Tuesday 30 November 2021

ड्युटीवर नसतानाही परमबीर सिंग यांच्याकडून सरकारी गाडीचा वापर, गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश !!

ड्युटीवर नसतानाही परमबीर सिंग यांच्याकडून सरकारी गाडीचा वापर, गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश !!


भिवंडी, दिं,30, अरुण पाटील (कोपर) :
           मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग  यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला आणि एकच खळबळ उडाली. या प्रकरणावरुन राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला. याच दरम्यान परमबीर सिंग हे अचानक गायब झाले आणि अखेर 234 दिवसांनी ते मुंबईत परतले. मुंबईत परतले परमबीर सिंग हे ड्युटीवर अद्यापही हजर नाहीयेत आणि असे असतानाही ते सरकारी गाडीचाच वापर करत आहेत. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता त्यांनी यावर चौकशीचे आदेश दिल्याचं म्हटलं आहे. 
         दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं, परमबीर सिंग यांनी आपला पदभार स्वीकारलेला नाहीये. ज्या प्रकारे ते गाडीचा वापर करत आहेत ते चुकीचं आहे. ते कामावर नाहीत त्यांच्याबर गंभीर आरोप आहेत. तरीदेखील ते गाडी वापरत आहेत. सरकारी यंत्रणांचा वापर त्यांनी केला नाही पाहिजे. हे चुकीचं आहे चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी अद्याप आपला पदभार स्वीकारलेला नाही.
           कालची भेट अत्यंत चुकीची आहे. कोर्टच्या आदेशानंतर अशी भेट घेता येते मात्र अशी कुठलीही परवानगी नसताना ही भेट झाली आहे. परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्या भेटीची नक्कीच चौकशी करण्यात येईल. मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. परमबीर सिंग यांच्या आरोपांची शहानिशा आणि चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने सेवानिवृत्त न्यायाधीश के यू चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना केली आहे.
           या आयोगाने परमबीर यांना चौकशीसाठी अनेकदा समन्स बजावले होते. चांदिवाल आयोगाने समन्स बजावल्यानंतर परमबीर सिंग अचानक गायब झाले होते. ते अनेकदा समन्स बजावूनही चौकशीला हजर राहिले नव्हते. त्यामुळे या प्रकरणी मुंबईच्या किला कोर्टात झालेल्या सुनावणीत परमबीर यांना फरार घोषित करण्यात आले. तर दुसरीकडे परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामीनसाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर पुढील सुनावणी 6 डिसेंबरला होणार आहे. पण तोपर्यंत अटक न करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. 
         दरम्यान, परमबीर काल (29 नोव्हेंबर) चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी चांदीवाल आयोगाने त्यांचे जामीनपात्र वॉरंट रद्द केलं. तसेच मुख्यमंत्री सहायत्ता निधीत 15 हजार रुपये भरण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे चांदीवाल आयोग सुनावणीसाठी आज सचिन वाझे याची देखील नियमित तारीख होती. त्यामुळे परमबीर सिंग चांदीवाल आयोगाच्या समोर जाण्याआधी समन्स रुममध्ये त्यांची सचिन वाझेसोबत भेट झाली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
         उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आणि व्यापारी मन्सुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझे हा अटकेत आहे. या प्रकरणीच्या सुनावणीसाठी वाझेची आज नियमित तारीख होती. पण या दरम्यान परमबीर सिंग आणि वाझे यांच्यात भेट झाली. या भेटीवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. या भेटीवर अनिल देशमुख यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...