Thursday, 30 November 2023

जिल्हा परिषद ठाणे आणि पंचायत समिती कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने कोलम येथे केंद्रीय राज्यमंत्री (वित्त) यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रा संपन्न !

जिल्हा परिषद ठाणे आणि पंचायत समिती कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने कोलम येथे केंद्रीय राज्यमंत्री (वित्त) यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रा संपन्न !

कल्याण, (संजय कांबळे) : विकसित भारत अभियान अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे आणि पंचायत समिती कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील कोलम येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभागी लाभार्थी बरोबर संवाद साधला  यानंतर केंद्रीय राज्य मंत्री (वित्त) भागवत कराड यांनी उपस्थित लाभार्थी व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर मुरबाडचे आमदार किसन कथोरे, उप जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा जायभाय,  छायादेवी शिसोदिया, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कल्याण प्रांताधिकारी विस्वास गुजर, रामदास दोंड, दिपक कुटे कोलमचे सरपंच राजेश भोईर, ठाणे जिल्हा ग्रामीण भाजपा अध्यक्ष मधुकर मोहपे आदी मान्यवर उपस्थित होते.

दिप प्रज्वलनानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छायादेवी शिसोदिया यांनी केले, त्या म्हणाल्या विकसित भारत संकल्प यात्रा याची सुरुवात तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायत मधून झाली आहे. या यात्रेत ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही, त्यांच्या पर्यंत पोहचणे,विविध शासकीय योजनाचा प्रचार, प्रसार करणे, असा उद्देश असून तालुक्यातील ४६ ग्रामपंचायत मध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये बचत गटांचे उत्पन्न १ लाखापर्यंत नेण्याचा निश्चय असल्याचे त्यांनी सांगितले. 

केंद्रीय राजमंत्री (वित्त) यांनी सांगितले की, हा विकसित रथ देशभर फिरणार आहे, महाराष्ट्रात ४० हजार खेडी, तर देशभर २ लाख ७० हजार खेड्यात पोहचणार आहे. या माध्यमातून देशाला विश्वगुरु बनवायचे आहे. असे त्यांनी सांगितले, यावेळी श्री कराड यांच्या हस्ते कल्याण तालुक्यातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व विविध योजनांचे कार्ड वाटप करण्यात आले.
 
तर आमदार किसन कथोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुळे देश प्रगती करतो आहे, अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे, माझा मतदार संघ हा सागरी, नागरी व डोंगरी आहे, त्यामुळे अनेक रस्ते अद्यापही अपुर्ण आहेत, त्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून निधी मिळाला तर हा प्रश्न मार्गी लागेल, तसेच पंतप्रधान आवास योजनेचा निधी वाढवावा आणि महिलांनाही मानधन द्यावे अशी मागणी त्यांनी मंत्री भागवत कराड यांच्या कडे केली. शिवाय अचानक कल्याण तालुक्यातील कोलम या गावाला हा कार्यक्रम देऊन देखील जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाने चांगले नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कल्याण तहसीलदार जयराज देशमुख, डॉ गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी ठाणे, गटविकास अधिकारी अशोक भवारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भारत मासाळ बालविकास विभागाच्या अर्चना पवार, बांधकाम चे श्री महाडिक, पाणी पुरवठा चे आशिष कटारे, गोवेली ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ माधवी पंदारे. जीवनदिप विद्यालयाचे रवींद्र घोंडविंदे, विस्तार अधिकारी विक्रम चव्हाण, श्री हरड, कृषी अधिकारी बी बी शिंदे, श्री संत, दिनेश घोलप, अनिस तडवी, सर्व ग्रामसेवक, कर्मचारी, बचत गटाच्या महिला, शालेय विद्यार्थी व लाभार्थी उपस्थित होते.

नालासोपारातील नैसर्गिक नाले बुजवणाऱ्या भुमाफीया विरोधात शिवसेना (शिंदे गट) आक्रमक...

नालासोपारातील नैसर्गिक नाले बुजवणाऱ्या भुमाफीया विरोधात शिवसेना (शिंदे गट) आक्रमक...

*मनपा नगर रचना अधिकारयांची पाहणी योग्य ती कार्यवाही न झाल्यास शिवसेना (शिंदे गट)  महापालिकेची मॅरोथॉन स्पर्धा अडवणार..*

नालासोपारा , प्रतिनिधी : समेळपाडा येथिल नाले रूंदी करणाच्या नावाखाली बेकायदा  मनपाची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे सदर नैसर्गिक नाला आरसीसी पाइप टाकून बंदिस्त करत असल्याची गंभीरबाब समोर आली आहे.

चक्क नैसर्गिक नालेच आरसी सी पाईप टाकुन  बुजविले जात असून पुन्हा  पावसाळ्यात समेळगाव सहित साई नगर स्टेशन परिसर पाण्याखाली येणार असून शहरातील नागरिकांच्या असंख्य तक्रारी असताना देखील वसई -विरार महापालिका प्रभाग समिती ई मात्र अद्याप झोपेचे सोंग घेतले आहे. नैसर्गिक नाले दिवसाढवळ्या असे  बुजविणाऱ्यांवर प्रशासनाकडून कडक कारवाई व्हायला हवी, अशी मागणी शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी  महापालिका सहाय्यक आयुक्तांकडे केली होती. 

या गंभीर बाबीचा सर्वाधिक फटका समेळगाव, साई नगर स्टेशन परिसरवासियांना येत्या पावसाळयात अनुभवायला मिळणार. पाहणी दरम्यान अभियंते यांनी आपले हात चक्क वर करून वरीष्ठांना विचारल्याशिवाय काहीही कारवाई करू शकत नाही असा पावित्रा घेतला आहे.

नालासोपारातील नैसर्गिक नाले बुजवुन त्याजागी आरसीसी पाइप टाकून प्रवाहित असलेला नैसर्गिक नाला बंदिस्त करण्याचे काम विनापरवानगी सुरू असल्याचे पाहणी दरम्यान  निदर्शनास आले. यावेळी शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वतिने काम थांबवुन अहवाल सादर करण्याची मागणी केली.
 

वेळीच योग्य ती कार्यवाही न झाल्यास येणाऱ्या महापालिकेचा मॅरोथॉन स्पर्धा शिवसेना (शिंदे गट) अडवणार असल्याचा इशारा शिवसेना (शिंदे गट) च्या वतिने देण्यात आला. यावेळी शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक, उपशहरप्रमुख महेश निकम स्थानिक नागरीक व महापालिकेचे अधिकारी, बांधकाम व्यवसायिक उपस्थित होते.

Wednesday, 29 November 2023

आयटकची महा संघर्ष यात्रा नववा दिवस...

आयटकची महा संघर्ष यात्रा नववा दिवस...

