Tuesday 30 November 2021

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वाहनांचे सारथ्य करणारे रघुनाथ पांडुरंग वीर सेवानिवृत्त !! "डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी केला सपत्निक सत्कार"

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वाहनांचे सारथ्य करणारे रघुनाथ पांडुरंग वीर सेवानिवृत्त !! "डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी केला सपत्निक सत्कार"


कल्याण, (संजय कांबळे) : गेल्या तीस वर्षाच्या सेवाकाळात १३ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, दोन अतिरिक्त मुख्य कार्यकारी, एक मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या शासकीय वाहनांवर सारथ्य केलेले जिल्हा परिषदेचे वाहन चालक रघुनाथ पांडुरंग वीर मंगळवारी सेवानिवृत्त झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी त्यांच्या कामाचा गौरव करत सहपत्नीक त्यांचा सन्मान केला आणि निवृत्तीनंतरच्या उर्वरित आयुष्याला शुभेच्छा दिल्या. 

उस्मानाबाद जिल्हातील परांडे तालुक्यातील कुम्बेजा हे त्यांचे गाव. ७८ च्या दुष्काळात त्यांचे वडील ठाण्यात आले आणि वीर कुटुंबीय ठाण्यात स्थायिक झाले. सुरुवातीला श्री. वीर खाजगी वाहन चालवीत असत. त्यावरच त्यांचे उदरनिर्वाह सुरु होते. १९९१ च्या भरतीत ते शासकीय सेवेत वाहन चालक पदावर रुजू झाले. वाहन चालक म्हणून काम करताना सर्वात प्रथम त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र शिवले येथे काम केले. त्यानंतर १९९८ पर्यंत मुख्य लेखा वित्त अधिकारी यांच्या वाहनांचे सारथ्य केले. त्यानंतर ते आजतागायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वाहनांचे सारथ्य करत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख पद आहे. अशा जबाबदार पदाच्या व्यक्तीकडे काम करताना शिष्टाचार महत्त्वाचा असतो. गेल्या तीस वर्षाच्या सेवाकाळात त्यांनी या शिष्टाचाराचे काटेकोर पालन केले. त्यामुळे प्रत्येक सी.ई.ओ नी त्यांच्या कामाचे कौतुक केले. सगळ्यांशी सलोख्याने वागणे आणि कामातील नम्रतेमुळे त्यांच्या कौटुंबिक अडचणीमध्ये अनेक सी.ई.ओ नी त्यांना वेळोवेळी सहकार्य केले. 


तब्बल तीस वर्षाची सेवा बजावत असताना अनेक सुख-दु:खाचे क्षण आल्याचे  वीर सांगतात. आम्ही वाहन चालक म्हणजे कामाची नियोजित वेळ नसणे, वेळेचे बंधन नसणे असा आमचा पेशा. त्यामुळे कुटुंबाला वेळ देताना तारेवरची कसरत असायची पण माझ्या सुविद्य पत्नी मीरा वीर हिने मला नेहमीच पाठबळ दिल्याची भावना. वीर व्यक्त करताना ते भावूक झाले होते.

त्यांच्या या सेवानिवृत्ती बद्दल व पुढील काळात सुख समाधान लाभावे म्हणून कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, मुरबाड पंचायत समितीचे रमेश अवचार यांनी ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

वाकळण संघाने अध्यक्ष चषक २०२१ पटकावला, मालिकावीर ऋषी भोईर !

वाकळण संघाने अध्यक्ष चषक २०२१ पटकावला, मालिकावीर ऋषी भोईर !


कल्याण, (संजय कांबळे) : जय वाघेश्वर क्रिकेट संघ देसाई आयोजित अध्यक्ष चषक२०२१ साठी मर्यादित षटकांचे सामने केवळ ग्रामीण भागातील क्रिकेट पटू करिता खेळवण्यात आले होते. यामध्ये वाकळण संघाने प्रथम क्रमांक पटकावत अध्यक्ष चषक २०२१ वर आपले नाव कोरले. तर मालिकावीर म्हणून याच संघाचा ऋषी भोईर याला हा बहुमान मिळाला, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


कल्याण ग्रामीण भागातील देसाई गाव परिसरात अध्यक्ष चषक २०२१ या मर्यादित षटकांचे भव्य क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता ग्रामीण भागातून ३२ संघ सहभागी झाले होते. या सामन्यासाठी प्रथम पारितोषिक एक लाख रुपये रोख व चषक, व्दितीय ५० हजार रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकासाठी २५ हजार रुपये रोख व चषक तसेच मालिकावीर, उत्कृष्ट गोलदांज, मँन आँफ द मँच, यांच्या साठी आकर्षक बक्षीसांचे आयोजन करण्यात आले होते. 


गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या सामन्यातील रंगतदार लढत पाहण्यासाठी क्रिकेट शोकींनानी तोबा गर्दी केली होती. या सामन्याचा नुकताच समारोप झाला. यावेळी व्यासपीठावर ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक बाबाजी पाटील, आपलेशहर व शहरनामा या वृतसमूहाचे नरेश बाबुराव मुंडे, ग्रामीण क्रिकेट टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील, देसाई गाव अध्यक्ष बाळाराम अर्जुन म्हात्रे, रवींद्र म्हात्रे, आयोजित नितीन पाटील, राम पाटील, प्रवीण म्हात्रे, मोरेश्वर पाटील, जयेश, मंगेश पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.


या क्रिकेट सामान्यातील विजेते संघासाठी प्रथम व व्दितीय चषक आपले शहर व शहरनामा या वृतसमूहाचे नरेश बाबुराव मुंडे यांच्या मातोश्री कै. शैंवताबाई बाबुराव मुंडे यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले होते.


या तीन दिवस चाललेल्या सुरशीच्या सामन्यात प्रथम क्रमांक वाकळण, व्दितीय दातिवली तर तृतीय क्रमांक जय वाघेश्वर संघ देसाई गाव यांनी पटकावले, तसेच मालिका वीर ऋषी भोईर (बाईक विजेता) उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, नितीन पाटील (देसाई गाव) उत्कृष्ट फंलदाज जयेश पाटील (दातिवली गाव,) मँन आफ द मँच विजेते ठरले, या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, चषक देऊन गौरविण्यात आले.

ड्युटीवर नसतानाही परमबीर सिंग यांच्याकडून सरकारी गाडीचा वापर, गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश !!

ड्युटीवर नसतानाही परमबीर सिंग यांच्याकडून सरकारी गाडीचा वापर, गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश !!


