वाढीव शेड उभारल्यास ऊन आणि पावसापासून प्रवाशांचे संरक्षण होईल.

Friday, 16 October 2026

राज्यातील सर्व शाळांमध्ये १८ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान विशेष स्वच्छता मोहीम !!

राज्यातील सर्व शाळांमध्ये १८ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान विशेष स्वच्छता मोहीम !!

*मुंबई :* राज्यातील सर्व शाळांमध्ये १८ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘चला शाळेत जाऊ या... विशेष शालेय स्वच्छता मोहीम’ राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केले आहे.

शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि स्थानिक समुदायाच्या सहभागातून शाळांची स्वच्छता, सुशोभीकरण आणि देखभाल करून शैक्षणिक वातावरण अधिक पोषक करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे.

शाळा परिसर स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि आनंददायी ठेवण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक जबाबदारी आणि शिस्तीची भावना रुजवणे, हा देखील हेतू आहे. समग्र शिक्षा योजनेंतर्गत शाळांमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा आणि अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नांना या मोहिमेमुळे चालना मिळणार आहे.

‘माझी शाळा - माझी जबाबदारी’ या भावनेतून या मोहिमेत शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी संघ, ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था तसेच उपलब्धतेनुसार सीएसआर आणि स्थानिक सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे. मोहिमेच्या शाळास्तरीय अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर राहणार आहे.

डोंबिवली स्टेशन परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईत कसूर; पथक प्रमुख कादर रेवडी निलंबित !

डोंबिवली स्टेशन परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईत कसूर; पथक प्रमुख कादर रेवडी निलंबित !

*डोंबिवली, विनोद गिरी :* दि. 16 ऑक्टोबर रोजी अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त व ग प्रभागाचे सहायक आयुक्त यांनी डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील 150 मीटर प्रतिबंधित ना फेरीवाला क्षेत्रात पूर्वसूचना न देता खासगी वाहनाने पाहणी केली. यावेळी मधुबन गल्ली परिसरात महापालिका कर्मचारी उपस्थित असतानाही मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले.

या पाहणी दरम्यान रेल्वे स्थानक परिसरातील नागरिक व प्रवाशांना ये-जा करण्यास अडचण निर्माण होत असल्याचे दिसून आले. याबाबत पथक प्रमुख कादर रेवडी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.

.       सामाजिक कार्यकर्ते मनोज गिरी यांनी केलेला पाठपुरावा 

ही बाब कर्तव्यपालनातील गंभीर कसूर, अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयश तसेच प्रशासकीय जबाबदारीच्या दृष्टीने गंभीर स्वरूपाची असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यपालनाची सखोल चौकशी आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 56 (1) (ब) नुसार कादर रेवडी (कामगार - पथक प्रमुख) यांना आदेशाच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत ते निलंबित राहतील. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय अनधिकृत बांधकाम कार्यालय (मुख्यालय) राहील व वरिष्ठांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, तसेच या काळात कुठेही खासगी नोकरी व धंदा करता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

बाजीप्रभू चौकातील टपऱ्या, फेरीवाले आणि पार्किंग कारवाईबाबत केडीएमसी व वाहतूक पोलिसांना निवेदन !

बाजीप्रभू चौकातील टपऱ्या, फेरीवाले आणि पार्किंग कारवाईबाबत केडीएमसी व वाहतूक पोलिसांना निवेदन !

*डोंबिवली, प्रतिनिधी :* बाजीप्रभू चौक येथील केडीएमटी बस स्थानकाजवळील अनधिकृत टपऱ्या, फेरीवाले आणि अवैध पार्किंगच्या संदर्भात एमआयडीसी निवासी संघटना आणि मिलापनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनने आज शुक्रवारी केडीएमसी आणि वाहतूक पोलिसांना निवेदन दिले.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर आणि शहर वाहतूक शाखा, डोंबिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय अहिरे यांची भेट घेऊन प्रवाशांच्या आणि नागरिकांच्या स्वाक्षरीसह निवेदन सादर केले.

काल गुरुवारी, १५ ऑक्टोबर रोजी सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी बाजीप्रभू चौकातील काही टपऱ्यांवर कारवाई केली होती. त्याबद्दल त्यांचे आभार मानून उर्वरित टपऱ्या आणि फेरीवाल्यांवरही लवकर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. त्यांनी उर्वरित अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

त्यानंतर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय अहिरे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. बाजीप्रभू चौकात अवैध वाहन पार्किंगमुळे केडीएमटी बसेस उभ्या करण्यास अडचण येते, प्रवाशांना त्रास होतो आणि वाहतूक कोंडी निर्माण होते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावर कडक कारवाई करू, असे आश्वासन पोलिसांनी दिले.

यावेळी राजू नलावडे, वर्षा महाडिक, किशोर सोहनी, अभय दिघे, नारायण गायकवाड, राजाराम सकपाळ आदी उपस्थित होते.

कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांची मागणी !!

कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांची मागणी !! *कल्याण (संजय कांबळे) :* हा...