*देशात शेतकरी कामगाराचे हितसंबंध धोक्यात..कॉ. शाम काळे"

जळगाव, प्रतिनिधी... देशात मोदी सरकारच्या दहा वर्षाचा कारकीर्दीत त्यांची कथनी आणि व्यवहार पाहता.. देशातील कष्टकरी, श्रमिक, शेतकरी, कामगार यांचे हितसंबंध धोक्यात आलेले आहेत. महागाईला ते निवडणूक प्रचारात डायन म्हणत होते, आता ही डायन ..त्यांच्या कारकिर्दीत भरमसाठ पोसली गेली आहे या सरकारने. कामगार वर्गाने लढवून मिळवलेले जुने कामगार कायदे बदलून नवीन कामगार संहिता आणल्या. या देशातील कार्पोरेट घराण्यांना फायदा पोहोचवणार आहेत तसेच देशात 80  टक्के लोकांना मोफत धान्य द्यावे लागते, याचा अर्थ 80 टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली ढकलले गेले आहेत. असा होतो असे प्रतिपादन "महाराष्ट्र आयटकचे सचिव कॉम्रेड श्याम काळे" यांनी केले ते काल रोजी कोल्हापूर ते नागपूर अशा महा संघर्ष यात्रा निमित्ताने जळगाव येथे शिवतीर्थ मैदानावर जिल्हा आयटक तर्फे आयोजित सभेत बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी कॉ. विरेंद्र पाटील होते. 
या जनजागरण सभेत प्रास्ताविक करताना आयटक चे राज्य उपाध्यक्ष कॉ अमृत महाजन यांनी सांगितले की, सदर यात्रा दिनांक 18 डिसेंबर रोजी नागपूर येथे विधानसभेवर महापडाव आंदोलनाने समाप्त होणार आहे त्यात हजारो कामगार महिला सहभागी होणार आहेत जळगाव जिल्ह्यातूनही  1000 अंगणवाडी आयटक आशा ग्रामपंचायत कर्मचारी रोजगार सेवक पर्जन्य मापी सहभागी होणार आहेत. त्यासाठी 17 डिसेंबर 2023 रोजी भुसावळ येथून संध्याकाळी निघतील 
तसेच येत्या 4 डिसेंबर रोजी पासून महाराष्ट्रतील अंगणवाडी कर्मचारी यांच्या संपाचा एल्गार पुकारण्यात आला असून त्यात जळगाव जिल्ह्यातील सात हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. अशी माहिती दिली

*2024 भाजप हटाव देश बचाओ..कॉ. राजू देसले..*

या सभेचा समारोप करताना भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे राज्य सहसचिव कॉ राजू देसले यांनी सांगितले की, कामगार वर्गाने  मोदी सरकारकडून त्यांच्या हक्कावर होणारे हल्ले महागाई, बेरोजगारीमुळे शेती मोलाला भाव नसल्यामुळे कामगार शेतकरी यांची होणारी परवड पाहता येत्या 2024 साली मोदी सरकारला सत्तेवरून काढून टाकले पाहिजे व इंडिया आघाडीच्या पाठीमागे शक्ती उभी केली पाहिजे.असे आवाहन त्यांनी केले

काल दुपारी 4 वाजता ही संघर्ष यात्रेने औरंगाबाद जिल्ह्याकडे प्रस्थान केले.. . काल महाराष्ट्रभर फिरणाऱ्या संघर्ष यात्रेचा जळगाव जिल्ह्यात नववा दिवस होता. या सभेआधी महाराष्ट्र शाहीर धम्मा खडसे व सदाशिव निकम यांनी क्रांती गीते म्हटली.

या सभेसाठी.. ,किशोर कंडारे शंकर दरी, छगन साळुंखे, पिंटू साळुंखे, रंजना मराठे, लता पाटील, सुलोचना साबळे, मालू नरवाडे, नलिनी भंगाळे, प्रेमलता पाटील, अरुणा पवार, श्रावणजी रल, प्रकाश कंडारे, जयसिंह वाघ, राजेंद्र खरे, सुभाष बाविस्कर, गोकुळ कोळी, कैलास भील, संजना गोडघाटे, मधुकर मोरे, आरिफ मिस्तरी, विजय कोळी, अरुणा सपकाळे आदी सभासद व मान्यवर पदाधिकारी, अंगणवाडी, आशा, ग्रामपंचायत शेतमजूर, पर्जन्यमापक, वीज वर्कर्स फेडरेशन संरक्षण आणि आरोग्य खाते कंत्राटी कर्मचारी यादी संघटना मधून उपस्थित होते.. या संघर्ष यात्रेला चोपडा व जळगाव येथे चांगला प्रतिसाद भेटला.

सह्याद्री कुणबी संघ, पुणे शहर ( महाराष्ट्र प्रांत ) तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन !

सह्याद्री कुणबी संघ, पुणे शहर ( महाराष्ट्र प्रांत ) तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन !

मुंबई - ( दिपक कारकर ) 

सामाजिक बांधिलकी व सदैव नाविन्यपूर्ण उपक्रम राबवुन समाजात आगळीक ओळख निर्माण करत, अनेक पुरस्कारांनी सन्मानित असणाऱ्या उपरोक्त संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी सामाजिक बांधिलकीची वात्सल्यता जपत दिव्य प्रगल्भता जपण्याची भावना मनी रुजवत, समाजाची जाणीव ओळखून आपलं नेतृत्व दान करणारा उपक्रम म्हणजे "रक्तदान" होय. "करुनी दान रक्ताचे...ऋण फेडू समाजाचे" ह्या पंक्तीप्रमाणे भव्य रक्तदान शिबीर याग - २०२३, रविवार दि.०३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक १० ते दुपारी ०३.वाजेपर्यंत सह्याद्री कुणबी संघ, पुणे, बहुउद्देशीय हॉल, शास्त्रीनगर, विसावा स्मशान भूमी जवळ, कोथरूड, पुणे - ४११०३८ येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व रक्तदात्यांनी या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे. असे आवाहन सहयाद्री कुणबी संघाच्या वतीने करण्यात आले आहे. ह्या उपक्रमाला ओम ब्लड बँक, पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. अधिक माहितीसाठी राज भागणे - ८९८३४७५९८९ यांच्याशी संपर्क साधावा. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व विभागीय शाखेचे कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य व महिला आघाडी परिश्रम घेत आहेत.

2024 ला भाजपा सरकार सत्तेवरून घालवा कॉम्रेड राजू देसले यांचे.. जनजागरण सभेत आवाहन !!

2024 ला भाजपा सरकार सत्तेवरून घालवा कॉम्रेड राजू देसले यांचे.. जनजागरण सभेत आवाहन !!
 

चोपडा, प्रतिनिधी..
सध्याचे केंद्र सरकार कामगार विरोधी चार नवीन कामगार संहिता लादत आहेत. कामगारांचा त्याला विरोध आहे या संहिता अदानी आणि अंबानी या दोन प्रमुख उद्योगपतींना समोर ठेवून तयार करण्यात आलेले आहेत. या कामगार संहिता नोकरीची शाश्वती, पेन्शन आदी मूलभूत विचारांना थारा नाही.. कामगार संघटना आणि संघर्षाला मर्यादा आणणारे आहेत, भाजप सरकार काळात महागाई बेरोजगारी महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. 

शेतीमालाला रास्त भाव दहा वर्षात दिले नाहीत पुढे मिळतील अशी शक्यताही नाही. म्हणून येत्या 2024 आली भाजपा सरकार निवडून देऊ नका, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉ. प्रा.राजू देसले यांनी चोपडा येथे आयटकच्या वतीने घेतलेल्या प्रचंड कामगार सभेत बोलताना केले, या सभेच्या अध्यक्षस्थानी आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड अमृत महाजन होते. त्यांनी "कोरोना कालावधीमध्ये जनता भीती व आरोग्य संकटात सापडली असता फक्त अंगणवाडी, ग्रामपंचायत, आशा, आरोग्य कर्मचारीच त्यांचा जीव धोक्यात घालून मदत करत होते आणि याच कर्मचाऱ्यांना सरकार योग्य वेतन, पेन्शन पासून वंचित ठेवत आहे, असा आरोप आपल्या घणाघाती प्रास्ताविक भाषणात केला.