भिवंडी, दिं,30, अरुण पाटील (कोपर) :
           मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग  यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला आणि एकच खळबळ उडाली. या प्रकरणावरुन राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला. याच दरम्यान परमबीर सिंग हे अचानक गायब झाले आणि अखेर 234 दिवसांनी ते मुंबईत परतले. मुंबईत परतले परमबीर सिंग हे ड्युटीवर अद्यापही हजर नाहीयेत आणि असे असतानाही ते सरकारी गाडीचाच वापर करत आहेत. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता त्यांनी यावर चौकशीचे आदेश दिल्याचं म्हटलं आहे. 
         दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं, परमबीर सिंग यांनी आपला पदभार स्वीकारलेला नाहीये. ज्या प्रकारे ते गाडीचा वापर करत आहेत ते चुकीचं आहे. ते कामावर नाहीत त्यांच्याबर गंभीर आरोप आहेत. तरीदेखील ते गाडी वापरत आहेत. सरकारी यंत्रणांचा वापर त्यांनी केला नाही पाहिजे. हे चुकीचं आहे चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी अद्याप आपला पदभार स्वीकारलेला नाही.
           कालची भेट अत्यंत चुकीची आहे. कोर्टच्या आदेशानंतर अशी भेट घेता येते मात्र अशी कुठलीही परवानगी नसताना ही भेट झाली आहे. परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्या भेटीची नक्कीच चौकशी करण्यात येईल. मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. परमबीर सिंग यांच्या आरोपांची शहानिशा आणि चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने सेवानिवृत्त न्यायाधीश के यू चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना केली आहे.
           या आयोगाने परमबीर यांना चौकशीसाठी अनेकदा समन्स बजावले होते. चांदिवाल आयोगाने समन्स बजावल्यानंतर परमबीर सिंग अचानक गायब झाले होते. ते अनेकदा समन्स बजावूनही चौकशीला हजर राहिले नव्हते. त्यामुळे या प्रकरणी मुंबईच्या किला कोर्टात झालेल्या सुनावणीत परमबीर यांना फरार घोषित करण्यात आले. तर दुसरीकडे परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामीनसाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर पुढील सुनावणी 6 डिसेंबरला होणार आहे. पण तोपर्यंत अटक न करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. 
         दरम्यान, परमबीर काल (29 नोव्हेंबर) चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी चांदीवाल आयोगाने त्यांचे जामीनपात्र वॉरंट रद्द केलं. तसेच मुख्यमंत्री सहायत्ता निधीत 15 हजार रुपये भरण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे चांदीवाल आयोग सुनावणीसाठी आज सचिन वाझे याची देखील नियमित तारीख होती. त्यामुळे परमबीर सिंग चांदीवाल आयोगाच्या समोर जाण्याआधी समन्स रुममध्ये त्यांची सचिन वाझेसोबत भेट झाली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
         उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आणि व्यापारी मन्सुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझे हा अटकेत आहे. या प्रकरणीच्या सुनावणीसाठी वाझेची आज नियमित तारीख होती. पण या दरम्यान परमबीर सिंग आणि वाझे यांच्यात भेट झाली. या भेटीवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. या भेटीवर अनिल देशमुख यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे.

कॉमरेड मनोहर टाकसाळ यांचे निधन.. "एक धगधगती मशाल विझली"

कॉमरेड मनोहर टाकसाळ यांचे निधन.. "एक धगधगती मशाल विझली"


जळगाव, बातमीदार : महाराष्ट्र भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे औरंगाबाद मधील येथे कॉम्रेड मनोहर एडवोकेट एडवोकेट स्वातंत्र सैनिक मनोहर टाकसाळ यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. आणि चळवळ पोरकी करून निघून गेलं ते कामगार कष्टकरी चळवळीचे धग धगती मशाल होते ते काल निघून गेल्याने त्यांचे ७० वर्षे चाललेले पक्ष कार्य कम्युनिस्ट चळवळीला प्रेरणा देत राहील.. 

त्यांचा परिचय कार्य असे :

त्यांचा जन्म राजुरा जिल्हा बीड येथे १९२ ९साली झाला. ते निर्व्यसनी, संपूर्ण सत्यवादी, जीवन जगले वकील झाले. पण विद्यार्थी दशेत स्वातंत्र्य चळवळीकडे ओढले गेले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद झाले ..  'कामरेड टाकसाळ' हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अनेक वर्षे सचिव मंडळ, राज्य कार्यकरणीचे सभासद, नॅशनल कौन्सिलचे सदस्य व तीन वर्षे राज्य सहसचिव होते. पक्षाचे पूर्ण वेळ ते कार्यकर्ते असताना १९८१ मध्ये त्यांची व माझी शेतमजूर युनियन औरंगाबाद बैठकीचे वेळी खोकड पुर्यात भेट झाली त्यावेळी सिटी बस मधून जात असता मला का टाकसाळ यांचे कडे जायचे आहे असे मी खोकडपूर्यचे तिकीट काढताना बोललो असता त्यावेळी एक उपस्थित प्रवासी बोलला अहो टाकसाळ तेच ना.! कामुनिस्ट पक्षाचे आदर्श ना? आणि ते खरोखर आदर्शच होते. असा मला पुढील ४० वर्षे अनुभव आला. पूर्ण वेळ कार्यकर्त्याचे कठोर जीवन त्यांनी अनुभवले असल्याने    कार्यकर्त्यांच्या आदी अडचणी वैचारिक कोंडमाराची पूर्ण जाणीव होती. तत्कालीन नेते कामरेड चंद्रगुप्त चौधरी, करुणा भाभी चौधरी, गोविंदभाई श्रॉफ, अथर बाबर का, स. ना. भालेराव आदी अनेक थोर नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून ते कष्टकर्यांसठी लढले. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचे १० वर्षे अध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे कैक वर्षे उपाध्यक्ष होते. चाळीसगाव येथे राज्य अधिवेशन घेण्याचा व ते यशस्वी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ते स्वतःवर व सर्व कार्यकर्ते व जनतेवर ही सुद्धा व्हिएतनामचे नेते हो ची मिन्ह यांच्या शिकवणूक प्रमाणेच प्रेम करीत. जळगाव जिल्ह्याचा मी भाकप सचिव झालो व आमचे नेते काम्रेड स ना भालेराव, व्ही बी मोरे, एकामागून एक निघून गेले. हाती पैसा नाही आणि जिल्हा पक्षाचा प्रमुख झालो अशा वेळी का. मनोहर टाकसाळ यांच्या मार्गदर्शनानेच आम्ही पक्ष सावरला. २००३ साली चोपड्यातील १००८ कुंडी यज्ञातील गावठी तूप व इतर जिन्नसची उधळपट्टी भोंदूगिरी त्यासाठी आम्ही जेव्हा आंदोलन केले त्यावेळी का. टाकसाळ यांनी चोपड्यात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मोठी सभा घेतली पोलिसांनी सभा ठिकाणीच अटक केली. त्यावेळी पोलीस स्टेशन समोरच का.  टाकसाळ यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली व त्यावेळी सोबत का नामदेवराव चव्हाण ही होते व १००८ कुंडी यज्ञ मध्ये चाललेल्या भोंदूगिरी विरुध्द लढ्यात सक्रिय पाठिंबा आंदोलन द्वारे उत्तर देणारे खऱ्या अर्थाने का. टाकसाळ यांनी नेतेपदाची जबाबदारी पार पाडली. त्यावेळी महाराष्ट्रातील व देशातील ख्यातनाम दैनिक लोकमत व गावकरीने चांगली साथ दिली व मला भावी काळात शोषणाविरुद्ध लढण्याचे बळ त्यांनी दिले. अमळनेरला त्यांच्या मार्गदर्शन खालील जिल्हा शेतमजुर संघटना पुनर्रचना बैठक आम्हास शेतमजूर युनियन बांधण्यासाठी बळ देऊन गेली. जिल्हा कमिटीला येताना पक्ष वांगमय आणणे व विकणे हा त्यांचा आवडता छंद ! पुस्तक विक्रीला प्रतिसाद मिळू वा न मिळो पण पुस्तकांचे ओझे वाहण्यात त्यांनी कधी कंटाळा केला नाही. कमीपणा मानला नाही. उमर्टी येथे २००८ साली आदीवासी मेळावात त्यांनी अतिशय स्फूर्तिदायक मार्गदर्शन केले. कार्यकर्त्याना पाठीवर कौतुकाची थाप मारतांना तितक्याच परखडपणे दोषही त्यांच्या नजरेत आणून देत. महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे निवडणूका ही वकिली व्यवसायातील सिद्धांत कम्युनिस्ट विचारांवर वर 
लढले. त्यावेळी जळगाव जिल्ह्यात अनेक न्यायालयात मला त्यांचा प्रचाराची संधी मिळाली जिल्हाने काढलेले दोनपानी डिजिटल प्रचार पत्र त्यांना भावले होते. जळगाव जिल्यातील अनेक वकिलांशी त्यांची ओळख होती. चोपडा तालुक्यातील एक पोलिस पाटील निलंबित झाले त्यांना केलेले मार्गदर्शन ते आजवर विसरू शकले नाहीत. म. गांधीजी ने प्रमाने ते सत्यवादी व पीडित जनतेचे वकील होते का टाकसाळ यांचे निधन झालेने निर्माण झालेली पोकळी त्यांचे चिरंजीव का. अभय टाकसाळ व सहकारी निश्चितच भरून काढतील अशी खात्री आहे. 