*18 डिसेंबर रोजी नागपूर विधानसभेवर कामगारांच्या जनजागरण यात्रेची धडक .. सहभागी व्हा ..कॉ. काळे*

महाराष्ट्र आयटकचे अध्यक्ष, सचिव कॉम्रेड श्याम काळे यांनी या सभेचा समारोप करताना सांगितले की, गेल्या दहा वर्षापासून सत्तेवर असलेल्या मोदी सरकारने आपले अपयश जागण्यासाठी धार्मिक अजेंडा पुढे करून हिंदू धर्म संकटात आहे. अशी आवई उठवणे चालू केले आहे. खरे म्हणजे धर्म संकटात नव्हता व नाही पण त्यांची सत्ता धोक्यात आलेली आहे. म्हणून महाराष्ट्र आयटकने कामगार, कष्टकरी, शेतकरी, महिला वर्ग यांना जागृत करण्यासाठी कोल्हापूर ते नागपूर .. जनजागरण यात्रा काढली आहे. अशी माहिती देऊन केंद्र व राज्य सरकार यांनी कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावा म्हणून नागपूर येथे 18 डिसेंबर रोजी या यात्रेच्या समारोप महामोर्चा आंदोलन ने होणार आहे, तरी त्यात मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन केले..  कोल्हापूर पासून सुरु झालेली या जनजागरण यात्रेचे नव्या दिवशी जळगाव जिल्ह्यात आगमन झाले, त्यावेळी चोपडा येथे 28/11/2023 रोजी सकाळी 
11.30 गांधी चौकात जोरदार स्वागत  करण्यात आले.

महात्मा गांधी पुतळ्याला हार घालून नगर वाचन मंदिरात ग्रामपंचायत अशा अंगणवाडी शेतमजूर शेतकरी यांची प्रचंड सभा घेण्यात आली.सभेत  व्यासपीठावर कॉ. लक्ष्मण शिंदे,.. वासुदेव कोली, ममता महाजन, मिनाक्षी सोनवणे, सदाशिव निकम होते, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री रमेश पाटील यांनी सूत्र संचालन केले 

सभेला इरफान मण्यार, गायकवाड, आरिफ शेख, ममता महाजन, लता पाटील, पुष्पावती मोरे, वैशाली पाटील, राजश्री मोरे, सुरेखा पाटील, प्रतिभा पाटील, नर्मदा कोळी, सुनिता कांखरे, दिव्यशरी कोळी, महाजन प्रकाश रल, मीनाक्षी सोनवणे, आदी चोपडे तालुक्यातील खेड्यापाड्यातून ४०० च्या वर कर्मचारी, कार्यकर्ते, पदाधिकारी यांची उपस्थिती होती. 

जनजागरण यात्रेचा जाहीरनामा असा__

१) ४ कामगारसंहिता  रद्द करा.
२) सर्वांना किमान वेतन २५००० रु वेतन द्या. नोकरीची शाश्वती द्या. 
३) कंत्राटी व मानधनावरील योजना आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घ्या.. कंत्राटी करण मुर्दाबाद !
४) सर्वांना पेन्शन ग्रॅच्युईटी व सामाजिक सुरक्षा लागू करा. जुनी पेन्शन (१९७२) पुर्वअटींसह लागू करा.
५) महागाई भ्रष्टाचार यावर लगाम लावा.. बेरोजगारांना काम द्या.
६) स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे शेतीमालाला भाव द्या.
७) शेतकरी, शेतमजूर यांना किमान पाच हजार रुपये दरमहा पेन्शन द्या.
८) आदिवासींचे वनात जमिनीचे दावे निकाली काढा.
९) जंगल गायरान जमीन नावे करा.
१०) रेल्वे, संरक्षण, विमा, बँक, दूरसंचार, वीज मंडळ, शिक्षण संस्था, रस्ते, खाणी, आरोग्य यांचे खाजगीकरण बंद करा.

*2024 भाजपा हटाव- देश बचाव लोकशाही बचाव संविधान  बचाव*  
  

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षतर्फे विक्रोळी पार्क साईट पोलीस ठाणे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री.संतोष घाटेकर साहेब यांचा सत्कार !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षतर्फे विक्रोळी पार्क साईट पोलीस ठाणे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री.संतोष घाटेकर साहेब यांचा सत्कार !!

विक्रोळी, (शांताराम गुडेकर) :
             शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष च्यावतीने व मोहल्ला कमिटी शांतता कमेटी कमेटीच्या वतीने विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाणे नवनियुक्त झालेले पोलीस निरीक्षक श्री.संतोष घाटेकर साहेब यांनी विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाणे सूर्यानगर येथे नुकतेच पदाची सूत्र हाती घेतली. त्या निमित्ताने शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षच्या सौ.प्रतिक्षा पवार (शाखा सघंटीका), मनोरमा कोटियान, श्रीकांत चिचपुरे (कक्ष कार्यकारिणी चिटणीस), राजेंद्र पेडणेकर (१२३ कक्ष वार्ड संघटक), श्री.यशवंत खोपकर (१२४ कक्ष वार्ड संघटक) यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक श्री संतोष घाटेकर साहेब यांचा शाल व पुष्पकरंडक देऊन गौरव करण्यात आला.

Tuesday, 28 November 2023

माझ्या कुटुंबाचा आधारवड म्हणजे माझी पत्नी - सौ. संजीवनी

माझ्या कुटुंबाचा आधारवड म्हणजे माझी पत्नी - सौ. संजीवनी 

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो. नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली…. पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले…

आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !

बस्स ! आणखी काही नको… काहीच ! *सौ. संजीवनी (संगिता)* लग्नाच्या ३० व्या वाढदिवसाच्या प्रेमपूर्वक  शुभेच्छा....!  

आभारी आहे', 'थँक यू', हे आपल्या जीवनात नेहमी वापरले जाणारे शब्द.अगदी सकाळी घरातून बाहेर जाताना रिक्षावाल्याने १०० रूपये सुट्टे दिले तरी त्याचे आपण आभार मानतो. ट्रेनमधील मित्र, ऑफिसमधील मित्र रस्त्यावर जाता-येता आपल्याला मदत करणारी व्यक्ती अशा सर्वांचे आपण आभार मानतो. पण कोणीतरी आपल्या मार्गावर सतत सावली बनून आपल्याला हात देत जगण्याचा मार्ग सुकर आणि आनंददायी करत असते. अशा व्यक्तीचे मला आभार मानायचे आहेत. ती व्यक्ती म्हणजे माझी पत्नी सौ. संजीवनी आज  २९ नोव्हेंबरला आमच्या लग्नाला ३० वर्षं पूर्ण होत आहेत. म्हणूनच तिला जाहीरपणे तिचे आभार मानायचे आहेत. ती माझ्या जीवनात आल्यानंतर तिने मला आणि घरातील सर्वांना, माझ्या मित्र मंडळींना, नातेवाईक या सर्वांना आपलंस केले. लग्नानंतर काही दिवसातच माझ्या जीवनाची रुपरेषा तिला समजली. रात्री उशिरा येणं, सतत बाहेर असणे तरीही हसतमुखाने होणारा तिचा वावर. खरंच यासाठी मी तिचा आभारी आहे. मुली निशा, सुचिता आणि मुलगा उत्कर्ष त्याच्या शिक्षणासाठी तिने केलेली धडपड. मुख्य म्हणजे तिच्या हातचे सुग्रस जेवण. अगदी माझ्या आईच्या जेवणाची आठवण करु देणारं. या सगळ्यासाठी पुन्हा एकदा तिला धन्यवाद. खरंच तिच्यामुळेच मी हा माझा प्रवास मनमुराद अनुभवतोय. जीवनाचा आनंद घेतोय. यासाठी सौ. संजीवनी तुझे पुन्हा एकदा मनापासून आभार. 