*रोज बेमौत मरा करते है मरणे वाले मरकर भी नहीं मरते मेहनत कशोके लिये लढणे वाले*

कामरेड टाकसाळ यांना जळगाव जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षा चा अखेरचा लाल सलाम!! 

*अमृत महाजन, राज्य सहसचिव लाल बावटा शेतमजूर युनियन  चोपडा जि जळगाव ९८६०५२०५६०*

राज्य अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा !! "2 ते 4 डिसेंबर दरम्यान पालघर येथे रंगणार"

राज्य अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा !! "2 ते 4 डिसेंबर दरम्यान पालघर येथे रंगणार"


ठाणे, बातमीदार -  तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि पालघर जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ३३वी वरिष्ठ गटाची तायक्वांदो स्पर्धा आणि १३वी पुमसे स्पर्धा २ ते ४ डिसेंबर दरम्यान  पालघर येथे आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेसाठी 28 जिल्ह्यातील 550 खेळाडू आपला कस अजमावणार आहेत,  कोरोना या जागतिक महामारी नंतर संपन्न होणारी ही पहिलीच स्पर्धा असल्यामुळे खेळाडूंमध्ये जोश निर्माण झाला आहे तसेच नामदेव शिरगावकर यांनी तायक्वांदो संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर होत असलेल्या ही पहिली स्पर्धा आहे.


स्पर्धेच्या उद्घाटनासाठी राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार, विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नानाभाऊ पटोले, विरारचे आमदार क्षितीज ठाकूर व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कोरोना महामारीमुळे जवळपास दोन वर्षांनंतर स्पर्धा होत असल्यामुळे आयोजनात काही उणिवा राहू नयेत म्हणून श्री भास्कर करकेरा, अनिल झोडगे, मिलिंद पठारे, विरसिंह देवारिया, प्रवीण बोरसे ,अविनाश बारगजे, गफार पठाण, वेंकटेश कररा, सुभाष पाटील, दुळीचंद मेश्राम व आयोजक राजा मकवाणा आणि इतर पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत असे तायक्वांदो असॉशिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव संदीप ओंबासे यांनी सांगितले.


*प्रतिक्रिया - 1*
तायक्वांदो या ऑलिंपिक खेळात मध्ये प्रगती करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असून कोरोणा काळानंतर होणारी पहिलीच स्पर्धा असल्यामुळे  शासनाची सर्व कोरोना  नियमावली पाळून आम्ही या पहिल्या स्पर्धेचे आयोजन केले असून.. आम्ही स्पर्धा नक्कीच यशस्वीरित्या संपन्न करू असा मला विश्वास आहे. - "नामदेव शिरगावकर, अध्यक्ष, तायक्वांदो
असोसिएशन ऑफ महाराष्ट्र"

*प्रतिक्रिया - 2*
राज्यातील तायक्वांदो हायटेक करण्यासाठी आम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धाही ऑलिम्पिक च्या नियमानुसार व पद्धतीनेच आम्ही तायक्वांदो स्पर्धा घेणार असून यामध्ये आम्ही कोणतीही कसूर मागे सोडणार नाही. - "संदीप ओंबासे, महासचिव, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र"

कल्याण तालुक्यातील अनेक शिक्षकांचे लसीकरण नाही, इतर सोईसुविधांची वाणवा, ओमिक्रोनला रोखणार कसे ?

कल्याण तालुक्यातील अनेक शिक्षकांचे लसीकरण नाही, इतर सोईसुविधांची वाणवा, ओमिक्रोनला रोखणार कसे ?


कल्याण, (संजय कांबळे) : राज्यातील सर्व शाळा उद्या म्हणजे १ डिसेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. याला आरोग्य विभागाने ग्रीन सिग्नल देतांना नव्या व्हेरिएंट विरोधात लढण्यासाठी काही उपाय व काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु जिल्ह्यासह कल्याण तालुक्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे दोन्ही डोस पुर्ण झाले नाहीत, शिवाय इतर जी काळजी घेण्या सांगितले आहे. त्याच्या मध्ये अनेक अडचणी येत असल्याने जगावर घोंगावणारे 'ओमिक्रोन'चे संकट कसे रोखणार? मुलांना शाळेत पाठवायचे की नाही? असे प्रश्न पालकापुढे पडले आहेत.


आधीच कोरोनाच्या महामारी संकटामुळे गेल्या एक दिड वर्षांपासून शाळा बंद आहेत, विद्यार्थी, पालक व शिक्षक वैतागून गेले आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी व्हँक्शीनेशन अंत्यत महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने शासन प्रयत्न ही करत आहे, १८ पासून पुढे वेगवेगळ्या वयोगटाचे लसीकरण सुरू आहे. मात्र लहान मुलांचे अद्यापही लसीकरण सुरू नाही. अशातच तिसऱ्या लाटेचा या मुलांना अधिक फटका बसेल अशी शंका व्यक्त केली जात होती. सुदैवाने तसे झाले नाही.


परंतु आता शासनाने इयत्ता १ ली ते पुढचे वर्ग / शाळा करण्याचा निर्णय घेतला. आणि अशातच दक्षिण आफ्रिकेतून'ओमिक्रोन' हा नवा कोरोनाचा व्हेरिएंट आल्याचे वृत्त सर्वत्र पसरले, हा अधिक घातक असून यावर दोन्ही डोस देखील प्रभावी ठरत नाही असे समोर आल्याने जगाची चिंता वाढली. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून सुमारे १ हजार लोक मुंबई आल्याचे, त्यातील काही ठाणे, डोंबिवली आल्याचं कळल्यावर अधिक टेन्शन वाढले, हे कमी की काय म्हणून खडवली येथील आश्रमात जवळपास ६९ लोक ही कोरोना पाँझिटिव्ह आल्याने चिंता अधिकच वाढली,


आणि अशा परिस्थितीत शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय घेताना, मुलांना एका बेंचवर एकच, दोघामधील अंतर ६ फुट, शिक्षकांचे दोन्ही डोस पुर्ण असावेत, शाळेची शौचालय दिवसातून ५ वेळा, सँनिटायझर करावी, हात धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी ,अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु ठाणे जिल्ह्याची परिस्थिती पाहता मोठी अवघड स्थिती निर्माण झाली आहे.


कल्याण तालुक्यात १२० च्या आसपास जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, यामध्ये ३५२ शिक्षक आहेत, यातील केवळ ३०६, शिक्षकांचे दोन्ही डोस पुर्ण झाले आहेत, ३८ शिक्षकांनी एकच डोस घेतलेला आहे, तर ८ शिक्षकांनी एकही डोस घेतलेला नाही, इतर सोईसुविधांचा विचार केला तर अनेक शाळामध्ये पाणी नाही, शौचालय नादुरुस्त झाली आहेत, सर्व शिक्षा अभियानातून खोदलेल्या १०/१२ बोअरवेल नादुरुस्त/बंद आहेत असे पाणी पुरवठा कर्मचारी यांचे म्हणणे आहे, तालुक्यातील सर्व शिक्षा अभियानाचे केंद्रच विविध प्रकारच्या सोईसुविधांच्या मुळे 'बेवारस' झाले आहे. त्यांची पाटी सध्या तरी कोरीच आहे, शिवाय अनेक गावात पाणी प्यायला मिळत नाही तर शाळेचे काय?गावातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था तर फारच बिकट झाली आहे. काही ठिकाणी नळ आहे, पाणी नाही, शौचालय आहे, दारे खिडक्या नाहीत, मैदान आहे, स्वच्छता नाही, गेल्या दिड वर्षांपासून शाळेकडे ढुंकूनही न पाहिल्याने शाळांची वाईट अवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या विविध नियमांची कशी अमंलबजावणी होणार?