२९ नोव्हेंबर १९९३ रोजी लांजा तालुक्यातील भांबेड शिवगण वाडी) येथील कु. संगिता काशिराम शिवगण हिचा माझ्याशी विवाह होऊन ती सौ. संजीवनी शांत्ताराम गुडेकर झाली. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत ती माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये माझ्या सोबत खांदयाला खांदा लावून साथ देत आहे. नव्हे तीने तर मला मरणाच्या दारातून परत आणले आहे असे म्हटले तर ती अतिशोक्ती होणार नाही. कारण डाँक्टरांकडून सांगितले गेले होते की, आता जास्त दिवस नाही काढू शकत हे... तुमचे नशिब असेल तर... किंवा तुमच्या हातुन घडलेले पुण्यकार्य उपयोगात येऊन हे वाचले तर...! मात्र  माझी पत्नी हार मानायला तयार नव्हती. तिने मला वाचविण्यासाठी आपले प्रयत्न सुरुच ठेवले. बायकांना सोन्याचे दागिने खूपच प्रिय असतात असे ऐकून होतो... पण माझी पत्नी याला अपवाद ठरली. तिने एक मणीमंगलसुत्र सोडले तर सर्व दागिने विकून मला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. १२ वर्षे भाड्याने राहत असताना अनेक समस्यांवर मात करत सौ. संजीवनी नेहमी यशस्वी होत होती. माझ्याकडून तिला कायम त्रासच झाला हे मी स्वःताच कबूल करतो. त्रास म्हणजे मी व्यसनी नाही. कोणतेही मला व्यसन नाही. तरीही मी जास्त वर्षे आजारी असल्याने तिलाच संसाराची गाडी संभाळावी लागली. त्यामुळे माझ्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल मी तिची माफी मागतो. आम्हाला  निशा (सौ.निशा सुरज घोडेस्वार), सुचिता (सौ. सुचिता सोमनाथ सावंत) या दोन मुली, कु.उत्कर्ष शां. गुडेकर हा मुलगा आणि  सूरज घोडेस्वार आणि सोमनाथ सावंत असे दोन जावई व सिध्दांत सूरज घोडेस्वार हा नातू आहे. आता सर्व काही व्यवस्थितरित्या चालले आहे. संजीवनीमुळे माझ्या जीवनाला जणू "संजीवनी"च प्राप्त झाली. "गुडलक"म्हणतात अगदी त्याचप्रमाणे  माझी उत्तरोत्तर प्रगती होत गेली. सुख, समृद्धी, आरोग्य या सर्वांचीच प्रचती तिच्यामुळेच झाली. 

कोरोना काळात तर तीने स्वतः सह संपूर्ण कुटुंबाची काळजी घेऊन व्यवस्थितरित्या जबाबदारी पार पडली. कोरोना संकट मधून बाहेर पडून सावरतो न सावरतो तेवढ्यात दोन वर्ष पूर्वी मला ब्रेन प्रॉब्लेम होऊन घाटकोपर पश्चिम येथील हिंदू सभा हॉस्पिटल मध्ये तात्काळ ऍडमिट करावे लागले. परिस्थिती खूप बिकट होती.जगणे कठीण होते. मला अति दक्षता विभागात ऍडमिट केले. माझ्या पत्नी सोबत माझी मुलगी निशा, सुचिता, मुलगा उत्कर्ष आणि साडू संतोष भिवा रेवाळे, मेव्हणी सौ. स्नेहा (विजया) संतोष रेवाळे होते. मुख्य डॉक्टरने माझ्या पत्नीला स्पष्ट सांगितले आणि रेकॉर्डिंग पण करून घेतलं की, आता रुग्ण या परिस्थितीत आहे. पण पुढील २४ तासात खुप काही चांगले -वाईट बदल होऊ शकतात. माझ्या पत्नीने सांगितले की, जे असेल ते असेल पण... तुम्ही सर्व उपचार तात्काळ सुरु करून आम्हाला मदत करा. पत्रकार, समाजसेवक श्री.समीर वि. खाडिलकर (श्री स्वामी भक्त) यांच्याशी फोनवर बोलणे झालं होते. त्यांचे आणि स्वामींचे आशीर्वाद पाठीशी होते. शिवाय श्री अनिरुद्ध बापू यांचे लाख लाख आभार... कारण त्यांचे शुभ आशीर्वाद होते म्हणून कठीण परिस्थिती असतानाही माझ्यात फक्त १८ तासात थोडे - फार चांगले बदल होऊन मी दुसऱ्या दिवशी अति दक्षता विभागातुन बाहेर आलो. पण यासाठी माझ्या पत्नीने काय - काय करून हॉस्पिटल मध्ये पैसे जमा केले हे डोळ्यातून पाणी आणणारे आहे. तिने यावेळी पण तीने आपले सर्व दागिने मारवाडी कडे गिरवी ठेवले.आवश्यक रक्कम हॉस्पिटल मध्ये भरली. दोन दिवसांनी पुन्हा हॉस्पिटलने पुन्हा मोठी रक्कम भरायला सांगितले. आमच्यावर सतत मदतीचा हात ठेवणाऱ्या आमडेकरताई आणि त्यांचे कुटुंब सदस्य यांनी तात्काळ मदत केली. शिवाय संतोष रेवाळे आणि परिवार, माझी मुलगी निशा आणि जावई, सुचिता आणि जावई, मुलगा आणि त्याचे मित्र मंडळी (वर्षा पाटील, शुभांगी, रोहन, उर्मी, धनश्री, बंधिनी, विठ्ठल), मेव्हणी सौ.अंजली दिलीप पेजे आणि परिवार, मेव्हणा संदीप शिवगण आणि परिवार यांनी आर्थिक मदत करून हॉस्पिटल मध्ये पैसे जमा केले. उपचार सुरु होते. माझ्या तब्बेतीत सुधारणा होत होती. काही दिवसांनी हॉस्पिटल मधून सोडणार पण हॉस्पिटल बील खूप झाले होते. अशा वेळी घाटकोपर विभाग मधील समाजसेवक शरद भावे (कुणबी बांधव) यांना फोन करून मदतीचा हात द्यायला विनंती केली. त्यांनी तात्काळ हॉस्पिटल व्यवस्थापनाला फोन करून बील बाबत चर्चा केली आणि बील रक्कम थोडी कमी  झाली. माझ्या मुलाने आणि  पत्नीने बील भरलं आणि मला घरी घेऊन आले. सोबत साडू रेवाळे होते.घरी आलो तरी आता मरेपर्यंत गोळया आणि औषधे, डॉक्टर चेकअप  कायमस्वरूपी पाठी लागले आहे. माझ्या पत्नी सह संपूर्ण परिवारला याचा खूप त्रास सहन करावा लागला. लागत आहे.... आणि मरेपर्यंत लागणार आहे. तरीसुद्धा माझी पत्नी हे सर्व कोणताही राग.. रोष न करता.. न थकता (असं बोलून चालणार नाही. कारण ती पण माणूस आहे.थकवा तर येणारच.. न थकवा येणे साहजिक आहे. पण ती तसं दाखवत नाही फक्त  कुटूंबासाठी... कारण तीच आता कुटूंब प्रमुख आहे) नित्यनेमाने करत आहे. १९९५ ते आजपर्यंत तिने मला साथ देत  माझ्या आजारपणवर मात केली आहे. मला वाचवण्यासाठी जीवाचे रान करून.. दिवस -रात्र एक करून सेवा केली आहे. करत आहे. त्याबद्दल तिचे मनःपूर्वक आभार...! 

माझी संजीवनी उत्तम सुगरण आहे. घरातील जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले की, संपूर्ण जेवणाची तयारी ती एकटीच करते. रात्रभर जागरण झाले तरी चालेल पण स्वयंपाक करण्यासाठी आवश्यक सर्व तयारी ती करायला तयार असते. तिच्या हातचे जेवण जेवलेली व्यक्ती पुन्हा-पुन्हा आल्याशिवाय  राहणार नाही. एकादया नामवंत हाँटेलात मिळणाऱ्या जेवणाला जी चव असते त्यापेक्षा जास्तच पण कमी नाही अशी चव संजीवनीने बनवलेल्या जेवणाला असते. ३० वर्षात मला हाँटेलात जाऊन  खाण्याची इच्छाच कधी झाली नाही. कारण हे बनव ते बनव असे म्हटले तर दुस-या दिवशीच ते घरात बनवते. शिवाय आजवर हट्ट कोणत्याही गोष्टींचा तीने केलेला नाही. एकाद्या दिवशी ती घरात नसेल तर घर खाली खाली जाणवते. माझ्याकडून ब-याचवेळा चुका झाल्या असतील पण ३० वर्षात तीने एकही चुक केलेली नाही. सासु-सासरे, दिर, जावूबाई यांनाही तिच्या विषयी तक्रार कधीच नाही. आज आमच्या आयुष्याला जी स्थिरता लाभली आहे ती फक्त तिच्या मेहनतीने व कष्टाने साठवलेल्या प्रत्येक गोष्टीमुळेच. त्यात तिच्या काटकसरीचे कौतुक जेवढे करावे तेवढे कमीच आहे. 

आज आम्ही आमच्या लग्नाचा ३० वा वाढदिवस (२९ नोव्हेंबर) साजरा करणार  करणार आहोत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सौ.संजीवनी (संगिता) ने मला साथ दिली.जसा आहे. तसा मला स्वीकारले. माझ्या संसाराला आकार आणि उकार दिला. कधी ऊन तर कधी सावली असेच माझ्या जीवनात चढ उतार आले. सामाजिक कार्य करताना तिला तिच्या अनेक अपेक्षाना आवर घालावी लागली. कुरकुर न करता मला तिने समजावून घेतले आहे म्हणूनच मी आज सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करू शकलो. आमच्या जीवनाची ही संजीवनी अशीच कायम राहवी, अशी मी श्री मार्लेश्वर चरणी प्रार्थना करतो व वडिलधा-यांचे आशिर्वाद कायम राहण्याची अपेक्षा ठेवत तिच्यासाठी एवढंच म्हणू शकतो__

तू माझ्या सोबत असलीस
कि आभाळ ठेंगणे होतं
तु माझ्या जवळ असल्यानं
अवघड गणित सोपं होतं.

माझ्या सर्वच कठीण प्रसंगी सोबत करणा-या माझी पत्नी सौ. संजीवनी (संगिता) हिला मानाचा मुजरा..!

शांत्ताराम गुडेकर
विक्रोळी पार्क साईट
मुंबई

Monday, 27 November 2023

समित्र क्रिडा मंडळतर्फे शिवसेना उध्वव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्था पदाधिकाऱ्यांचा सत्कार !!

समित्र क्रिडा मंडळतर्फे शिवसेना उध्वव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्था पदाधिकाऱ्यांचा सत्कार !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
              समित्र क्रिडा मंडळ, पितामह रामजीनगर भटवाडी घाटकोपर येथे श्री साईबाबा उत्सव समिती आयोजित वर्धापन दिन सोहळा व साईभडारा येथे  शिवसेना उध्वव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर, खजिनदार संदीप चादीवडे, दौलत बेल्हेकर, श्रीकांत चिचपुरे, राजेन्द्र पेडणेकर यांनी भेट दिली. मंडळाचे अध्यक्ष भगवान यादव, कार्याध्यक्ष चंद्रकांत गोतावडे, सेक्रेटरी राजेश जाधव, खजिनदार संदीप सिंदकर, सुर्यकांत मयेकर, सुनिल सिंदकर, सुभाष शिवगण या मंडळानी मायेची सावली एक हात कर्तव्याचा गोर गरीब लोकांचा केंद्र बिंदू असलेल्या या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर , संदीप चादीवडे व संपूर्ण टिम यांचे संमित्र क्रिडा मंडळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Sunday, 26 November 2023

साई श्रद्धा कलापथक (कानसे ग्रुप) संस्थापक,लेखक, दिग्दर्शक, निर्माते - संदिप कानसे आणि समुहातर्फे नमन कार्यक्रमचे आयोजन !!

साई श्रद्धा कलापथक (कानसे ग्रुप) संस्थापक,लेखक, दिग्दर्शक, निर्माते - संदिप कानसे आणि समुहातर्फे नमन कार्यक्रमचे आयोजन !!

*गण, गौळण सह संदिप कानसे लिखीत/ दिग्दर्शित ज्वलंत सामाजिक नाट्यकलाकृती "क्रांती" हा  "१७५ वा" भाग्यशाली प्रयोगाचे ४ डिसेंबरला होणार  सादरीकरण*

मुंबई (शांताराम गुडेकर )
             परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणभूमीत अनेक कलांचा विकास झाला आहे. त्यामध्ये नमन (खेळे), शक्तीतुरा (जाकडीनृत्य), भारुड, डफावरील पोवाडे इ. कलांचा समावेश आहे. कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्हातील नमन (खेळे) या लोककलेची प्रसिध्दी जगभर पसरली आहे. श्री गणरायाचे आगमन, मृदंग, ढोलकीच्या तालावर ठेका धरणारी नटखट गवळण, काल्पनिक पौराणिक वगनाट्य सादर करणारी ही नमन लोककला कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना, शासनाचे अनुदान नसतानाही कोकणवाशीय जोपासत आहेत. या लोककलेला फार प्राचीन काळापासून रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, देवरुख, लांजा, राजापूर, मंडणगड या तालुक्यातील लोकांनी ही लोककला जोपासून शासनाच्या, भारत सरकारच्या अनेक योजना या लोककलेतून लोकांपर्यंत पोहचवून त्याविषयी जनजागृती करण्याचे काम पार पाडले आहे. झाडे लावा-झाडे जगवा, पाणी वाचवा, नशाबंदी, वृक्षतोड थांबवा, स्त्रीभ्रुणहत्या, शिक्षणाचे महत्त्व इ.विषयांवर या लोककलेतून लोकांपर्यंत संदेश देण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

                मुंबईसह कोकणात सलग २५ वर्ष रासिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नवतरुन मित्र मंडळ चिखली ( गुहागर ) यांचे व्यवसायिक स्त्री पात्राने नटलेले बहुरंगी नमन अर्थात कोकण चे खेळे दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले  येथे सोमवारी ४ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे. 

                पिढ्यानपिढ्या जोपासलेली "नमन लोककला" आज मनोरंजन सह जनप्रबोधनाचे मुख्य माध्यम ठरत असून अनेक गाव मंडळ, नमन कलापथक, निर्माते, आयोजक नमन लोककलेचं जतन संवर्धन व्हावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.कोकण वाचवा... पाणी अडवा..पाणी जिरवा...शासनाच्या विविध योजना याचा प्रचार आणि प्रसार या लोक कलेतून होत असतो.नमन लोककला क्षेत्रात नावलौकिक असलेलं व्यक्तिमत्त्व रत्नागिरी जिल्ह्यामधील, गुहागर तालुका सुपुत्र - श्री.संदिप धोंडू कानसे यांच्या लेखन, दिग्दर्शनास २५ वर्ष पूर्ण होत असून गेल्या पंचवीस वर्षांत "साई श्रद्धा कलापथक" (कानसे ग्रुप) संस्थापक तसेच लेखक, दिग्दर्शक, निर्माते- संदिप कानसे यांनी मुंबई रंगमंचावर तसेच संपूर्ण कोकणात "१७४ नमन  लोककलेचे" यशस्वी प्रयोग करून "१७५ वा भाग्यशाली" प्रयोगाकडे वाटचाल करत असून सोमवार दिनांक-०४ डिसेंबर २०२३ रोजी  मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले-पूर्व, मुंबई येथे हा खास गौरवशाली सोहळा रंगणार असून रात्रौ ०८-३० वाजता, तरुण मित्र मंडळ-चिखली (कानसेवाडी) निर्मित, साई श्रद्धा कलापथक, कानसे ग्रुप मुंबई यांचे रसिक मनोरंजनार्थ "नमन लोककला" कार्यक्रम होणार असून यामध्ये गण, गौळण सह संदिप कानसे लिखीत/ दिग्दर्शित ज्वलंत सामाजिक नाट्यकलाकृती "क्रांती" हा  "१७५ वा" भाग्यशाली प्रयोग सादरीकरण होणार आहे. रसिकांना तसेच मान्यवर यांना संपूर्ण "सोहळा" कार्यक्रम पाहण्यासाठी आपल्या पासेस अथवा तिकिटावर सायंकाळी ०५ वा. प्रवेश मिळेल, तरी आपल्या पूर्वजांच्या पुण्याईचा ठेवा अनंत काळ टिकून राहावा..त्या साठी कोकणातील कोकणची लोककला कोकणचे नमन प्रयोगाला  रसिक राजा आमच्या प्रयत्नाला तुमच्या सहकार्याची अपेक्षा...! या कार्यक्रमसाठी आजच आपले आसन बुक करा.अधिक माहितीसाठी प्रयोग संपर्क : संदिप कानसे- ९५९४६२७३३४ तिकीट संपर्क : अमोल भातडे - ९०८२३९७८०६ सुभाष बांबरकर - ९८९२३८४४७१  यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन "साई श्रद्धा कला पथक" कानसे ग्रुपचे संस्थापक - संदिप कानसे यांनी केले आहे.