हे फक्त कल्याण तालुक्यात आहे असे मुळीच नाही शेजारच्या, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर व भिवंडी तालुक्यात फारशी वेगळी स्थिती नाही, मुरबाड तालुक्यातील एकूण ४०५ शाळा आहेत, यामध्ये जिपच्या ३२९ शाळा व ८१५ शिक्षक आहेत, यांचेही शंभर टक्के लसीकरण झाले नाही, ९ शिक्षकांनी एकही डोस घेतला नाही. त्यामुळे जगावर येवू घातलेले "ओमिक्रोन"चे संकट कसे रोखणार? शासनाचा शाळाु सुरू करण्याचा निर्णय कोणाच्या माथ्यावर व कोणाच्या पथ्यावर पडेल, हे येणारा काळच ठरवेल! पण पालक म्हणून आपण आपल्या पाल्यांची काळजी घेऊन, शासनाच्या नियमांचे/ सूचनांचे पालन करून कोरोना प्रमाणे यालाही गाडायला हवे.

प्रतिक्रिया :

तालुक्यातील सर्व शिक्षकांना सूचना दिलेल्या आहेत, विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे- सुनीता मोटघरे, (गटशिक्षणाधिकारी, कल्याण पं.स.)

*जिल्ह्यातील झेडपी शाळांची खूपच वाईट परिस्थिती आहे, अनेक शाळांमध्ये शौचालय, पाणी, आदी सुविधा नाहीत- ॲड. मनोज सुरोशे, कल्याण.

Monday 29 November 2021

सह्याद्री कुणबी संघ, पुणे शहर आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सह्याद्री कुणबी संघ, पुणे शहर आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !


मुंबई - (  दिपक कारकर )

"रक्तदान" म्हणजे सर्वश्रेष्ठ दान होय. आजच्या घडीला रक्तदान काळाची गरजच आहे. एकाने रक्तदान केल्यास त्यातून चौघांना जीवदान मिळते. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या असंख्य घटना कानी येतात. रक्तदान काळाची गरज आहे, ही जनजागृती करत व पुणे शहरातील कमी होत चाललेला रक्तपुरवठा या कर्तव्यपर सामाजिक भावनेतून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून  प्रतिवर्षी प्रमाणे पुणे शहरात भव्य रक्तदान शिबिर याग आयोजित करणाऱ्या सह्याद्री कुणबी संघ,पुणे शहर ( महाराष्ट्र ) उपरोक्त संस्थेचा "रक्तदान शिबिर" कार्यक्रम नुकताच रविवार दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी म.न.पा. शाळा जनता वसाहत, पर्वती पायथा गल्ली क्र. ४७/४८ येथे पार पडला. या रक्तदान शिबिराला एकूण ७३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना भेटवस्तू देऊन संस्थेतर्फे सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मोलाचं सहकार्य सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन ब्लड बँक यांचे लाभले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सह्याद्री कुणबी संघाचे सर्व पदाधिकारी/कार्यकर्ते व महिला आघाडी यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे पुणे शहर चिटणीस संतोष रामाणे यांनी केले.

Sunday 28 November 2021

चित्रकला स्पर्धा च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळणार वाव !! ऑनलाइन चित्रकला स्पर्धा च्या उद्घाटन 'प्रसंगी आमदार राजू मामा भोळे' आणि 'आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील' यांचे प्रतिपादन...

चित्रकला स्पर्धा च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळणार वाव !!

ऑनलाइन चित्रकला स्पर्धा च्या उद्घाटन 'प्रसंगी आमदार राजू मामा भोळे' आणि 'आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील' यांचे प्रतिपादन...


जळगाव - चित्रकला स्पर्धा च्या माध्यमातून विद्यार्धी यांच्या कलागुणांना मोठी वाव मिळेल. त्यामुळे या स्पर्धेतून चांगले चित्रकार समोर यावे. त्यांच्यासाठी ही स्पर्धा एक चांगले व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन आमदार राजू मामा भोळे यांनी केले.


एक्सेलंट ड्रॉइंग फाउंडेशन व श्री राजपूत करणी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धा च्या शुभारंभ प्रसंगी आमदार राजू मामा भोळे बोलत होते. हा ऑनलाइन सोहळा प्रभात चौकातील महाराणा प्रतापसिंह महाराज यांच्या पुतळ्याजवळ झाला. 


या स्पर्धेची माहिती एक्से लंट ड्रॉइंग फाउंडेशनचे संचालक सतीश चौधरी यांनी दिली. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक आरोग्यम् धनसंपदा  फाउंडेशनचे संचालक जितेंद्र पाटील, श्री राजपूत करणी सेनेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हाध्यक्ष विठ्ठल सिंग मोरे, जिल्हा उपाध्यक्ष आशिष सिंग हाडा, मंडळ अधिकारी योगेश्वर ननावरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी केले.


सूत्रसंचालन श्री राजपूत करणी सेनेचे खानदेश विभागीय कार्याध्यक्ष विलास सिंग पाटील यांनी केले. या वेळी शेतकरी संघटनेचे चोपडा तालुकाध्यक्ष भरत देशमुख, नाजनिन शेख आदी उपस्थित होते.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवाळी संपूनही भाऊबीज भेटेना !! महिला कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष..!! "आय टक तर्फे उपोषणाचा इशारा"

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवाळी संपूनही भाऊबीज भेटेना !!  महिला कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष..!! "आय टक तर्फे उपोषणाचा इशारा" 


चोपडा, जळगाव, बातमीदार.. महाराष्ट्र राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना यावर्षी सालाबाद प्रमाणे दिपवाळीला दोन हजार रुपये भाऊबीज जाहीर केली व याप्रमाणे जळगाव जिल्हा परिषद व इतर जिल्हा परिषद यांना रखमा पाठवलेले आहे परंतु जळगाव जिल्हा परिषदेमार्फत अद्याप पावेतो जिल्ह्यातील चोपडा, जामनेर, धरणगाव ,यावल आदी तालुक्यांना अंगणवाडी सेविकांना मदतनिसांना भाऊबीज दिवाळी संपून वीस-बावीस दिवस झालेत तरीपण दिलेली नाही. राज्य सरकारने पैसे दिलेले असताना जळगाव जिल्हा परिषदेने महिला कर्मचारीना दिवाळी संपून २०/२५ दिवस झाले. पण अद्याप पावेतो भाऊबीजेचे रकमेपासून वंचित ठेवायचे कारण काय? याबाबत या महिला कर्मचाऱ्यंना मध्ये असंतोष पसरला आहे .अंगणवाडी  कर्मचाऱ्यांना दोन दिवसाच्या आत न दिल्यास जळगाव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन जळगाव जिल्हा परिषदेसमोर कर्मचाऱ्यांचे लाक्षणिक उपोषण आंदोलन करणार आहे. असा इशारा जळगाव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आय टक तर्फे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन, प्रेमलता पाटील, ममता महाजन, सुमित्रा बोरसे, अनिता बोरसे, उषा कोळी, फरिन, शारदा पाटील, नंदा वाणी ,वत्सला पाटील, गूप्त्यारी तडवी, अश्विनी देशमुख यांनी दिला आहे.