कल्याण आरटीओ कार्यालयाकडून खंडपीठाच्या निर्णयाची पायमल्ली !!

कल्याण आरटीओ कार्यालयाकडून खंडपीठाच्या निर्णयाची पायमल्ली !!
कल्याण / प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्रातील आरटीओ कार्यालयात एजंटची आवश्यकता नाही असा निकाल औरंगाबाद खंडपीठाने नुकताच दिला आहे. मात्र सदर निकालाची अंमलबजावणी कल्याण येथे झाली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खंडपीठाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे.

आरटीओ कार्यालयात होणारे कामकाज ऑनलाईन झाल्याने मध्यस्थी म्हणजेच एजंटची आवश्यकता नाही असा निकाल एका जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान दिला आहे. मात्र कल्याण आरटीओ कार्यालयात आज ही एजंट यांचे कामकाज पूर्वी प्रमाणे नियमित सुरू आहे. याकडे आरटीओ अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत का? असा प्रश्न सर्व सामान्य यांच्याकडून उपस्थित होत आहे. एजंट विरुद्ध आरटीओ कार्यालयाने आज पावेतो कोणतेही पाऊल उचलले नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी साळवी यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. हा प्रकार म्हणजे औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची पायमल्ली होय.

प्रादेशिक परिवहन विभागातील कोणतेही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही अशी कल्याण येथील वाहन धारकांची वर्षानुवर्षे तक्रार राहिली आहे. एजंट विरुद्ध कारवाई करण्याचे धाडस आरटीओ अधिकारी का दाखवत नाहीत ? या मागील गौड बंगाल काय आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आरटीओ कार्यालयातील एजंट वर कधी कारवाई होते या कडे सर्व सामान्य जनतेचे लक्ष लागून आहे.

Saturday, 25 November 2023

MCGM, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था आणि NBTC तर्फे युनिक ब्लड मोटिव्हेटर्स रक्तदाते परिवाराचा सन्मान !!

MCGM, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था आणि NBTC तर्फे युनिक ब्लड मोटिव्हेटर्स रक्तदाते परिवाराचा सन्मान !!

मुंबई, (शांताराम गुडेकर, निलेश कोकमकर) -

रक्तदान हे महानदान मानले जातेच त्याच मूळ कारण आपलं रक्तदान म्हणजेच इतरांना जीवनदान, कधी कधी जिथं रक्ताची नाती सुद्धा तयार होत नाहीत तिथं अनेक रक्तदाते एखाद्याला जीवनदान देण्याकरता तत्पर असतात हे म्हणावं लागेल. वर्षभर अनेक ब्लड कॅम्प तसेच नवनवीन रक्तदात्यांना प्रेरित करुन रक्तदान करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल सन्मानित केले आहे.  त्याचाच सन्मान म्ह्णून   राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवसानिमित्त आज (NBTC) नॅशनल ब्लड ट्रान्सफ्युजन कौन्सिल, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था मुंबई महानगर पालिका यांनी युनिक ब्लड मोटिव्हेटर्स रक्तदाते परिवाराचा सन्मान करण्यात आला आहे. हा सन्मान संस्थेचे सहसंस्थापक/ उपाध्यक्ष श्री. अमोल सावंत, संघटक श्री. हर्ष शिरसाट व संघटक श्री. निलेश कोकमकर यांनी स्वीकारला.हा सन्मान पूर्ण युनिक ब्लड मोटिव्हेटर्स रक्तदाते आणि सदस्य यांचा आहे असे मत उपाध्यक्ष श्री. अमोल सावंत यांनी व्यक्त केले. 

        युनिक ब्लड मोटिव्हेटर्स ह्या संस्थेने म्हणजेच सन २०१८ पासून ते २०२३ पर्यंत ह्या संस्थेने कमी वेळेत अनेक रक्तदाते तयार करून अनेकवेळा रक्तदान शिबिरे आयोजित करून मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयातील रक्तपेढीना आणि गरजवंत रुग्णांना रक्ताची उपलबध्दता करून देणे हे कार्य मोठ्या शिताफीने हि संस्था करत असते. अपघात, बाळंतपण, डायलेसिस रुग्ण, सिकलसेल रुग्ण, थेलेसेमीयाच्या रुग्णांना आणि अन्य शस्त्रक्रियांसाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज लागते. मुंबई सारख्या शहरात दररोज हजारोंच्या संख्येत रक्त युनिटची गरज लागत असते आणि त्या मानाने रक्त संकलन खूप कमी प्रमाणात होत असताना दिसते. पण अजून हि रक्तदानाच्या गैरसमजुतीमुळे  लोक रक्तदान करण्यास टाळत असतात. ते गैरसमज दूर करून अनेकांनी रक्तदानाकडे वळले पाहिजे.  
        युनिक ब्लड मोटिव्हेटर्स रक्तदाते परिवाराच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा. रोवला गेला आहे त्यामुळे सर्व हितचिंतक रक्तदात्यामुळेच हे शक्य झाले आहे. ह्या 
 रक्तदाते परिवाराला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या पल्लवी ब्लड सेंटर, केईम हॉस्पिटल  ब्लड बँक, सायन हॉस्पिटल ब्लड बँकच्या नायर हॉस्पिटल ब्लड बँक अशा अनेक ब्लड बँका आहेत  त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.  

*रक्ताचा थेंब थेंब आहे मौल्यवान, जो वाचवतो रुग्णांचे प्राण, याची असावी सर्वांना जाण म्हणूनच करावे निःस्वार्थ रक्तदान*

Friday, 24 November 2023

कोकणात आंगवली -रेवाळेवाडीत तुळशी विवाह थाटामाटात संपन्न !!

कोकणात आंगवली -रेवाळेवाडीत तुळशी विवाह थाटामाटात  संपन्न !!

कोकण, (शांताराम गुडेकर) :
            भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि उत्सवांना अतिशय महत्त्वा आहे. दिवाळी हा या सर्व सण उत्सवात आनंदाचा आणि महत्त्वाचा सण. ज्यामध्ये गोडधोड पदार्थ केले जातात. शाळांनाही सुट्ट्या असतात. सर्वत्र धमाल असते. ही धमाल जवळपास तुलसी विवाहापर्यंत चालते. महाराष्ट्र आणि देशभरात तुळसी विवाह हा दिवाळीनंतर १५ दिवसांनी येणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम मानला जातो. जो साधारण सायंकाळी ते रात्री दरम्यान साजरा केला जातो. खरे तर तुळस ही एक बहूउपयोगी आणि औषधी वनस्पती आहे. जी सर्वसाधारणपणे सर्वांच्या अंगणात वृंदावनावर पाहायला मिळते.अशाच तुळशीची लग्ने घराघरांमध्ये लावली जातात. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला प्रदोष काळात तुळशी विवाह साजरा केला जातो. या दिवशी सूर्यास्तानंतर तुळशीजींचा विवाह शालिग्रामजींशी होतो. धार्मिक विधीनुसार तुळशी विवाह केल्याने त्याच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत नाहीत आणि नात्यात प्रेम आणि गोडवा वाढतो. यावर्षी २४ नोव्हेंबर २०२३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील आंगवली -रेवाळेवाडी येथे  तुळशीचा विवाह संपन्न झाला. वाडीमधील रेवाळे, आग्रे, गुडेकर, धनावडे, चव्हाण कुटुंबियांनी यामध्ये सहभाग घेतला. काशिराम केशव रेवाळे, आत्माराम रेवाळे, शांताराम रेवाळे, शशिकांत आग्रे, दत्ताराम गुडेकर, तुकाराम गुडेकर, संदीप चव्हाण, संतोष रेवाळे, वामन रेवाळे, राजेश रेवाळे, योगेश रेवाळे, संदीप रेवाळे, सुधाकर रेवाळे, विश्राम रेवाळे, अशोक रेवाळे आणि सहभागी रेवाळे, गुडेकर, चव्हाण, आग्रे, धनावडे बंधू यावेळी उपस्थित होते. यंदा तुळशी विवाहच्या दिवशी अमृत सिद्धी योगासह तीन अद्भुत योग जुळून येत आहेत. या दिवशी वैवाहिक जीवनात सुखासाठी अनेक विशेष उपाय केलेजातात. आषाढ शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णू चार महिने योग निद्रामध्ये लीन होतात आणि कार्तिक महिन्याच्या देवूथनी त. भगवान विष्णूच्या जागरणानंतर तुळशीचा शिलाग्राम अवताराशी विवाह करण्यात आला.

           हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते, तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते आणि मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते.इतके हिंदू धर्मातील धारणेमध्‍ये तुळशीला महत्त्व आहे.

"तुळसीचे पान.एक त्रैलोक्य समान आहे.
उठोनिया प्रातःकाळी, वंदी तुळसी माऊली |
नाही आणिक साधन, एक पूजन तुळसीचे
न लगे तीर्थाधना जाणे, नित्य पूजने तुळसीसी
योगायोग न लगे काही, तुळसीवाचुनी देव नाही"

अशा शब्दांत संत एकनाथांनी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे. तुळशीमध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन वायू सोडण्याचा गुणधर्म जास्त असल्यामुळे शरीर निरोगी राखण्यास तिचा उपयोग होतो.दारात वा घरात तुळशीचे झाड असल्यास घरात पिसवा, हिवतापाचे जंतू शिरकाव करत नाहीत. तुळस प्रदूषणनाशक आहे. ताप, सर्दी, खोकला दूर करणे, हवा शुद्ध करणे हे तिचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत. हिंदूंच्या अंत:करणात तुळशीसंबंधात पूज्यभाव आहेच; पण इतर धर्मीयदेखील तुळशीबद्दल आदर दाखवतात.तुळशी विवाह लावण्या एवढीच तिचे पावित्र्य जपणे ही आपलीच जबाबदारी आहे.ती प्रत्येक व्यक्तीने पार पाडायला हवी.

                                            शब्दांकन - शांताराम गुडेकर (लेखक, कवि, पत्रकार)
                                                               +91 98207 93759

मराठी चित्रपटसृष्टीत ७०/८० चे दशक गाजवणाऱ्या चरित्र अभिनेते विलासराव रकटे यांची सर्वांकडूनच भयानक उपेक्षा, जीवन जगणे मुश्कील?

मराठी चित्रपटसृष्टीत ७०/८० चे दशक गाजवणाऱ्या चरित्र अभिनेते विलासराव रकटे यांची सर्वांकडूनच भयानक उपेक्षा, जीवन जगणे मुश्कील?

कल्याण, (संजय कांबळे) : तांबड्या मातीचे मैदान मारल्यावर चित्रपटसृष्टीत पदार्पण करून आपल्या बलदंड शरीर, खर्जातील जबरदस्त पडदा व्यापणारा आवाज, करारी नजर आणि दमदार अभिनयाच्या जोरावर चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, अनंत माने, दादा कोंडके, दत्ता माने, कमलाकर तोरणे व डॉ जब्बार पटेल अशा मातब्बर दिग्दर्शकांच्या ७०/८० मराठी आणि १०च्या आसपास हिंदी चित्रपटात काम करून चरित्र अभिनेते म्हणून कलारसिकांच्या आठवणीतल्या कप्प्यात कायमस्वरूपी घर करून राहिलेल्या प्रतिभासंपन्न विलासराव रकटे यांची उतारवयात मात्र गावासह सर्वाकडूनच भयानक उपेक्षा झाली आहे. यामुळे त्यांचे जगणे मुश्किल बनले आहे. कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देणा-या अशा गुणी अभिनेत्याला शासनाने वा-यावर सोडू नये अशी भावना त्यांच्या वर प्रेम करणाऱ्या चाहत्याकडून व्यक्त केली जात आहे.

विलास यशवंत रकटे यांचा जन्म ३० जुलै १९४५ रोजी कामेरी ता वाळवा जि सांगली येथे झाला. लहानपणीच वडीलांचा मृत्यू झाल्याने आई आक्काताई रकटे हिच्या वर कुंटूबाची जबाबदारी पडली, चुलते हैबती सखाराम पाटील यांनी यांनी शिक्षण व इतर जबाबदारी स्वीकारली, कामेरी येथे ७वीपर्यत शिक्षण झाल्यावर पुढील शिक्षण इस्लामपूर व उच्च शिक्षण इंदूर युनिव्हर्सिटी मध्यप्रदेश झाले.बालपणापासून खेळाची आवड असल्याने कबड्डी, लांब उडी, गोळाफेक, भालाफेक, कुस्ती, यामध्ये अनेक बक्षिसे मिळवली, शाळा महाविद्यालयात अनेक नाटकामधून काम सुरू केले. त्यामुळे अभिनयाचे बाळकडू लहान वयातच मिळाले.

कुस्तीची पंढरी असलेल्या कोल्हापूर येथे गेल्यानंतर अनेक पैलवानांची ओळख झाली, बलदंड शरीरयष्टी यामुळे खाशाबा तालमितून कुस्ती चे धडे घेतले, डाव, प्रतिडाव यात तरबेज झाल्यावर विविध ठिकाणी नामांकित मल्लांबरोबर कुस्तीचे मैदाने गाजवली, मुंबई गोवा याही ठिकाणी कुस्तीचा डंका वाजत होता, हिंदकेसरी मारुती माने यांच्या सह मोठमोठ्या मुल्लांशी कुस्ती केली, मुख्यमंत्री, सह दारासिंग यांनी विलास रकटे यांचे कौतुक केलं. कुस्तीतील यशामुळे कामेरी ता वाळवा चे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहचले होते. गावाच्या यात्रेत कुस्ती सह वाटचुकली, वाहतो दुर्वाची जुडी, कुंटुब, मी उभा आहे, वेगळं व्हायच मला, मुंबई ची माणसं अशी नाटकं केली,यातून खलनायक साकारले होते.

आई आहे शेतात, हा पहिला चित्रपट केल्यानंतर मात्र डॉ जब्बार पटेल यांच्या 'सामना, या चित्रपटाने रकटे यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. हा चित्रपट मैलाचा दगड ठरला, यानंतर चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, अनंत माने, दादा कोंडके, दत्ता माने,कमलाकर तोरणे अशा मातब्बर दिग्दर्शकांच्या चित्रपटात भूमिका साकारल्या, 'पांडू हवालदार' चित्रपटापासून ते दांदाच्या चमूत दाखल झाले. बोटं लाविन तिथं गुदगुल्या, रामराम गंगाराम, तुमचं आमचं जमल, या चित्रपटात त्यांनी अभिनयाची चुणूक दाखवली, गनिमी कावा, चित्रपटात थरारक तलवारबाजी करून अस्सल मोगल सुभेदार रंगवला.