शेरे गावातील व्दारकाबाई पंडित या वयोवृद्ध आजीच्या घराला व शौचालयाला समृद्धीच्या ब्लास्टिंगचा जबर फटका !!

शेरे गावातील व्दारकाबाई पंडित या वयोवृद्ध आजीच्या घराला व शौचालयाला समृद्धीच्या ब्लास्टिंगचा जबर फटका !!


कल्याण, (संजय कांबळे) : शहापूर तालुक्यातील शेरे (बौध्दवाडा) येथील वयोवृद्ध आजी व्दारकाबाई मंगल पंडित हिच्या घर व शौचालयास मुंबई नागपूर या समृद्धी महामार्गासाठी केल्या जाणाऱ्या ब्लास्टिंगचा जबर फटका बसला असून राहत्या घरास तसेच शौचालयास पुर्णपणे तडा गेला आहे, ते कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे म्हातारपणी या आजीला 'बेघर, होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुंबई नागपूर हा महत्त्वकांक्षी महामार्ग सुरू झाला. १० जिल्हे, ३० तालुके आणि ३५४ गावातून हा महामार्ग जात असून ७१० किलोमीटर लांब व १२० मीटर रुंद अशा या महामार्गात शेकडो गावे बाधित झाली आहेत. शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी यामध्ये बाधित होत आहेत. यातील काही ना नुकसानभरपाई मिळाली आहे तर अद्यापही काही प्रतिक्षेत आहेत. कल्याण तालुक्यातील शेतकरी नेते चंद्रकांत भोईर यांनी या विरोधात मोठे अंदोलन उभे केले होते, आता असेच अंदोलन शहापूर तालुक्यात होते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


हा महामार्ग शहापूर तालुक्यातूनही जात आहे, सध्या याचे काम शेरे गावानजीक सुरू आहे, गावाच्या बाजूला मोठमोठे डोंगर असल्याने व हा मार्ग याच्यातून जात असल्याने ते ब्लास्टिंगच्या सहाय्याने फोडले जात आहे, परंतु या ब्लास्टिंगमुळे शेरे गावातील आदीवासी वाडी व बौध्दवाडा येथील लोकांच्या घरांना जबरदस्त हादरे बसत आहेत, बौध्दवाडी तील व्दारकाबाई मंगल पंडित वय ७० वर्षे या वयोवृद्ध आजच्या घराला तसेच शौचालयाला मोठमोठे तडे गेले आहेत, शौचालय तर जमीनीतून उखडलेले आहे, या आजीच्या लहान ३ नाती एक सून असून मुलगा मोलमजुरी करुन कसेबसे पोट भरत आहेत, व्दारकाबाई पंडित या दारिद्र्य रेषेखालील असून त्यांना घरकुल योजनेतून घर व शौचालय बांधून मिळाले आहे. ब्लास्टिंगचा दणका इतका मोठा आहे की शौचालय कधीही कोसळू शकते, या भितीमुळे हे कुंटूब शौचालयात जायला घाबरत आहे.


अशीच परिस्थिती आदिवासी वाडी व बौद्धवाड्यातील इतर लोकांच्या घराची व शौचालयाची झाली आहे, येथील बाधित ग्रामस्थांनी शहापूर तहसीलदार यांच्या कडे लेखी तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात वयोवृद्ध आजी व्दारकाबाई पंडित यांना विचारले असता त्या म्हणाल्या, आधीच माझी शेतजमीन या महामार्गात जात आहे, त्याची अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही, तोच आता घर व शौचालय कोसळण्याची भिती वाटत आहे. असे झाले तर माझ्यासह माझा मुलगा, सुन व नातवंडे बेघर होणार आहे, त्यामुळे वेळीच नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली तर महामार्गाचे काम पुर्ण झाल्यावर सर्वांनी नुकसान भरपाई मिळेल असे समृद्धी महामार्गाच्या अधिका-यांनी सांगितले.

Saturday 27 November 2021

कल्याण येथील आगार व्यवस्थापक विजय गायकवाड यांची एसटी बसेसवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात दिली प्रतिक्रिया !!

कल्याण येथील आगार व्यवस्थापक विजय गायकवाड यांची एसटी बसेसवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात दिली प्रतिक्रिया !!


कल्याण, बातमीदार : एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेत कामावर रुजू होण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले होते. महामंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील काही आगारांमधील एसटी वाहतूक सुरू झाली आहे.

तर, दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव आगाराच्या तीन एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत एसटी बस चालक जखमी झाला आहे. या दगडफेकीच्या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राज्यातील काही आगारांमध्ये पुन्हा एकदा एसटी धावण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण या आगारामध्ये वाहतूक सुरू झाली आहे.


कल्याण येथील आगार व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी राज्यात एसटी बसेसवर झालेल्या हल्ल्या संदर्भात दिलेली अतिशय संवेदनशील प्रतिक्रिया :-

असे कृत्य करणारे महणजे स्वतःच्या आईवर बलात्कार करणारे नराधम !

ज्या एसटीला हे कर्मचारी आपली मायमाऊली , अन्नदाती समजतात, तीच्यावरच दगड उचलताना जराही खाल्या मिठाची जाणीव का झाली नाही? एसटी टीकावी म्हणून एकिकडे विलीनीकरणासाठी गळे काढायचे, अन् ज्या एसटीच्या जीवावर आत्ता पर्यंत जगलो तीचाच विध्वंस करायचा ही कसली संवेदना ? ही कसली माणूसकी ?

ही कसली वृत्ती ही तर विकृती आहे. आंदोलनं, संप ही लोकशाहीने, भारतीय संविधानाने दिलेली लढण्याची शक्ती आणि शस्त्र आहे. त्याचा वापर संविधानीक पध्दतीनेच झाला पाहिजे. कायदा हातात घेवून, मारझोड, तोडफोड तेही आपल्याच मालमत्तेचा विध्वंस करुन काय साध्य करायचे आहे ? ज्यांना संपक-यांची भूमिका मान्य असेल ते संपात राहतील, ज्यांना मान्य होणार नाही ते कामावर परततील, म्हणून जर कोणी, आपल्या लालपरीवर, आपल्या अन्नदात्रीवर दगड उचलणार असतील तर हा निच विकृतपणाच म्हणावा लागेल. हे नराधम आहेत जे आपल्याच मातेवर बलात्कार करु पाहणारे त्यांना दुसरे नावच नाही.

अनेक ठिकाणी मा. परिवहनमंत्री अनिल परब साहेब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो कर्मचारी जवळपास महीना भरापासून सूरु असलेल्या संपातून माघार घेत कामावर रुजू होत आहेत, प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होत आहेत. तर त्यांना रोखण्यासाठी संपकरी जर लालपरीवरच दगड मारणार असतील तर सरकारने या संपकरी कर्मचा-यांच्या प्रत्येक डेपोतील म्होरक्यांना थेट स्थानबद्ध केले पाहिजे.

जनतेच्या सहनशीलतेचा अंत संपक-यांनी पाहू नये. अनेक ठिकाणी एसटी बसेस फोडल्याच्या बातम्या येत आहेत, आज कल्याण आगाराची बस कल्याण भिवंडी या मार्गावर प्रवाशांसह धावत असताना त्याच डेपोतील एका चालकाने पुढची व मागची काच दगड मारुन फोडली, सुदैवाने कोणा प्रवाशांना‌ ईजा झाली नाही पण मालमत्तेचे नुकसान झाले. त्या विकृत चालकावर व त्याच्या सहका-यांना कडक शासन झाले पाहिजे. आज त्याच्या एकट्यावर गुन्हा नोंद होवून भागणार नाही , त्याचे सहकारी व त्या मागचा विकृत मेंदू कोणाचा हे सुध्दा शोधून पोलिसांनी कारवाई करायला हवी.

संपक-या कर्मचाऱ्यांना आम्ही एसटी प्रेमी कर्मचारी व अधिकारी या द्वारे इशारा देत आहोत, "याद राखा , लाल परीला साधा ओरखडा जरी काढाल तर ....." विचारांचा लढा, विचारांनी लढा, अविचाराने स्वत: बरोबर इतरांचा विध्वंस करु नका. या महाराष्ट्राला थोर विचारांची परंपरा आहे. त्या महाराष्ट्रात प्रवाशी जनता जी एसटी वर जीवापाड प्रेम करते ती जनता असला अधमपणा सहन करणार नाही. जनता डोक्यावर घेते सुध्दा, अन् तीच जनता डोक्यावरुन आपटते सुध्दा. तूर्तास इतकेच.
विजय गायकवाड, आगार व्यवस्थापक, कल्याण आगार.

विजय गायकवाड :- 99226 39950

कोविड नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्ती व संस्थांना होणार दंड !! *सार्वजनिक कार्यक्रम व प्रवासाबाबत राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे जारी*

कोविड नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्ती व संस्थांना होणार दंड !! *सार्वजनिक कार्यक्रम व प्रवासाबाबत राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे जारी* 


        मुंबई,दि.२७ :- राज्यात कोविड १९ या आजाराचे रूग्ण कमी झाल्यामुळे राज्य शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथिल केले आहेत. राज्य शासन तसेच केंद्र शासनाकडून वेळोवळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सेवा देणारे, मालक, परवानाधारक तसेच आयोजक यासह सर्व सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी अभ्यागत यांनी  करावयाचे आहे. आज जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्वात संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता, कार्यक्रमावरील निर्बंधाची व्याख्या, कोविड अनुरूप वर्तन, स्थानिक प्रशासनाचे अधिकार, कोविड वर्तणूकविषयक नियम व दंड याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

           *संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता :* 

        तिकोट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमाच्या समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा देणारे व सहभागी होणाऱ्या व्यक्ती (जसे की, खेळाडू, अभिनेते इत्यादी) अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांनी संपूर्ण लसीकरण केलेले असावे,कोणतेही दुकान,आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन (मेळावे) इत्यादी ठिकाणी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल.

         राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास (https://epassmsdma.mahait.org किंवा telegram-MahaGovUniversalPass Bot) हा संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल. अन्यथा, छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले 'कोविन प्रमाणपत्र देखील' त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल. १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकोय कारणांमुळे ज्या व्यक्ती लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय व्यावसायिकांकडून प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल. जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीसाठी त्या खुल्या असण्याची शर्त नसली तरी, त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे.

            *महाराष्ट्र राज्यात प्रवास* 

        महाराष्ट्र राज्यात प्रवास करताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्थानावरून राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्वे त्यांना लागू राहतील. राज्यात येणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे एकतर यात यापुढे व्याख्या केल्यानुसार संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा ७२ तासांसाठी वैध असलेली आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

 **कोणताही कार्यक्रम, समारंभामधील उपस्थितीवरील निर्बंध* 

            कोणताही कार्यक्रम, समारंभ इत्यादींमधील उपस्थितीवरील निर्बंधामध्ये चित्रपट गृह, नाट्यगृह, मंगलकार्यालय सभागृह, बंदिस्त बंद जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या अथवा समारंभाच्या उपक्रमाच्या बाबतीत, जागेच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संपूर्ण संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता,औपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल तर (स्टेडियम प्रमाणे) संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास अशो क्षमता ठरवण्याचा अधिकार असेल.

         कोणत्याही संमेलनासाठी मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या १ हजारांपेक्षा अधिक असेल तर अशा बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागेल आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अशा कोणत्याही संमेलनाचे, मेळाव्याचे निरीक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठवील आणि तेथे  स्थानिक प्रशासन काटेकोरपणे अनुपालन केले जात असल्याची खात्री करतील. कोविड अनुरूप वर्तनाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले तर स्थानिक प्रशासनाला सदर कार्यक्रम पूर्णतः किंवा अंशत: बंद करण्याचे अधिकार आहेत.

 *जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांचे अधिकार* 

           कोणत्याही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास जर योग्य वाटल्यास कोणत्याही क्षणी, त्यांच्या संबंधित अधिकारक्षेत्रासाठी यात नमूद केलेले निर्बंध व शर्ती वाढविता येतील. परंतु कमी करता येऊ शकणार नाहीत, मात्र जाहीर नोटोसीद्वारे ४८ तासांची पूर्व सूचना दिल्याशिवाय तसे करता येणार नाही. या आदेशाच्या दिनांकास, अंमलात असलेले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लादलेले कोणतेही निर्बंध जर ते पुढे चालू ठेवण्यासाठी जाहीर नोटीस देऊन पुन्हा जारी केले नसतील तर ते ४८ तासांनंतर अंमलात असल्याचे बंद होतील.

          *संपूर्ण लसीकरणाची व्याख्या :* 

           संपूर्ण लसीकरणाची व्याख्या पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे.लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर १४ दिवस झालेले आहेत अशी कोणतीही व्यक्ती असा आहे. ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्ती  असा आहे. किंवा कोणतीही १८ वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्तो, असा आहे..

        *कोविड अनुरूप वर्तनविषयक नियम* 

        कोविड अनुरूप वर्तनविषयक नियम पुढीलप्रमाणे आहेत. कोविड १९ विषाणूचा प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यामुळे त्याच्या प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व संस्थेने पालन करण्याची गरज असलेले दैनदिन सामान्य वर्तन अशी कोविड अनुरूप वर्तन (CAB) या संज्ञेची व्याख्या करता येऊ शकेल. कोविड अनुरूप वर्तनाचे प्रत्येकाने सदैव पालन केले पाहिजे, सर्व संस्थांनी त्यांचे सर्व कर्मचारी, त्यांच्या परिसरांत भेट देणारे अभ्यागत, ग्राहक किंवा संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी होणारी कोणीतीही व्यक्ती, त्याचे पालन करतील आणि त्यांच्या परिसरांमध्ये किंवा व्यवसायाशी संबंधित व्यवहार करताना किंवा कार्य करताना त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता संस्था  जबाबदार असतील. सर्व कर्मचान्यांनी कांविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझर, साबण व पाणी, तापमापक, इत्यादी गोष्टी उपलब्ध करण्यासाठी देखील जबाबदार आहेत.

       नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे. (रुमालाला, मास्क समजले जाणार नाही आणि रूमाल वापरणारी व्यक्ती, दंडास पात्र असेल.) जेथे जेथे शक्य असेल तेथे, नेहमी सामाजिक अंतर (६ फूट अंतर) राखा. साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात स्वच्छ धुवा. साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता, नाक/डोळे/तोंड यांना स्पर्श करणे टाळा. योग्य श्वसन स्वच्छता(आरोग्य) राखा.,पृष्ठभाग निर्वामितपणे आणि बाई सर स्वच्छ व निर्जंतुक करा. खोकताना किंवा शिकताना, टिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाक झाका आणि वापरलेले टिश्यू पेपर नष्ट करा. जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल तर, त्याने स्वतःचा हात नव्हे तर, हाताचा वाकवलेला कोपरा नाका तोडांवर ठेवून खोकावे व शिकावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर (६ फूट अंतर) राखा कोणालाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार अथवा अभिवादन करा. कोविड-१९ विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक असलेले अन्य कोणतेही

 *कोविड अनुरूप वर्तनविषयक नियमांचे पालन न करणा-या व्यक्ती व संस्थांना दंड :* 

           कोविड नियमांचे पालन न करणा-या व्यक्ती तसेच संस्था, आस्थापना या  दंडास पात्र असतील. कोविड़ अनुरूप वर्तनाचे पालन न करणान्या कोणत्याही व्यक्तीला असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी रुपये ५००/- इतका दंड करण्यात येईल.