त्या काळी चित्रपटांचा चेहरा पूर्णतः ग्रामीण असल्यामुळे रकटे यांच्या भूमिकाचा बाज देखील ग्रामीण ढंगाचा राहिला, फुकट चंबू बाबुराव, चोरावर मोर,गाव तस चांगल, पण वेशीला टांगल, निखारे, चांडाळ चौकडी, लक्ष्मी, सर्वसाक्षी, तांबव्याचा विष्णू बाळा, अंगारकी, सुळावरची पोळी, अश्या जवळपास ७०/८० मराठी चित्रपटात रकटे यांनी खलनायक साकारला, बहुतांश चित्रपटाचे चित्रीकरण आपल्या कामेरी गावातच केले. यामुळे गाव  देश विदेशात पोहचले, १९७०/८०चे दशकात विलास रकटे हे रसिकांच्या गळ्यातील ताईत बनले होते.

आपले गाव दुष्काळाचे आहे, म्हणून रकटे यांनी  कामेरी येडेनिपाणी पाणी योजना राबविण्याचा निर्णय घेतला, कृष्णा नदिचे पाणी इरिगेशन द्वारे आणन्यासाठी त्यांनी आपल्या ओळखीचा पुरेपूर वापर केला, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, सुशीलकुमार शिंदे, राजारामबापू पाटील, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण निळूभाऊ फुलं यांना गावात आणलं, २०/३० किलोमीटर पाईपलाईन करून ओसाड गाव सुजलाम सूफलाम केले, आज २०/२२ हजार लोकसंख्या व १७ सदस्य असलेले कामेरी गाव हिरवेगार दिसत आहे त्याचे शिल्पकार विलास रकटे हेच आहेत. यासह अनेक लोकोपयोगी व जनहितार्थ कामे करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली, ऐवढेच नाही तर 'गाव तसं चागलं पण वेशीला टांगल,या चित्रपटात गावातील वाद, राजकारण यामुळे गावाची कशी वाट लागते हे दाखवून दिलं तसं स्वतः देखील आचरण केले. गावात निवडणूका नको, बिनविरोध व्हायला हव्यात म्हणून त्यांनी २० ते ३० वर्षे अंगाला गुलाल लावला नाही.

या योगदानाबद्दल विलास रकटे यांना व्ही शांताराम पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, वंसतदादा पुरस्कार, कला रत्न पुरस्कार, उत्कृष्ट सांस्कृतिक कार्य पुरस्कार असे शेकडो पुरस्कार त्यांना मिळाले आहेत, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या पुरस्काराचा समावेश यामध्ये आहे.

करारी नजर, बलदंड शरीरयष्टी, खर्जातील पडदा व्यापणारा आवाज, आणि आवेशपूर्ण अभिनयाच्या जोरदार रकटे यांनी संत्तर ऐंशीचे दशक गाजवलं, मराठी चित्रपटसृष्टी मर्यादित असताना चित्रपटाचे बजेट मर्यादित, वितरणात अनंत अडचणी, सर्वदूर पसरलेल्या प्रेक्षकापर्यत चित्रटप पोहचवणे अशी आव्हाने असताना ग्रामीण भागातील रांगडा कलाकार विलास रकटे चित्रपटसृष्टीत भक्कम उभा राहिला. खलनायक, चरित्र अभिनेता अशी इमेज असली तरी नायक म्हणून त्यांनी अन्याय व प्रतिकार या दोन चित्रपटात भूमिका केल्या, या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शक रकटे यांनी च केले होते. यासाठी त्यांनी ५ लक्ष रुपये घेतले होते.१९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रतिकारक ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.आ चित्रपटात डॉ श्रीराम लागू, शरद तळवलकर, निळू फुले, अलका कुबल, असे दिग्गज कलाकार यामध्ये होते, उन्मत पुढा-याना धडा शिकवणारा  रणजीत  लक्षवेधी ठरला, पुढे १० वर्षानी 'प्रतिडाव,ची निर्मिती केली पुन्हा आघाडीच्या कलाकाराची फळी दिसली, पण या चित्रपटाचे म्हणावे तेवढे कौतुक झाले नाही, याचा परिणाम असा झाला की, कर्जाचा डोंगर उभा राहिला, ५ लाखाचे ३० लक्ष द्यावे लागले, शिवाय मुंबई चा बंगला विकला, गावाची शेती गेली, उपासमारीची वेळ आली‌.

सध्या विलास रकटे यांचे ८० ते ८५ वय आहे, दोन्ही गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे, औषधोपचार सुरू आहे, वैद्यकीय खर्च परवडत नाही, शासनाच्या २/३ हजार रुपये मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनावर कसातरी घरखर्च चालतो आहे, पत्नी अरुणा यांना ही मणक्यांचा आजार आहे, एकूणच जीवन जगणे मुश्कील बनले आहे. रकटे कुंटूबीय हे स्वातंत्र्य आंदोलनात  व चलेजाव चळवळीत सक्रिय सहभागी झाल्याने सांगली, सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य आंदोलनातील क्रातीसिंह नाना पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, राजाराम बापू पाटील, यशवंतराव चव्हाण, वंसतदादा पाटील, पांडू मास्तर, आदीचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान सांगणारा 'क्रांतीपर्व, या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, लेखन पुर्ण झाले आहे. पण केवळ आर्थिक अडचणी मुळे हे साहित्य धुळखात पडले आहे. नव्या पिढीला क्रांतिकारकाचे योगदान कळावे, समजावे, हा उद्देश या मागचा आहे, पण तो सध्या साध्य होईल असे वाटत नाही.

सध्याचा मराठी चित्रपट सातासमुद्रापार पोहचला आहे ढिगभर चँनेल आणि मल्टिप्लेक्स मध्ये मराठी चित्रपट वाजत गाजत आहे. या काळात शेकडो कलाकार आले अन् विस्मरणात गेले. मात्र आपल्या जरबयुक्त आवाजाने पडादा व्यापणारा,करारी नजर, बलदंड शरीर आवेशपूर्ण अभिनयामुळे विलास रकटे नावाचा प्रतिभासंपन्न अष्टपैलू कलाकार आठवणींच्या कप्यात राहिला. खरे सांगायचे तर अभिनेते विलास रकटे यांचे चित्रपट, कला क्रीडा, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अमुल्य योगदान, कामेरी गावाला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याचे केलेले काम, जपलेली सामाजिक बांधिलकी, याचा विचार केला तर या परिसरात उदयास आलेली कारखादारी, वाढलेले विविध उद्योग, राजकीय पुढारी, नेते, शासन,चित्रपट निर्मिती संस्था, पतपुरवठा संस्था, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाव या सर्वांना ठरविले, निश्चय केला तर या अष्टपैलू, प्रतिभासंपन्न चरित्र अभिनेत्याच्या आयुष्यात 'आर्थिक, ओलावा निर्माण करु शकत नाही का?क्रांतीपर्व, हा चित्रपट तयार होऊन प्रदर्शित व्हावा हि एकच आशा रकटे यांची आहे, ती पुर्ण होईल का?स्वतः ची पाठ थोपटून घेण्यासाठी शासन लाखो रुपये जाहिरातबाजीवर खर्च करत आहे, ते हा आपला अमुल्य ठेवा जपून ठेवण्यासाठी पुढाकार घेईल का? अन्यथा, जुनं ते सोनं, ही म्हण नामशेष होईल, एवढे नक्की !

ज्येष्ठांनी मदतीसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन !!

ज्येष्ठांनी मदतीसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन !! पुणे, प्रतिनिधी : देशभरातील ज्येष्ठ नागरिक...