           ज्यांनी आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादीवर कोविड अनुरूप वर्तन ठेवणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही जागेत किंवा परिसरात जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्या व्यतिरिक्त, अशा संस्थाना किया आस्थापनांना सुद्धा रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल.

          जर कोणतीही संस्था किंचा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक, इत्यादीमध्ये कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड १९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

         जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वतःच कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यात कसूर केली तर ती प्रत्येक प्रसंगी रूपये ५०,०००/- इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

        जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोबिड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना, रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल,

        तसेच सेवा पुरविणारे चाहनचालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीस, कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल.

          वारंवार कसूर केल्यास एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.

         कोविड अनुरूप वर्तणुकी संबंधीच्या वर नमूद केलेल्या नियमांचे, अनिवार्यपणे पालन करण्यात येईल आणि त्यांचे उल्लंघन केल्यास वर नमूद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे उल्लंघन करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी कोविड वर्तणूकीसंदर्भातील मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केलेल्या आहेत.                                                                       ******

काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बी.एम.संदीप यांच्या उपस्थितीत जनजागरण अभियानाचा समारोप !!

काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बी.एम.संदीप यांच्या उपस्थितीत जनजागरण अभियानाचा समारोप !!


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) :
शुक्रवार, दि.२६ नोव्हेंबर २०२१ रोजी संविधान दिनाचे औचित्य साधुन मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जनजागरण अभियान अंतर्गत मुरबाड शहरांमध्ये पदयात्रा आणि काँग्रेसभवन येथे जनजागरण मेळाव्याचे आयोजन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव बी.एम. संदीप यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कानडे, माजी खासदार सुरेश टावरे, जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, जेष्ठ नेते अनंतराव घोलप, तुकाराम ठाकरे, आत्माराम सासे, नरेश मोरे आदींच्या उपस्थितीत व तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात आयोजन करण्यात आले होते. 


खोटे स्वप्न दाखवुन सत्तेत आलेले मोदी सरकारने पेट्रोल डिसेलची भाववाढ करुन अतिरिक्त ३० लाख करोड रुपये मागील वर्षात जमा केले असुन निवडणुकांसाठी फंड जमा करत असल्याचे आरोप चेतनसिंह पवार यांनी केले. जनजागरण अभियानात नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, पदाधिकारी जिल्हाउपाध्यक्ष ॲड.अशोक फनाडे, जिल्हाउपाध्यक्ष परशुराम भोईर, जिल्हासरचिटणीस पुंडलिक चहाड, जिल्हाउपाध्यक्ष संजय शेलार, जिल्हाचिटणीस प्रमोद मडके, जिल्हाचिटणीस उमेश चौधरी आदींचा सत्कार सन्मानपत्र व शाल देवुन करण्यात आला. 


सत्काराला उत्तर देत असताना जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी मुरबाड तालुका कमिटीचे आभार व्यक्त केले तसेच आचारसंहिता जाहीर झालेल्या मुरबाड नगरपंचायतीमध्ये सर्व १७ ठिकाणी इच्छुक उमेदवार असुन योग्य उमेदवार निवडुन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे मत व्यक्त केले. सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवक काँग्रेसचे धनाजी बांगर, महिला काँग्रेसच्या संध्या कदम, तालुका मुख्यसमन्वयक गुरूनाथ पष्टे, विचारमंचचे तालुकाध्यक्ष अनिल चिराटे, शहरअध्यक्ष योगेश गुजर, तालुका उपाध्यक्ष नेताजी लाटे, शुभांगी भराडे, तानाजी पष्टे, भगवान तारमळे, अमोल चोरघे, हरिश्चंद्र पष्टे, दिपक आलम, हरिश्चंद्र झुंझारराव आदींनी मेहनत घेतली. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजाराम घोलप व मनसेचे शेकडो कार्यकर्तेनीं प्रवेश केला. मागील वेळेस मुरबाड मध्ये आलो होते त्यावेळेपेक्षा काँग्रेसची पक्षसंघटना उच्चशिक्षित नेतृत्व असलेल्या श्री.पवार यांच्यावर विश्वास ठेवुन वाढल्याचे मत राष्ट्रीय सचिव बी.एम. संदीप यांनी व्यक्त केले.


सौ. पल्लवीताई कुणाल सरमळकर नवराष्ट्रतर्फे महिला पुरस्कार-२०२१ ने सन्मानित !!

सौ. पल्लवीताई कुणाल सरमळकर नवराष्ट्रतर्फे महिला पुरस्कार-२०२१ ने सन्मानित !!


मुंबई, (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) :
                 मुंबईसह पश्चिम उपनगर मध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यां मान. सौ.पल्लवीताई कुणाल सरमळकर यांच्या जन्मदिवसाच्या दिनी पल्लवीताई सरमळकर यांना "महिला पुरस्कार" मुंबई शहर पालकमंत्री श्री. अस्लम शेख तसेच काँग्रेस मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री. भाई जगताप यांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. वाढदिवसाच्या दिवस आणि पुरस्कार हा जुळवून आलेला योगायोग आहे. कार्यक्रम विलेपार्ले येथील ऑरचिड पंचतारांकित हॉटेलमध्ये नवराष्ट्रतर्फे "महिला पुरस्कार सोहळा- २०२१" पार पडला या सोहळ्यास अनेक दिग्गज आणि सिनेअभिनेत्री उपस्थित होते. पल्लवीताई सरमळकर यांना "महिला पुरस्कार -२०२१" प्राप्त झाल्याबद्दल त्यांना अनेकांकडून अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

सेंच्युरी रेयोन कंपनी शहाड द्वारा वाघीवालि येथे शेतकरी मार्गदर्शन शिबिर संपन्न...

सेंच्युरी रेयोन कंपनी शहाड द्वारा वाघीवालि येथे शेतकरी मार्गदर्शन शिबिर संपन्न...


कल्याण, ऋषिकेश चौधरी : सेंच्युरी रेयोन कंपनी च्या व्यवसाईक सामाजिक जबाबदारी प्रीत्यर्थ व कृषी विभाग आणि पंचायत समिती मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने, मुरबाड तालुक्यातील वाघिवली येथे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


शेती विषयी आधुनिक प्रगत तंत्रज्ञान, विकसित बी बियाणे, शासकिय योजना व बाजारपेठ विषयी माहिती खेडोपाडी पोहचव न्याच्या उद्देशाने सदर शिबिर आयोजित करण्यात आल्याचे सी.एस.आर. च्या वतीने सांगण्यात आले .कृषी अधिकारी मुरबाड यांनी आधुनिक शेती या विषयावर शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या वेळी पंचायत समिती सदस्य व इतर मान्यवर तसेच शेकडोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

मातोश्री वेलबाई देवजी हरिया महाविद्याय आणि पुरोगामी विचार मंच महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा !!

मातोश्री वेलबाई देवजी हरिया महाविद्याय आणि पुरोगामी विचार मंच महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा !!


प्रतिनिधी / संदीप शेंडगे
  
कल्याण -  शहाड - कल्याण येथील मातोश्री वेलबाई देवजी हरिया महाविद्यालयात कोरोनाचे सर्व नियम पाळत बी कॉम आणि एस वायच्या विद्यार्थ्यांना सहभागी करत संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन आयोजन करण्यात आले होते. 
 

या वेळी सर्व प्रथम चळवळीतील कायम सक्रीय असणारे मोरे व साळवी दांम्पत्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व संविधानाच्या प्रतीस पुष्प वाहुन कार्यक्रमास सुरुवात केली.  


सुरुवातीला विद्यार्थ्यांसह सर्वानी  संविधानाच्या प्रस्तावनेचे सामुदायिक वाचन केले. पुरोगामी विचार मंच महाराष्ट्राचे अध्यक्ष बंडु घोडे सर यांनी थोडक्यात प्रस्ताविकेत कार्यक्रमाचा हेतू व महत्व विशद करत संविधानाच्या संबंधित प्रश्न मंजुषेचे मुलांना नियम सांगून योग्य उतर देणा-यांना संविधान पुस्तकांची भेट दिली जाईल असे सांगून प्रश्न मंजूषेला सुरूवात करून पहिले पाच प्रश्न विचारले त्या नंतर अनुक्रमे सचिन साळवी, शरद लोखंडे, डॉ सुषमा बसवंत, यांनी ही प्रश्न विचारले व योग्य उतर देणा-यां विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरुपात संविधानाची पुस्तिका मान्यवरांच्या हस्ते भेट दिली या प्रश्न मंजूषेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


"हिरामन खाडे व पुष्पांजली या विद्यार्थ्यांनी चार चार प्रश्नांची योग्य उतरे देवून बाजी मारली". सर्वजण आपापल्या परिने योग्य उतर देण्याचा प्रयत्न करत होते, त्यात काहीना यश आले तर काहींचे थोडक्यात बक्षीस निसटले प्रश्न मंजुषा खुपच मनोरंजक व उत्सुकता निर्माण करणारी झाली.


यातून मुलांसह उपस्थितांच्या मध्ये संविधान जागरूतीचे काम होवून संविधानाच्या संबंधी समज गैरसमज दूर झाले. 


या नंतर उपस्थित मान्यवरांना *काँलेज प्रशासनाच्या वतीने डॉ. मा. गिरीष लटकेसर व प्रिंसिपल कोमल चंदनशिवे व ईतर स्टाफ कडून पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले*.


याप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना *भारतीय संविधाना विषयी अतिशय मौलिक मार्गदर्शन आपापल्या मनोगताव्दारे केले.*


याप्रसंगी पुरोगामी विचार मंच महाराष्ट्राचे अध्यक्ष मा. बंडु बी घोडेसर सरचिटणीस मा. शरद लोखंडे महिला आघाडी अध्यक्ष मा. डॉ. सुषमा बसवंत, सचिव सचिन साळवी, उपाध्यक्ष मा.सुभाष गायकवाड, संघटक नारायण निंबाळकर, कोकण संपर्क प्रमुख देवेंद्र मोरे, म.आ. संघटक मंगल मोरे, सचिता साळवी ,प्रताप माने आणि पुरोगामी विचार मंचचे इतर मान्यवर सदस्य उपस्थितीत होते.

शेवटी संस्थेचे सचिव डॉ.गिरीश लटके यांनी मनोगत व कवितेने अध्यक्षीय समारोप केला.  

सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख पाटील सर व सचिन साळवी यांनी केले तर आभार देवेंद्र मोरे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरोगामी विचार मंच महाराष्ट्र च्या वतीने व काँलेज प्रशासनाने व सर्व स्टापने प्रयत्न केले.

Friday 26 November 2021

सह्याद्री कुणबी संघ, पुणे शहर तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजन !!

सह्याद्री कुणबी संघ, पुणे शहर तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजन !!


मुंबई - ( दिपक कारकर )

पुण्यातील गेली अनेक वर्षे विविध क्षेत्रात उपक्रम राबवत सामाजिक सौख्य राखणारी अग्रनिय संस्था म्हणजे "सह्याद्री कुणबी संघ,पुणे शहर ( नोंदणीकृत ) होय. उपरोक्त संस्थेच्या माध्यमातून प्रतिवर्षी अनेक उपक्रम राबविण्यात येतात.रविवार दि.२८ नोव्हेंबर २०२१ रोजी संस्थेचा "भव्य रक्तदान शिबिर याग" म.न.पा.शाळा जनता वसाहत, पर्वती पायथा गल्ली, क्र.४७/४८ येथे सकाळी ०९ ते सायं.०५ वाजेपर्यंत होणार आहे.या उपक्रमाला सह्याद्री ब्लड बँक - सह्याद्री हॉस्पिटल, पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. अधिक माहितीसाठी दिपक फणसळकर - ८४४६००५३५८ यांच्याशी संपर्क साधून पुण्यातील रक्तदात्यांनी या उपक्रमाला उपस्थित राहून योगदान देण्याचे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

कल्याण तालुक्यात सविधानांचा जागर उत्साहात, जीवनदिप महाविद्यालयात न्यायाधीशांनी केले वाचन !!

कल्याण तालुक्यात सविधानांचा जागर उत्साहात, जीवनदिप महाविद्यालयात न्यायाधीशांनी केले वाचन !!


कल्याण, (संजय कांबळे) : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या 'भारतीय संविधान' २६ नोव्हेंबर या दिनाचे निमित्ताने संपूर्ण कल्याण तालुक्यात संविधानाचा जागर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर तालुक्यातील गोवेली येथील जीवनदिप महाविद्यालयात न्यायाधीशांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. तसेच सर्व ग्रामपंचायत व शासकीय, निमशासकीय कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.


भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवला, मसूदा समितीचे अध्यक्ष म्हणून अगदी चोख जबाबदारी पार पाडली, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राज्याची घटना त्यांनी लिहून ती आजच्या दिवशी म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. त्यामुळे ते घटनेचे शिल्पकार ठरले, तोच हा दिवस देशभर 'संविधानदिन' म्हणून साजरा केला जातो.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असताना, देशात सविधानांचा जागर देखील साजरा होत आहे, या निमित्ताने आज तालुक्यातील गोवेली येथील जीवनदिप महाविद्यालयात उल्हासनगर न्यायालयाचे न्यायाधीश पंडित सर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन संविधानाचे वाचन करून विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली, यावेळी सविधानांमुळे आपण ग्रामीण भागात राहून ही न्यायाधीश झालो, ही डॉ बाबासाहेबांची देण आहे, असे सांगून सर्वांनी कायद्याचे पालन करावे असे अवाहन त्यांनी यावेळी केले. 


तर कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू आंधळे म्हणाले, आपले खरे हिरो हे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आहेत, सविधानांने आपले अधिकारी व कर्तव्य सुरक्षित केली आहे. आपण आपले अधिकार वापरतो, पण नेमकी कर्तव्य विसरतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवे. असे बोलून सर्वांनी कायदा सुव्यवस्था राखायलाच हवी असे सांगितले. तर जीवनदिप महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोंडविदे यांनी सांगितले की, या देशावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे उपकार आहेत, सविधानांमध्ये प्रत्येक घटकांचा बारकाईने विचार केला आहे, त्यामुळे सगळे सुरक्षित असून आपली लोकशाही ही जगात मोठी आहे, याचा आपल्याला अभिमान असायला हवा, असे सांगून आज महाविद्यालयात ख-या अर्थाने सविधानांचा जागर सुरू आहे, तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी गावोगावी जावून लोकांना सविधानांच महत्त्व पटवून सांगत आहेत. असे त्यांनी सांगितले. 


यावेळी व्यासपीठावर प्राचार्य, कोरे सर व इतर प्राध्यापक वर्ग तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने महाविद्यालयाच्या लाँयब्रिमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध प्रकारच्या पुस्तकाचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.

याचप्रमाणे तालुक्यातील विविध ग्रामपंचायती, चौक, मंडळे, विविध सामाजिक संघटना, यांनी सविधानांचा जागर मोठ्या उत्साहाने साजरा केला.

राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेचे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजन !!

राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेचे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजन !! पुणे, प्रतिनिधी : भारतीय शालेय खेळ महास...